स्टार प्रवाह या वाहिनीने अनेक उत्तमोत्तम मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आणल्या आहेत. अशीच एक मालिका म्हणजे ‘छ्त्रीवाली’. एक श्रीमंत घरचा बिघडलेला मुलगा आणि सामान्य घरातली शिस्तप्रिय मुलगी एकत्र आले तर काय, अशी या मालिकेची रूपरेषा होती. यात नम्रता प्रधान हिने मधुरा हि मुख्य भूमिका बजावली होती आणि विक्रम हि भूमिका संकेत पाठक याने. यातील नम्रता प्रधानचा गेल्या २१ सप्टेंबरला वाढदिवस झाला. तसेच तिच्या नवीन फोटोशुट्समधील काही फोटोज तिने गेल्या काही दिवसांत सोशल मिडीयावरती अपलोड केले आहेत. या निमित्ताने तिच्या कलाजीवनाचा घेतलेला आढावा.
खरं तर नम्रता हिला लहानपणापासून आपण अभिनेत्री झालो तर किती छान, असं वाटायचं. पण अभिनयातच करियर करायचं असा तिचा होरा नव्हता. घरातील आरशासमोर अभिनय करायची एवढंच. पण शिक्षण पूर्ण झाल्यावर तिने या आवडीचा थोडा गांभीर्याने विचार केला. काही ठिकाणी ऑडिशन्स दिल्या. त्यातली एक म्हणजे ‘छ्त्रीवाली’ या मालिकेसाठी. ऑडिशनसाठी तिने स्वतःचे फोटोज पाठवले. त्यावरून तिला लुक टेस्टसाठी बोलावण्यात आलं. दोनदा लुक टेस्ट झाल्यावर मधुरा या मध्यवर्ती व्यक्तिरेखेसाठी तिची निवड झाली. व्यक्तिरेखा हि एका शाळेत शिकवणाऱ्या शिक्षिकेची होती, म्हणजे शिस्तप्रिय, जबाबदार अशी. या व्यक्तिरेखेशी नम्रता स्वतःला जुळवून घेऊ शकली. कारण तिच्या म्हणण्यानुसातिच्यात मधुराप्रमाणे विचार करून निर्णय घेणं, तसेच घरच्यांना वेळ देणं हे काही गुण सामायिक आहेत. तिच्या याच एकरुपतेमुळे हि व्यक्तिरेखा ती जिवंत करू शकली आणि लोकप्रिय ठरली. हि पूर्ण मालिकासुद्धा लोकप्रिय ठरली. बेस्ट सिरीयलचा पुरस्कारही त्यांना मिळाला.
मालिकेप्रमाणेच नम्रताने सिनेमातही काम केलं आहे. ‘मिर्सेस देशमुख’ हे त्या सिनेमाचं नाव. हा एक कौटुंबिक पद्धतीवर भाष्य करणारा सिनेमा होता. मालिका आणि सिनेमा हे जवळपास एकाच काळात आल्याने नम्रताची धावपळ होत असे. ती तेव्हा कल्याणला परिवारासोबत राहत असे. पण पुढे शुटींगच्या वेळा पाळता याव्यात म्हणून कामानिमित्त तिला मुंबईत राहावं लागलं होतं. यावरून तिची कामाप्रती असलेली बांधिलकी दिसून येते. मालिका आणि सिनेमाबरोबरच तिने म्युझिक विडीयो मध्ये काम केलं आहे. नुकताच ‘सलाम हिंदुस्तान’ या रॅप प्रकारच्या गाण्यात तीने योगदान दिलं आहे. त्याआधी ती ‘काळजात ह्यो’ या गाण्यात ती झळकली होती. या गाण्याने युट्युबवर सोळा लाखांहून अधिक व्युज कमावले आहेत. नम्रताचं स्वतःचं असं युट्युब चॅनेल आहे. ज्यात ती स्वतःच्या आयुष्यातले काही महत्वाचे क्षण शेअर करत असते.
अभिनयाव्यतिरिक्त तिला गाण्याची खूप आवड आहे. गाण्यासोबतच तिला गिटार वाजवायालाही आवडतं. तिच्या हातावर तिने एका गिटारचा टॅटू गोंदवून घेतलेला आहे. तिला पेंटीगचीही आवड आहे. तिच्या युट्युब चॅनेलवर तिने स्वतः घरातल्या एका भिंतीवरील सुंदर नक्षी रंगवतानाचा विडीयो अपलोड केला होता. कलाकार म्हणून जगताना आयुष्य धावपळीचं असतं. पण तरीही ते आनंदात जगलं पाहिजे असं तिच्या कडे पाहून वाटतं. कारण तिचे असंख्य विडीयोज आपल्याला पाहायला मिळतात जिथे शुटींगच्या ब्रेक दरम्यान ती इतर कलाकारांसोबत कल्ला करताना दिसते. तसेच तिला जसं जमेल तसं सामाजिक कार्यातही ती हातभार लावताना दिसते. एका मुलाखतीदरम्यान तिने असं म्हटलं होतं कि तिला हिंदीत काम करायची इच्छा होती. तिचे नवनवीन फोटोशूट्स वेळोवेळी होत असतातही. त्यामुळे मराठी सोबतच ती हिंदीतही यापुढे काम करताना दिसल्यास आश्चर्य वाटायला नको. ती जिथे काम करेल तिथे उत्तम काम करेल एवढं नक्की. अशा या नवोदित आणि मेहनती अभिनेत्रीला मराठी गप्पाकडून पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !
(Author : Vighnesh Khale)