चोर आणि चोरीचे किस्से आपण नेहमी ऐकतोच. आणि त्यात पण अतरंगी चोरांचे किस्से तर धमाल आणतात. घरफोडी करून त्याच घराच्या सी.सी.टी.व्ही. समोर नाचणारे चोर असोत किंवा ए.टी.एम पिन च्या नादात अडकलेले चोर असोत. चोरी करणं आणि ती लपवणं हे तर चोरांसाठी महत्वाचं असतं. पण एखादी गोष्ट सतत यशस्वी झाली तर माणसाला अति आत्मविश्वास होतो. आणि तोच नडतो. मग तो चोरच का असेना. असाच एक किस्सा झाला, नोएडा च्या गरि चौखडी भागात. दोन चोरांनी एका माणसाला बंदुकीचा धाक दाखवून लुटायचा प्रयत्न केला. बरं, बंदुकीच्या धाकामुळे त्या माणसाने स्वतः जवळ जे पैशाच पाकीट आणि मोबाईल होते ते त्यांना दिले. आणि कोणताही चोर करेल तेच त्यांनी केलं. ते पळून गेले.
चोरी झाल्यावर, त्या माणसाला पटकन काय करावं सुचेना. पण मग त्याने पोलिसांना याची माहिती दिली. चोरी झाल्यावर, आपले पैसे गेल्यावर माणसाला वाईट वाटतंच. तसच, याला हि वाईट वाटत होतं. आणि चोर पुन्हा आले तर माणूस गोंधळून जाणारच. तसचं झालं. ते चोर पुन्हा आले. तो माणूस पण हबकला. सगळे पैसे तर दिले होते. मग पुन्हा का आले? भीती वाटणारच. पण ते आले होते, ए.टी.एम. च पिन मागायला. पैसे काढताना त्रास नको म्हणून थेट त्याच माणसाजवळ आले. बरं, या वेळी त्या माणसाने त्यांना ते पिन दिलं. पण यावेळी त्याने पटकन, पोलिसांना कळवलं. पोलिसांना ताजी माहिती मिळाली. आणि मग मात्र त्यांनी अगदी कसून तपासण्या करायला सुरुवात केली.
अशीच तपासणी चालू असताना, पोलिसांनी दोन माणसाना तपासणी करून घ्यायला सांगितली. ते चोर होते. तर त्यांनी उलटून पोलिसांवर गोळीबार केला. मग मात्र पोलिसांनी त्यांना चोख प्रती उत्तर दिलं. चोर जखमी झाले आणि पकडले गेले. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या माहिती नुसार, त्या चोरांकडून, त्या पिडीत माणसाच्या पाकिटातील त्याचे ड्रायविंग लायसन्स, आधार कार्ड आणि आधी सांगितल्या प्रमाणे ए.टी.एम कार्ड हस्तगत केले. त्यांच्या कडे हत्यारही मिळाले. त्या माणसाचं नशीब बलवत्तर म्हणून सगळा ऐवज मिळाला, कि चोर बिनडोक म्हणून हे झालं हे आपलं आपण ठरवा. पण त्या चोरांचा अति आत्मविश्वास त्यांना नडला हे मात्र खरं.