मराठी गप्पाच्या माध्यमातून आमची टीम अनेक विविध असे हृदयस्पर्शी प्रसंग आपल्या समोर आणत असते. यात अनेक वायरल व्हिडीओज असतात. यातील बरेचसे हे लहान मुलांचे वायरल झालेले गंमतीशीर व्हिडीओज असतात. पण आज मात्र अगदी काहीसा गंभीर करणारा आणि मनाला हात घालणारा एक व्हिडिओ आमच्या नजरेस पडला आणि त्याविषयी लिहावं असं आमच्या टीमला वाटून गेलं. हा व्हिडीओ आहे एका प्रसिद्ध कार्यक्रमाचा. या कार्यक्रमाचे नाव आहे, ‘चला हवा येऊ द्या’. या कार्यक्रमाने गेल्या काही काळापासून कात टाकली आहे आणि नवनवीन गोष्टींचा भरणा या कार्यक्रमात वाढतो आहे. यात अगदी नवीन सेट पासून ते अगदी नवनवीन सेगमेंट्स पर्यंत नाविन्यपूर्ण गोष्टींचा समावेश आहे. या गेल्या आठवड्यात यात एक असा नवीन सेगमेंट पाहायला मिळाला ज्यात कार्यक्रमात आलेल्या पाहुण्यांना एक जुना फोन देऊन समोर व्यक्तीचित्र दाखवले जाणार.
या व्यक्तीशी कार्यक्रमातील व्यक्तीनं हितगुज साधायचा असं साधारण या सेगमेंट ची रूपरेखा. या भागात अनेक दिग्गज कलावंत हजर होते. अभिनेत्यांपैकी जयंतजी सावरकर, मोहनजी जोशी, अशोकजी सराफ अभिनेत्रींपैकी रोहिणीजी हट्टंगडी आणि निवेदिताजी सराफ यांचा समावेश होता. जेष्ठ संगीत दिग्दर्शक अशोकजी पत्की आणि उत्तम गायक, अभिनेते आणि कलासादर कर्ते अशोकजी हांडे हे सुद्धा उपस्थित होते. या प्रसंगी वरील सेगमेंटची सुरुवात झाली ती अशोकजी सराफ यांच्यापासून. आता समोर कोणाचं चित्र येणार आणि अशोक मामा कसा संवाद साधणार याची उत्सुकता घरी बसून हा कार्यक्रम पाहणाऱ्या प्रेक्षकांना आणि उपस्थित कलाकारांना लागून राहिली होती आणि समोर तो फोटो आला आणि नकळत सगळ्यांचे डोळे पाणावले. तो फोटो होता, महाराष्ट्राचे लाडके अभिनेते लक्ष्मीकांतजी बेर्डे यांचा. एका क्षणासरशी सगळे हळवे झाले यावरून अशोक मामांना काय वाटलं असेल याची केवळ कल्पनाच केलेली बरी. अशोक मामांनी सुरुवात केली. लक्ष्मीकांत यांचं अकाली जाणं त्यांच्या किती जिव्हारी लागलं आहे हे त्यांच्या पहिल्या काही वाक्यांतच कळून आलं. लक्ष्मीकांतजी यांनी सगळ्यांना अचानक न सांगता जाणं हे धक्कादायक आणि क्लेशकारक होतंच. याची आठवण पुन्हा झाली. मग अशोकजींनी लक्ष्मीकांतजी यांच्या तरुणपणीच्या आठवणी सांगितल्या. त्यांच्या एरवी न ऐकलेला स्ट्रगलचा काळ या आठवणींतून किंचित डोकावून गेला.
आपल्या अचाट विनोद आणि उत्तम अभिनयाच्या जोरावर ज्यांनी आपल्याला सतत हसवंलं त्यांची ही बाजू त्यांनी आपल्याला कधी जाणवूच दिली नव्हती. अशोक मामांच्या या आठवणींच्या धांडोळ्यात लक्ष्मीकांतजी यांच्या बद्दल असलेला आदर पुन्हा एकदा दिसून आला. लक्ष्मीकांतजींनी आयुष्यात जे सर्वोच्च स्थान कमावलं त्याबद्दल त्यांनी दाद दिली. सोबतच प्रेक्षकांच्या मनातली भावनाही बोलून दाखवली. ही भावना म्हणजे देहरूपी लक्ष्मीकांतजी आपल्यात नाहीत. पण त्यांनी अजरामर करून ठेवलेल्या कलाकृतींच्या माध्यमांतून ते याआधीही, आजही आणि यापुढेही आपल्या सदैव स्मरणात राहतील हे नक्की. लक्ष्मीकांतजी यांचं योगदान अतुलनीय आणि एकेमेवादित्य आहे असं म्हंटल्यास वावगं ठरू नये. या सेगमेंटच्या निमित्ताने लक्ष्मीकांतजींची आठवण पुन्हा झाली आणि बऱ्याच दिवसांनी हृदयाला हळवं करणारं हे संभाषण स्पर्शून गेलं असा भास प्रत्येक प्रेक्षकाला झाला असणार. कारण खरंच लक्ष्मीकांतजी हे लोकप्रिय आणि एकमेव असेच होते, आहेत व राहतील. आमच्या टीमच्या वतीने लक्ष्मीकांतजी यांच्या आठवणींना हा लेख समर्पित.
बघा व्हिडीओ :