काही सिनेमांची नुसती नावं जरी घेतली ना तरी नॉस्टॅलजिक व्हायला होतं. जत्रा हा तसाच एक सिनेमा. ह्यालागाड – त्यालागाड गावांच्या चिमटीत सापडलेल्या मित्रांची गोष्ट. अल्बत्त्या गलबत्त्या म्हणत या मित्रांच्या टोळीने प्रेक्षकांना वेड लावलं. त्यात भरतजी जाधव आणि सिद्धार्थ जाधव यांच्या मुख्य भूमिका होत्याच आणि सोबत होते अवलीया कलाकार. यातल्याच एका कलाकाराला आपण जवळपास दररोज टेलीविजनवर पाहतो. त्याच्या आंगिक अभिनयाने आणि विनोदाच्या टायमिंगने त्याचे चाहते होतो आणि त्याला दाद देतो. जत्राच्याही आधी पासून त्याचा प्रवास सुरु झाला होता. तिथपासून ते आजतागायत त्याच्यात खूप बदल झाले आहेत. केवळ सहकलाकाराच्या भूमिकेत न राहता तो स्वतः एक लोकप्रिय सेलिब्रिटी झाला आहे. आज याच गुणी कलाकाराविषयी थोड्याश्या गप्पा. पण त्याआधी खाली दिलेल्या फोटो मधून आपण कोणाविषयी गप्पा करणार आहोत याचा अंदाज येतोय का बघा?
आज आपण ज्यांच्याविषयी वाचणार आहोत त्या कलाकाराचं नाव आहे कुशल बद्रिके. होय होय, आपल्या सगळ्या प्रेक्षकांचे लाडके कुशल बद्रिके. ‘चला हवा येऊ द्या’ मधले कोणतेही स्कीट असो, ‘स्ट्रगलर साला’चे तीनही सीजन असोत, पण कुशल आल्याशिवाय त्या त्या एपिसोड्सना तडका मिळत नाही हेच खरं. अभिनेता म्हणून निरीक्षण शक्ती जशी लागते तसचं, ज्याचं निरीक्षण केलं आहे त्या गोष्टी सादर करण्याचं कसबही लागतं. कुशल यांच्याकडे नेमके हेच दोन्ही गुण अगदी ठासून भरलेले आहेत. त्याचमुळे अभिनय क्षेत्रात स्वतःची अशी वेगळी छाप सोडण्यात कुशल यांना यश आलं आहे, असं म्हणता येईल. कारण त्यांचा अभिनयाचा प्रवास सुरु झाला तेव्हा पाठीवर अनुभवाचे बोल सांगायला तसं फारसं जवळ कुणीही न्हवतं. कारण, घरातून अभिनय क्षेत्राशी निगडीत कोणीही न्हवतं. पण स्वतः मधल्या अभिनेत्याची जाणीव कुशल यांना होती. आणि या अभिनेत्याला पैलू पाडण्याचं काम त्यांनी सुरु केलंच होतं. एकांकिका असोत व नाटकं. जे काम मिळेल ते काम करत त्यांनी प्रवास सुरु केला होताच. त्यांनी जागो मोहन प्यारे, लाली लीला हि नाटकं केली. त्यातील त्यांच्या भूमिकांचं कौतुकही झालं.
