इंटरनेटचा वापर कोण कशा पद्धतीने करेल काही सांगता येत नाही. त्यात अफवा पसरविणे, बदनामी करणे, सोशल मिडिया अकाउंट हॅ क करणे यांसारख्या समाजविघातक गोष्टी सर्रास होताना दिसतात. कलाकारही यातून सुटत नाहीत. गेल्याच महिन्याच्या शेवटी शेवटी एका नवोदित मराठी अभिनेत्रीचं इंस्टाग्राम अकाउंट हॅ क झाल्याची बातमी आली होती. पैसे मागितले गेले होते आणि सायबर सेल मध्ये याविरुद्ध तक्रारही दाखल केली गेली होती. आणि हे प्रकरण संपतं न संपतं तोच अजून एका मराठी अभिनेत्रीला ऑनलाईन त्रासाला सामोरं जावं लागलं आहे.
ती अभिनेत्री आहे जुई गडकरी. पुढचं पाउल, सिंगिंग स्टार, बिग बॉस मराठी, वर्तुळ यांसारख्या मालिकांमधून लोकांच्या पसंतीस उतरलेली अभिनेत्री. तर झालं असं कि जुईचा फोटो असलेली एक सोशल मिडियावरची पोस्ट/जाहिरात फिरत होती. पण जुईचा या पोस्टशी लांबलांबचा संबंध नव्हता. ती पोस्ट होती, विधवा पुनर्विवाह संदर्भात. ज्यात जुईच्या फोटोसोबत सदर व्यक्ती विधवा असून पुन्हा लग्न करू इच्छिते आणि आर्थिकदृष्या सक्षम आहे असं दाखवलं गेलं होतं. एका सजग फॅनमुळे जुईच्या हि गोष्ट लक्षात आली. कोणत्याही व्यक्तीचा होईल तसा संताप संताप झाला जुईचा. तिने तसं तिच्या सोशल मिडिया पेज वर लिहिलं सुद्धा. त्याआधी तिने सदर फेसबुक पेजच्या admin ला मेसेजही केला आणि ठाणे सायबर सेलकडे तक्रारही केली.
सायबर सेल आपलं काम करते आहेच आणि योग्य कार्यवाहीसुद्धा ते करतील. जुईला तिच्या चाहत्यांकडून, सहकलाकारांकडून पाठींबा मिळतो आहेच तसेच प्रथितयश वृत्तसंस्थांनी सुद्धा याची दखल घेतली आहे. पण, काहींच्या बेशिस्त वागण्यामुळे अनेकांना मनस्तापाला सामोरं जावं लागतं हे दुर्दैवच. त्यातही कुठचाही संबंध वा सक्रीय सहभाग नसताना अशा गोष्टी होणं म्हणजे वेळेचा अपव्यय सुद्धा. तरीही जुई सारखी समंजस आणि खंबीर अभिनेत्री झालेल्या मनस्तापातून बाहेर येईलच आणि आपलं काम नेटाने करत राहील यात शंका नाही. तिला पुढील वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टीमकडून शुभेच्छा ! (Author : Vighnesh Khale)