मलाईका अरोरा आपल्या फिटनेस आणि लुक्समुळे नेहमीच चर्चेत असते. मलाईका अरोरा बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयापेक्षा आयटम नंबर मुळे जास्त ओळखली जाते. मग ते ‘दबंग’ मधले ‘मुन्नी बदनाम हुई’, असो कि ‘हाऊसफुल २’ मधले ‘अनारकली डिस्को चली’ असो किंवा मग वेलकम मधील ‘होंथ रसिले तेरे होंथ रसिले’ असो. तिचे आयटम नंबर नेहमीच चर्चेत राहिले आहेत. किंबहुना चित्रपटापेक्षाही हे आयटम नंबरच जास्त सुपरहिट ठरले आहेत. ह्यापैकींच तिचे एक आयकॉनिक गाणे आहे जे बॉलिवूडमध्ये खूप सुपरहिट ठरले. जे लहानांपासून ते मोठ्यांच्या तोंडावर सहज येते. ते गाणं लागलं कि आपण सहज गुणगुणतो, होय ते गाणं म्हणजे ‘दिल से’ चित्रपटातलं ‘चल छैंया छैंया’. शाहरुख खान आणि मलाईका अरोराचे आयकॉनिक गाणे ‘छैंया छैंया’ हे खूप लोकप्रिय झाले. ह्या गाण्याची धून आजसुद्धा प्रत्येक पार्टीत ऐकायला मिळते. बॉलिवूडची लोकप्रिय कोरिओग्राफर आणि चित्रपटनिर्माती फराह खान हिने ह्या गाण्याला कोरिओग्राफ केले होते. खूपच कमी लोकांना माहिती असेल कि, मलाईकाला हे गाणे मिळण्याअगोदर ह्या गाण्यासाठी दोन अभिनेत्रींना विचारण्यात आले होते.
लोकप्रिय कोरिओग्राफर आणि चित्रपट निर्माती फराह खानने ह्या गोष्टीचा खुलासा केला कि, ह्या गाण्यासाठी बॉलिवूडच्या दोन लोकप्रिय अभिनेत्रींना संपर्क केला होता. गोवामध्ये आयोजित इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया (IFFI) मध्ये एका चर्चेदरम्यान फराह खानने सुद्धा भाग घेतला होता. ह्याच दरम्यान तिने ह्या गोष्टीमागचे गुपित उघडले. त्याचबरोबर तिने हे सुद्धा सांगिलते कि, हे गाणं करतेवेळी चित्रपटाच्या संपूर्ण टीमला कोण कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला होता. फराह खानने सांगितले कि, ‘आम्हांला स्टेशनवर शूट करण्याची परवानगी मिळाली नव्हती, त्यामुळे आम्ही हे गाणं ट्रेनच्या वर शूट केले. हे गाणं आम्ही ४ दिवसांत पूर्ण केले आणि ट्रेनवरून कोणीही खाली पडलं नाही. आम्ही ह्या गाण्यासाठी बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री घेण्याचे ठरवले होते. जिला चांगले नाचता सुद्धा येत असेल. त्यासाठी आम्ही शिल्पा शेट्टीला विचारले. परंतु तिने नकार दिल्यानंतर आम्ही रविना टंडनला सुद्धा गाण्यात नृत्य करण्यासाठी विचारले, परंतु तिने सुद्धा नकार दिला. त्यानंतर अनेक अभिनेत्रींनी ह्या गाण्यासाठी नकार दिला. शेवटी मलाईकाला विचारण्यात आले आणि ती ह्या गाण्यामुळे स्टार बनली.’ ह्या गाण्यानंतर मलाईकाला ‘छैंया छैंया गर्ल’ म्हणून ओळखली जाऊ लागली.
ह्याशिवाय फराह खानने आपल्या ‘ओम शांती ओम’ चित्रपटामधील ‘दिवानगी दिवानगी’ गाण्याबद्दलसुद्धा सांगितले. ह्या गाण्यात जवळजवळ तब्बल ३१ बॉलिवूड स्टार्स दिसले होते. परंतु तरी सुद्धा काही कलाकार ह्या गाण्यासाठी राजी झाले नाहीत. फराह ने सांगिलते कि तिला आमिर खानला ह्या गाण्यात घ्यायचे होते. ती म्हणाली कि, “मला आमिरला ह्या गाण्यात घ्यायचे होते. माझी अशी इच्छा होती कि गाण्यात एक दृश्य असे असेल, ज्यात तीनही खान एकत्र दिसतील. आमिरने मला दहा दिवसांपर्यंत त्रास दिला. त्याला ह्या गाण्यासाठी वेळ द्यायला जमले नाही, कारण त्यावेळी तो ‘तारे जमीन पर’ चित्रपटाचे एडिट करत होता.” आमिरने चार वर्षानंतर फराह खान ला सांगितले कि, त्याला ‘दिवानगी दिवानगी’ गाण्यात काम करायचे नव्हते. फराहने पुढे सांगितले कि ह्या गाण्यामध्ये ती सुपरस्टार दिलीप कुमार ह्यांना सुद्धा घेऊ इच्छित होती. ह्यामध्ये शाहरुख खान तिची मदत करणार होता. परंतु असं होऊ शकलं नाही.