मराठी गप्पाच्या टीमने कलाकार आणि त्यांच्या यशस्वी गोष्टींबाबत नेहमीच लेखन केलेले आहे. आमच्या नियमित वाचकांनी मराठी कलाकार आणि त्यांचे व्यवसाय या विषयीचे लेख नक्कीच वाचले असतील. त्याचप्रमाणे कलाकारांच्या इतर यशस्वी गोष्टी आपल्या पुढे मांडणे आवश्यक आहे, असे आमच्या टीमला वाटत आलेले आहे. याचाच एक भाग म्हणून आज आपण वाचणार आहात ते एका तरुण अभिनेत्रीविषयी. ही अभिनेत्री काही वर्षांपूर्वी बालकलाकार म्हणून प्रसिद्ध होती. तिची हिंदी विनोदी कार्यक्रमांतील गंगुबाई ही व्यक्तिरेखा खूप गाजली होती. तिने अनेक मालिकांमध्ये कामे करून फारच कमी वयात लोकप्रियता मिळवली. बालकलाकार असून देखील तिने भल्याभल्या कलाकारांची टिंगल सहज उडवून लोकांना हसवलं आहे.
होय, तुम्ही बरोबर ओळखलंत. सलोनी दैनी हे या अभिनेत्रीचं नाव. तिच्या निरागस अभिनयाने आणि विनोदाच्या उत्तम टायमिंगने प्रेक्षकांची मने जिंकली होती. सध्या ही बालकलाकार मोठी झाली असून, ती महाविद्यालयीन जीवन आणि कालाक्षेत्र यांचा ताळमेळ साधताना दिसते. पण गेल्या काही काळात तिच्या चाहत्यांना तिच्या जुन्या फोटोज मध्ये आणि आत्ताच्या फोटोज मध्ये फरक जाणवला असेल. याचं कारण, काही काळापूर्वी तिने स्वतःचं तब्बल २२ किलो वजन कमी केलेलं आहे. तिने एका प्रथितयश वाहिनीच्या युट्युब मुलाखतीत सांगितलं की, लॉक डाऊन काळात तिला जाणवलं कि तिचं वजन वयाच्या मानाने खूपच वाढलं आहे. आरोग्य आणि लुक्स या दोन्हींचा विचार करता तिने हे वाढीव वजन कमी करण्याचा निर्णय घेतला. मग स्वतःच्या आहारावर तिने नियंत्रण आणलं आणि व्यायामावर ही भर दिला. सातत्य असलं की यश मिळतंच. सलोनी याचं उत्तम उदाहरण. म्हणता म्हणता तिचं वजन कमी झालं, तिच्या लुक्स वर तिला पाहिजे तसा सकारात्मक परिणाम दिसून येऊ लागला. तिच्या चाहत्यांनी ही गोष्ट अनुभवली आणि तिचं कौतुकही केलं.
वर उल्लेख केल्याप्रमाणे सध्या सलोनी ही महाविद्यालयीन जीवन आणि कलाक्षेत्र यांचा ताळमेळ घालण्यात व्यस्त आहे. पण यातून ही वेळ काढून ती तिच्या सोशल मीडिया अकाउंट वरून चाहत्यांसाठी विविध असे गंमतीदार व्हिडियोज बनवत असते. त्यात काही वेळेस तिच्या पोस्ट्स मध्ये घरातील व्यक्ती, तिचा आवडता श्वान ही सामील असतो. कमी वयात सलोनी ने कलाक्षेत्रातील कारकिर्दीत बराच काळ व्यतीत केला आहे. या काळात तिच्या अभिनयात नेहमीच प्रगती होताना दिसली आहे. तिच्या कलाकृती याची साक्ष आहेत. तिने कॉमेडी सर्कस, नमुने, बडे भैय्या की दुल्हन, तेढि मेढि फॅमिली, येह जादू है – जीन का, या कार्यक्रमात भाग घेतला होता. यातील येह जादू हैं – जीन का हा तिचा नुकताच संपलेला कार्यक्रम. त्यात तिने फराह खान अशी व्यक्तिरेखा साकार केली होती. येत्या काळातही ही तरुण अभिनेत्री केवळ गंगुबाईच नाही तर इतर भूमिकाही लोकप्रिय करेल हे नक्की. तिच्या पुढील वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टिमकडून मनःपूर्वक शुभेच्छा !