मराठी मनोरंजन क्षेत्रात सरलेल्या दशकभरात अनेक बदल झाले आहेत. त्यातील महत्वाचा बदल म्हणजे मराठी सिनेमे, मालिका, नाटकं यांच्या प्रमोशनसाठी उपलब्ध झालेले अनेकविध कार्यक्रम. आज टेलिव्हिजन आणि युट्युबच्या माध्यमांतून अनेक चॅनेल्सनी मराठी कलाकृतींना महाराष्ट्रात, देशात आणि जगाच्या कानाकोपऱ्यात पसरवलेलं आहे. यात ज्या कार्यक्रमाने या उपक्रमांची मुहूर्तमेढ रोवली आणि त्यांचा हा उपक्रम गेली कित्येक वर्षे अव्याहतपणे चालू आहे तो कार्यक्रम म्हणजे चला हवा येऊ द्या. मंडळी, तुमच्या मनात हा विचार एकदातरी नक्की आला असेल कि हा शो सुरु कसा झाला, ह्या नक्की काय आहे ह्यामागची कथा. चला तर आजच्या या लेखातून आपण या कार्यक्रमाची जन्मकथा जाणून घेणार आहोत.
आपण मराठी गप्पावरील डॉ. निलेश साबळे यांच्या आयुष्यावरील लेख वाचला असेल तर आपल्याला त्यांच्या खडतर प्रवासाची कल्पना आली असेलच. यात डॉक्टरकीचं शिक्षण घेत असताना त्यांनी गावोगावी जाऊन एकपात्री प्रयोग आणि नाटकं केली. त्यांचा हा अनुभव त्यांना ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ या कार्यक्रमाच्या वेळी उपयोगास आला. खरं तर एका मुलाखतीप्रसंगी त्यांनी सांगितलं होतं की, त्यांची पहिल्या ऑडिशनच्या वेळी निवड झाली नव्हती. किंबहुना त्यांना ऑडिशनही देता आली नव्हती. पण सगळ्या ऑडिशन्स संपल्यावर मात्र आयोजकांनी कोणाला काही सादर करायचं आहे का हे विचारलं. निलेश यांनी उत्तम सादरीकरण केलं. त्यांचं सादरीकरण पाहून त्यांची तात्काळ निवड झाली, आणि ती सार्थ ठरवत त्यांनी हा कार्यक्रम जिंकला. यातुन पुढे त्यांना ‘फु बाई फु हा’ विनोदी कार्यक्रम सुत्रसंचालित करण्याची संधी मिळाली. यातून एक सुत्रसंचालक म्हणून त्यांची छाप पडलीच, सोबत लेखक, दिग्दर्शक म्हणूनही ते लोकप्रिय झाले.
ते जसे लोकप्रिय होत होते, तसतसे त्यांचं काम जवळून पाहणाऱ्या झी मराठीच्या टीमची विश्वासार्हताही अर्जित करत होते. या काळात रितेशजी देशमुख यांचा बहुप्रतिक्षित माऊली हा सिनेमा प्रदर्शनाच्या वाटेवर होता. त्यांनी झीच्या टीमकडे या सिनेमाच्या प्रमोशनसाठी एखादा कार्यक्रम हवा, हे सुचवलं. झी समोर निलेश यांचं काम आणि त्यांच्याबद्दल विश्वासार्हता होतीच. निलेश यांना हे आव्हान देण्यात आलं. हे आव्हानचं होतं, तेही भलंमोठं. पण आव्हानात संधी असते हे निलेशजी जाणून होते. त्यांनी ‘फु बाई फु’ मधील कुशल बद्रिके आणि भाऊ कदम यांना हाताशी धरले. त्यांच्या पैकी एकाच्या घरी त्यावेळी माऊली सिनेमाचं प्रमोशन कसं करायचं यावर चर्चा आणि संकल्पना तयार झाली. अवघ्या एक आठवड्याच्या आत सर्व रूपरेखा आणि कार्यक्रम उभा करण्यात आला. हाच कार्यक्रम म्हणजे चला हवा येऊ द्या. पुढे माऊली सिनेमा सुपर हिट झालाच, सोबत ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाचे स्थान ही प्रेक्षकांच्या मनात रुजू लागले होते. पुढे ते केवळ रुजले नाही तर आपलेसे झाले होते. केवळ एका सिनेमाच्या प्रमोशनसाठी म्हणून सुरू झालेला हा कार्यक्रम आज कित्येक वर्षे अव्याहतपणे चालू आहे.
एवढेच नव्हे तर हा कार्यक्रम एकसुरी असण्यापेक्षा वैविध्यपूर्ण असावा हे झीच्या टीमने, कार्यक्रमाचे सर्वेसर्वा निलेशजी अणि अर्थातच कलाकारांच्या संपूर्ण फळीने पाहिलं. त्याचमुळे चला हवा येऊ द्या, मग महाराष्ट्र दौरा, मग कधी सेलिब्रिटी पॅटर्न ते अगदी आत्ता चालू असलेलं लेडीज जिंदाबाद हे पर्व असे विविध प्रयोग या कलाकारसंचाने करून पाहिले. तसेच थुकरटवाडी एक गाव ते फार्महाऊस हा प्रयोगही आपल्या समोर आहेच. तसेच कलाकारांनीही वेळोवेळी वैविध्यपूर्ण भूमिकांतून आपलं मनोरंजन केलेलं आहेच. एकूणच काय, तर सुरू झाल्यापासून प्रेक्षकांच्या आवडीनिवडीनुसार हा कार्यक्रम बदलत गेला आणि म्हणून सातत्याने प्रगती करत राहिला. या कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून असलेले भाऊ कदम आणि कुशल बद्रिके हे केवळ लोकप्रिय कलाकार न राहता सुपरस्टार झालेले आहेत.
त्यांना तेवढ्याच उत्तम कलाकार असणाऱ्या श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, सागर कारंडे यांची साथ लाभली आहे. या कलाकारांसोबतच इतर कलाकारही या लोकप्रिय मंचावरून आपली कला लोकांसमोर सादर करत असतात. हा मंच नवनवीन मलिका, नाटकं, सिनेमे यांच्या प्रमोशनसाठी एक हक्काचं स्थळ बनला आहे. तसेच तेवढ्याच किंवा जास्त हक्काचं असं स्थान या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनात मिळवले आहे. कालानुरूप बदल स्वीकारणारा हा कार्यक्रम येत्या काळातही प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करत राहील आणि विविध पर्व आपल्या भेटीस घेऊन येईल हे नक्की. या कार्यक्रमाच्या संपूर्ण टीमला २०२१ हे वर्ष उत्तम भरभराटीचं जावो, हीच मराठी गप्पाच्या टीमची शुभेच्छा !