मित्रांनो जाहिरातींना आजच्या युगात महत्वाचे स्थान आलेलं आहे. अगदी साबण, तेल पासून ते मोठ मोठ्या आलिशान गाड्यांपर्यंत जाहिरात केली जाते. जाहिरात कंपन्या सुद्धा आपला ब्रँड इतरांपेक्षा किती चांगला आहे, ह्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या असेलेल्या जाहिराती बनवतात. बऱ्याचदा त्यातील जाहिराती फसव्या असतात. विरोधी ब्रँड समोर स्पर्धेत टिकून राहावे आणि आपल्या मालाचा खप अधिक प्रमाणात व्हावा ह्यासाठी जाहिरात कंपन्या बड्या बड्या स्टार्सना आपले ब्रँड अम्बॅसॅडर करतात. आणि अश्या स्टारकडून खूपवेळा फसव्या जाहिरात करून घेतात. लोकंही अश्या स्टार्सच्या बोलण्यावर विश्वास ठेवून वस्तू खरेदी करतात. आता तुम्हीच सांगा पाहू, अशी कोणती क्रीम असेल जी लावल्यावर कोणीही ७ दिवसांत गोरे होणार ? किंवा असा कोणता परफ्युम असेल जो लावल्यावर आकाशातून मुलींचा पाऊस पडेल ? परंतु हे जाहिरातीचं विश्व आहेच असं निराळं. एक वेगळीच दुनिया आणिआता ह्याचे परिणाम बॉलिवूडचे दोन मोठे स्टार्स भोगणार. गोविंदा आणि जॅकी श्रॉफ वर ग्राहकांचे संरक्षण करणाऱ्या न्यायालयाने दंड लावला आहे.
काय आहे कारण ?
उत्तरप्रदेशातील मुजफ्फरनगर मधील एका ग्राहक कोर्टाने गोविंदा आणि जॅकी श्रॉफ वर एक वेदना क्षमवणाऱ्या तेलाचा प्रचार करण्यासाठी दंड ठोठावला आहे. ह्याशिवाय तेल बनवणाऱ्या कंपनीवर सुद्धा दंड लावला गेला आहे. एका तरुणाने पाच वर्षाअगोदर एक हर्बल ऑइल बनवणारी कंपनी आणि त्याचे दोन सेलेब्रिटी ब्रँड अँबेसेडर ह्यांच्या विरुद्द केस केली होती. ज्यावर आता निर्णय आला आहे. ह्या निर्णयानुसार नुकसान भरपाई म्हणून गोविंदा आणि जॅकी श्रॉफ दोघांनाही हजारोंचा दंड लावण्यात आला आहे. तक्रारीत आरोप ठेवला गेला कि, १५ दिवसात वेदनेचे निवारण झाले नाही. जुलै २०१२ मध्ये एक जाहिरात पाहिल्यानंतर मुजफ्फरनगर येथील वकील अभिनव अग्रवाल ह्यांनी आपल्या ७० वर्षीय वडिलांसाठी ३,६०० चे महागडे वेदना क्षमवणारे हर्बल ऑइल मागवले. जाहिरातीत दावा केला गेला होता कि, जर फायदा झाला नाही तर १५ दिवसांच्या आत पैसे परत दिले जातील.
ह्या तेलाचा वापर केल्यानंतर दहा दिवसानंतर सुद्धा वेदना दूर झाल्या नाहीत, ज्यामुळे अग्रवाल ह्यांनी मध्येप्रदेशच्या कंपनीच्या प्रतिनिधीला हि गोष्ट सांगितली आणि त्यांनी त्याला हे ऑइल पुन्हा परत घेऊन पैसे परत करण्यास सांगितले. खरंतर, कंपनीने पैसे परत दिले नाही. त्यानंतर अभिनव अग्रवाल जे व्यवसायाने वकील आहेत, त्यांनी ग्राहक संरक्षण कोर्टात तक्रार दाखल केली. वकिलाने स्थानिक मीडियाला सांगितले कि, “मी हे प्रॉडक्ट ह्यामुळे विकत घेतले कारण गोविंदा आणि जॅकी श्रॉफ सारखे सेलेब्रिटी त्याचा प्रचार करत होते. कंपनीने दावा केला होता कि १५ दिवसात वेदना दूर होतील, परंतु सर्व खोटं आहे.”
कोर्टाने ह्या घटनेशी संबंधित सर्व पाच लोकं कंपनी, गोविंदा, जॅकी श्रॉफ, टेलिमार्ट शॉपिंग नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड आणि मॅक्स कम्युनिकेशनला नुकसान भरपाईच्या रूपात २० हजार रुपये देण्याचे आदेश दिले आहेत.