Breaking News
Home / मराठी तडका / चंद्र आहे साक्षीला मालिकेतील स्वाती खऱ्या आयुष्यात कशी आहे, बघा जीवनकहाणी

चंद्र आहे साक्षीला मालिकेतील स्वाती खऱ्या आयुष्यात कशी आहे, बघा जीवनकहाणी

चंद्र आहे साक्षीला असं म्हणत काही दिवसांपूर्वी एक मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी टेलिव्हिजनच्या पडद्यावर दाखल झाली आहे. या मालिकेच्या प्रोमोज मुळे ही मालिका एक थरारनाट्य म्हणून पुढे येईल, असं वाटत होतंच आणि सध्या त्याच दिशेने या मालिकेचा प्रवास सुरु झाला आहे. या मालिकेच्या निमित्ताने ऋतुजा बागवे ही बऱ्याच काळाने मालिकांमधून आपल्या भेटीस आली आहे. या मालिकेआधी ऋतुजा हिचे ‘अनन्या’ या नाटकाचे 300 प्रयोग होत आले होते तेही अवघ्या अडीच वर्षात. या नाटकाला प्रेक्षक आणि मनोरंजन क्षेत्रातील दिग्गजांनीही नावाजलं होतं. त्यामुळे गेल्या काही काळात ऋतुजा बागवे हिने स्वतःच्या सर्वोत्तम अभिनयाने आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये नाव नोंदवलं आहे, असं म्हंटल्यास वावगं ठरू नये. तर अशा या गुणी अभिनेत्रीचा अभिनय प्रवास आपण आज थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करू.

ऋतुजा हिचं बालपण गेलं ते रायगड मिलिटरी कॅम्प येथे. तिथेच तिचं शिक्षणही झालं. पुढे मुंबईतील महर्षी दयानंद महाविद्यालय आणि रुईया महाविद्यालय येथून तिने आपलं उच्च शिक्षण पूर्ण केलं. तिच्या पदवीच्या शिक्षणात गणित हा विषय होता. गणितासारख्या रुक्ष विषयात तिला जेवढी आवड आणि गती आहे, तेवढीच गती आणि आवड तिला रंगीबेरंगी दुनिया समजल्या जाणाऱ्या कलाक्षेत्राविषयी आहे. महाविद्यालयात असताना तिने पहिल्यांदा एकांकिका केली आणि पदर्पणातच तिला सर्वोत्तम अभिनेत्री म्हणून बक्षीस मिळालं. या एकांकिके मधल्या अवघ्या पाच मिनिटांच्या स्त्री दिग्दर्शकाच्या भूमिकेने तिच्या कारकिर्दीला नवीन दिशा दिली. तिच्यातल्या अभिनेत्रीला नवनवीन प्रयोग करण्याची उत्सुकता वाटु लागली आणि त्यादृष्टीने तिने प्रयत्नही केले. तसेच घरुनही पाठिंबा होताच. एका मुलाखतीत ऋतुजाने असं म्हटलं होतं की, काही एकांकिकांना आर्थिक पाठबळ वा इतर काही मदत हवी असे, तर तिचे वडील सदर मदत करण्यात सतत आघाडीवर असत. तसेच तिच्या आईनेही लेकीला खूप उत्तम पाठिंबा दिला. त्यांची स्वतःची अभिनयाची आवड ऋतुजा पूर्ण करत असल्याने त्यांना आनंद आणि अभिमान होताच. आई वडिलांचा हाच पाठिंबा ऋतुजा ने सार्थ ठरवला.

तिने एकांकिकांमधून एवढी बक्षिसे कमावाली आहेत की आज त्यांच्यासाठी तिच्या घरात वेगळी जागा तिने तयार केली आहे. एकांकिकांमधून स्वतःतील अभिनेत्रीला पैलू पाडत असताना तिने टेलिव्हिजनवरही काम करण्यास सुरुवात केली. यातील तिची पहिली मालिका म्हणजे ‘तू माझा सांगाती’ ही होय. या मालिकेत तिने संत तुकारामांच्या पाहिल्या पत्नीची भूमिका केली होती. रंगभूमीवरील सगळा अनुभव तिने या व्यक्तीरेखेला साकारताना वापरला. त्यामुळे सगळ्यांकडून तिचं कौतुकही झालं. पुढे तिची, नांदा सौख्य भरे ही मालिका आली. यातील नायिकेने प्रेक्षक आणि समीक्षक यांच्याकडून तिला उत्तम अभिनयासाठी शाबासकी तर मिळवून दिलीच, सोबत अनेक पुरस्कारही मिळवून दिले. पण या नंतर काही काळ मध्ये गेला. मालिका केल्यानंतर एक उत्तम नाटक करावं असं तिच्यातील रंगकर्मीला वाटत होतं. वाट बघावी लागली पण हा वेळ सत्कारणी लागला. तिच्या वाटेला अनन्या ही भूमिका आली आणि अल्पावधीत प्रेक्षक आणि कालाक्षेत्रातले दिग्गज यांची वाहवा ऋतुजा हिने मिळवली.