काम चांगलं केलं कि यशाची दारं किलकिली व्हायला लागतात. तसं होऊ लागलं होतं. बकुळा नामदेव घोटाळे, जत्रा, खेळ मांडला यांसारख्या चित्रपटातून त्यांनी भूमिका केल्या. त्या लक्षातही राहिल्या. पण प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात एक मैलाचा दगड येणं महत्वाचं असतं जेथून त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळते. तसचं झालं, जेव्हा कुशल यांना ‘फु बाई फु’ मध्ये काम करायची संधी मिळाली. नाटकं, सिनेमे यांतील भूमिका या त्या त्या गोष्टीपुरत्या मर्यादित राहतात. वेळही कमी असतो. पण स्किट्स करताना मात्र विविध भूमिका करता येतात. म्हटलं तर आव्हान, म्हटलं तर आनंद. कितीही संकटं आली तरीही आयुष्य आनंदात, हसत जगायचं असा फंडा असलेल्या कुशल यांनी आपलं सगळं कसब पणाला लावलं. अंगीक अभिनय, मिमिक्री, नृत्य आणि विनोदाचं टायमिंग या जोरावर त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. पुढे ‘चला हवा येऊ द्या’ सुरु झाल्यावर त्यांचा विचार न होता तर नवलच. त्यांची निवड झाली आणि त्यांनी ती सार्थही ठरवली ती आजतागायत. चला हवा येऊ द्या चे विविध सीजन झाले आणि त्या प्रत्येकात, त्यांनी प्रेक्षकांना आनंदी केलं.
सदैव प्रेक्षकांना हसवता हसवता, स्वतःच्या आयुष्यातील धडपड मात्र त्यांनी कधी जाणवू दिली नाही. पण त्यांच्या या धडपडीत त्यांना अगदी मनापासून साथ लाभली ती त्यांच्या बायकोची म्हणजे सुनयना यांची. कुशल यांच्याप्रमाणे सुनयना या सुद्धा कलाक्षेत्राशी निगडीत आहेत. त्यांनी कुशल यांच्या बरोबर नाटकातून कामे केली आहेत. तिथेच त्यांच्या मनाच्या तारा जुळल्या ते आजतागायत. कुशल काम करत होते पण प्रसिद्धी न्हवती त्या काळापासून ते प्रसिद्धीच्या यशोशिखरापर्यंत सुनयना यांनी कुशल यांना खंबीर साथ दिली आहे. कुशलहि त्यांना तशीच साथ देत आले आहेत. सुनयना या स्वतः उत्तम नृत्यांगना आहेत आणि कथक शिकल्या आहेत. त्यांच्या या कलेला कुशल यांनी सदैव पाठींबा दिला आहेच. शून्यातून विश्व उभारतात कसं याचं हे दोघे उत्तम उदाहरण. पण म्हणून त्यांच्या डोक्यात हवा गेलेली नाही. किंबहुना त्यांचे पाय अजूनही जमिनीवर आहेत. पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पुराच्यावेळी सगळ्यांनी मदत करावी म्हणून पुढाकार घेणाऱ्या सेलेब्रिटीजमध्ये कुशल होते.
आजही प्रसिद्धीच्या शिखरावर असताना, कुशल तेवढीच मेहनत घेताना आपल्याला दिसतात. ‘चला हवा येऊ द्या’ चालू आहेच. सोबत त्यांनी काही नवीन सिनेमे केले. मंकी बात, लूज कंट्रोल, रंपाट, बायोस्कोप हे त्यातलेच काही. बायोस्कोप मध्ये तर त्यांनी त्यांच्या विनोदी अंगाला छेद देणारी व्यक्तिरेखा साकारली होती. येत्या काळात त्यांच्या कडून असेच प्रयत्न होतील आणि विनोदी भूमिकांसोबतच या हरहुन्नरी कलाकाराच्या इतरही पद्धतीच्या भूमिका पाहायला मिळतील यात शंका नाही. हसते रेहनेका म्हणत आपल्याला सतत आनंदी करणाऱ्या या कलाकाराची स्वप्न येत्या काळातही पूर्ण होवोत आणि ती होतीलच. कारण खुद्द कुशलचं म्हणतात, स्वप्न पूर्ण होतात, फक्त विश्वास ठेवता यायला हवा त्यांच्यावर! अशा या गुणी अभिनेत्याला पुढील वाटचालीसाठी मराठी गप्पा टीमतर्फे खूप खूप शुभेच्छा !
(Author : Vighnesh Khale)