काही मोजके कलाकार आपल्या भूमिकांशी इतके एकरूप होऊन जातात, कि प्रेक्षक त्यांना एकमेकांपासून वेगळ पाहूच शकत नाहीत. बरं हि भूमिका ग्रे शेडची असेल तर प्रेक्षकांच्या रोशाला सामोरं जावं लागतं. पण खरं पाहता हीच त्यांच्यासाठी एक पोचपावती असते त्यांच्या अभिनयाची. असंच एक पात्र सध्या मराठी टेलीविजनवर धुमाकूळ घालतंय. गुरुनाथ नावाचं ! पुढे काही बोलायलाच नको नाही का. अभिजित खांडकेकरांनी त्यात असा काय जीव ओतलाय कि विचारू नका. अर्थात, ती केवळ एक भूमिका आहे आणि आपल्या खऱ्या आयुष्यात ते तसे नाहीत हे हुशार वाचकांना सांगायची गरज नाही. तुम्ही त्यांची लव स्टोरी ऐकली तर याची खात्रीचं पटते. काय म्हणता, तुम्हाला कल्पना नाही, मग वाचा कि.
झालं असं कि मुळचे अभिजित रेडियो जॉकी म्हणून काम करत असत. पुढे महाराष्ट्राचा सुपरस्टार या कार्यक्रमात स्वतःचे अभिनय कौशल्य अजमावण्यासाठी ते मुंबईत दाखल झाले. उत्तम व्यक्तिमत्व, छाप पाडणारा आवाज आणि जोडीला अभिनय. ते प्रेक्षकांच्या लक्षात राहिलेच, तसेच मनोरंजन क्षेत्रात सुद्धा त्यांची दखल घेतली गेली आणि आली ती त्यांची पहिली सुपरहिट मालिका, माझिया प्रियाला प्रीत कळेना. त्याकाळात या मालिकेने प्रेक्षकांना वेड लावलं होतं. याच दरम्यान नाशिकचीच एक अभिनेत्री, जी उत्तम नृत्यांगना सुद्धा आहे अशी सुखदा देशपांडे नाटक, मालिकांमधून काम करत होती. अभिजितची प्रगती वाखाणण्याजोगी होती आणि त्या दोघांचा एक कॉमन मित्रही होता. पण फोन नंबर्स न्हवते. पण मग सुखदा ने त्याला फेसबुक वर अभिनंदनाचा मेसेज केला. पुढे बोलणं वाढत गेलं. मैत्री वाढत गेली.
हे नातं केवळ मैत्रीपूरतं, मर्यादित न राहता याचं लग्नात परिवर्तन व्हावं असं अभिजित यांच्या मनाने घेतलं. त्यांनी तसं सुखदा यांना विचारलं. सुखदा यांना हे थोडं अनपेक्षित असावं, पण अभिजित यांचा निश्चय ठाम होता. त्यांचा होकार आला. मग काय, होणार, सुखदा यांच्या होकारानंतर महिन्याभरातच आपापल्या घरी सांगितलं दोघांनी. त्या पातळीवरसुद्धा होकारच होता. आणि म्हणता म्हणता अवघ्या सहा महिन्यात या गोड जोडीची लग्नगाठ बांधली गेली ती आजतागायत. कामाच्या प्रचंड धावपळीतही हि जोडी वेळ मिळेल तेव्हा एकमेकांना नक्की वेळ देताना दिसते. आणि या वेळेचा सदुपयोग धमाल मस्ती करून करते. त्यांचे लॉकडाऊन मधले सोशल मिडीयावरचे सेल्फी या धमाल क्षणांची साक्ष देतात. भूमिका कोणतीही असो, त्यात झोकून देऊन काम करणं हे दोघांनाही आवडतं.
म्हणूनच, सुखदा यांना बाजीराव-मस्तानी या गाजलेल्या चित्रपटात बाजीरावांच्या बहिणीची भूमिका करायची संधी मिळाली होती. त्यांनी अनेक मालिकांमध्येही कामे केली आहेत. अभिजित जसे अभिनयाव्यतिरिक्त रेडियो जॉकी म्हणून प्रसिद्ध आहेत तसेच सुखदा या कुशल नृत्यांगना म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांना आपण अनेक कार्यक्रमातून परफॉर्म करताना पाहिलं आहेच. काही वर्षांपूर्वी आलेल्या एका सिनेमात या दोघांनीही एकत्र काम केलं होतं. नुकताच त्यांनी गणेशोत्सव अगदी प्रसन्नपणे आपल्या घरी साजरा केला. अशी हि सदैव प्रसन्न राहणारी, वेळात वेळ काढून एकमेकांना जपणारी, आपल्या कलेने प्रेक्षकांना सदैव आनंद देणारी जोडी यापुढेही अशीच आनंदी राहो. त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा !
(Author : Vighnesh Khale)