यातील दोन उदाहरणं जी ऋतुजा अगदी आनंदाने तिच्या प्रत्येक मुलाखतीत सांगते. यातील पहिला प्रसंग असा की तिचं हे नाटक पाहण्यासाठी म्हणून मंगेशकर कुटुंबियातील काही व्यक्ती आल्या होत्या. नाटक संपल्यावर भारतीताई मंगेशकर यांनी तिला स्वतःकडची सोन्याची चैन कौतुक म्हणून भेट दिली. तसेच एका प्रेक्षकाने तिच्या नाटकांतील भूमिकेमुळे प्रेरित होऊन ५१,००० रुपयांचा धनादेश तिला पाठवला होता. पूढे तिने दिव्यांग मुलांच्या कल्याणासाठी याचा वापर केल्याची बातमीही ऐकण्यात आली होती. या नाटकात अशा एका मुलीची कथा रेखाटली आहे जिचे एका अपघातात हात जातात आणि तिचा पुढील प्रवास कसा होतो हे दाखवलं आहे. या नाटकाचे परदेशातही प्रयोग झाले आहेत. चहुबाजूंनी तिच्यावर या भूमिकेमुळे कौतुकाचा वर्षाव होतो आहे. तिला या नाटकातील भूमिकेसाठी तब्बल १५ पुरस्कार मिळलेले आहेत. आजतागायत एका नाटकातील भूमिकेसाठी एका अभिनेत्रीला मिळालेले हे सगळ्यांत जास्त पुरस्कार आहेत. त्यामुळे इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये तिच्या या नाटकाची, भूमिकेची नोंद झाली आहे.

नाटकांसोबत तिने सिनेमांतूनही अभिनय केलेला आहे. शहीद भाई कोतवाल या सिनेमामधून तिने स्वातंत्र्य सेनानी भाई कोतवाल यांच्या पत्नीची भूमिका साकारली होती. तसेच रिस्पेक्ट हा तिचा सिनेमाही येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीस येऊ शकतो. सिनेमांसोबत ऋतुजाने म्युझिक व्हिडियोज मध्येही अभिनय केला आहे. जीवाचा पालना करतंय रं, मन माझे, घे उंच भरारी ही त्यातली काही उदाहरणं. तिच्या या अभिनय प्रवासातून काही गोष्टी शिकायला मिळतात त्या म्हणजे जी व्यक्तिरेखा मिळेल, ती संपूर्णपणे झोकून देऊन आणि लक्षपूर्वक साकारायची. तसेच जे योग्य आणि दर्जेदार वाटेल तेच काम करायचं. कलाकार म्हणून तुमच्या कलेवर तुमची नितांत श्रद्धा असणं आवश्यक आहे. सध्या ऋतुजा ही मालिकेच्या शूटिंग मध्ये व्यस्त आहे. अनन्या नंतर आता ती चंद्र आहे साक्षीला मधील स्वाती ही व्यक्तिरेखा साकारते आहे. तिच्या अन्य भुमिकांप्रमाणेच ही व्यक्तीरेखाही ती लोकप्रिय करेल हे नक्की. तसेच येत्या काळात चंद्र आहे साक्षीला सोबतच विविध दर्जेदार कालाकृतींतून ती आपल्या भेटीस येत राहील आणि तिच्या सहजसुंदर आणि अभ्यासू अभिनयाने आपल्याला आनंद देत राहील हे ही नक्की. तिच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टीमकडून तिला मनःपूर्वक शुभेच्छा !

(Author : Vighnesh Khale)

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.