Breaking News
Home / मनोरंजन / जपानची हि युट्युबर चक्क मराठी आणि हिंदी बोलते, व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हीसुद्धा थक्क व्हाल

जपानची हि युट्युबर चक्क मराठी आणि हिंदी बोलते, व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हीसुद्धा थक्क व्हाल

भारत या आपल्या देशाबद्दल परदेशी व्यक्तींना असलेलं आकर्षण हे शतकानुशतके चालत आलेलं आहे. या आकर्षणातूनच भारतात अनेक परदेशी प्रवासी, नागरिक येऊन गेले आहेत. त्यांनी लिहिलेली प्रवास वर्णन आजही आपल्या गतकाळातील संस्कृतीची आठवण करून देतात. असं असलं तरीही या आपल्या महान देशाबद्दल परदेशी नागरिकांना असलेलं आकर्षण काही केल्या कमी होत नाही. किंबहुना नव्या शतकात जसजसं जग जवळ येत गेलं आहे, अनेक परदेशी नागरिक आपल्या भारतात येऊन इथली संस्कृती जाणून घेण्याचा प्रयत्न करताना दिसतात.

आता तर इंटरनेटच्या अवाढव्य प्रसारामुळे सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. त्यातून अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना आपल्या भेटीस आले आहेत. यातील अनेकांनी केवळ भारत आणि त्यांचा देश यांना डोळ्यासमोर ठेवत स्वतःची सोशल मीडिया अकाऊंट बनवली आहेत. आपल्यातले बरेच जण सोशल मीडिया वर असतात त्यामुळे आपल्या डोळ्यांसमोर आता अनेक जणांची नावं तरळून जात असतील. यातलं एक नाव तर हमखास आपल्या डोळ्यांसमोर आलं असेल. हे नाव म्हणजे जपानची मायो.

ही मूळची जपानी असलेली युट्युबर साधारण दोन ते तीन वर्षांपूर्वी युट्युब वर व्हिडियोज पोस्ट करती झाली. त्यानंतर तिच्या युट्युब व्हिडियोज ना जी काही पसंती मिळत गेली ती आजतागायत. एवढी पसंती मिळाली की bbc news यांच्या हिंदी आणि मराठी चॅनेल वरून तिची मुलाखत दाखवली गेली. पण त्यांना असं का करावंसं वाटलं असावं ? उत्तर आहे मायो ने तिच्या युट्युब चॅनेलच्या व्हिडियोज मधून भारत आणि जपान या दोन्ही संस्कृतींना जवळ आणण्याचा केलेला कौतुकास्पद प्रयत्न. तसेच अजून एक कौतुकाची बाब म्हणजे मायो ही अगदी अस्खलित हिंदी बोलू शकते. याचं कारण तिने ओसाका आणि दिल्ली येथील विश्वविद्यालयातून हिंदीचे धडे गिरवले आहेत.

या तिच्या हिंदी भाषेच्या शिक्षणामागे तिच्या वडिलांनी दिलेली शिकवण ही प्रेरणा असल्याचं तिच्या bbc ला दिलेल्या मुलाखतीतुन कळतं. पुढे तिने एके ठिकाणी काम करणं ही सुरू केलं. पण भारताविषयी असलेली ओढ तिला स्वस्थ बसू देईना.

इथे राहत असताना तिची भारतीय संस्कृतीच्या विविध पैलूंशी अगदी जवळून ओळख झाली. त्यात मग हिंदी भाषा ही प्रामुख्याने आली. तसेच इथलं राहणीमान, इथली खाद्य संस्कृती, सण आणि उत्सव आणि अर्थात माणसं यांची अगदी जवळून ओळख झाली. या सगळ्यांचं प्रतिबिंब तिच्या व्हिडियोज मध्ये दिसून येतं. तिचा पहिला व्हिडियो हा मुळात तिची ओळख करून देणारा होता. त्यात अस्खलित हिंदी भाषेचा वापर करत संवाद साधला होता यावरून त्याची कल्पना यावी. आज या गोष्टीला अदमासे दोन ते तीन वर्षे झाली असतील.

या काळात तिने अनेक उत्तमोत्तम व्हिडियोज बनवले आहेत. जापनीज संस्कृतीची ओळख भारतीयांना आणि भारतीय संस्कृतीची ओळख जपानी नागरिकांना करून देण्याचं तिचं काम सुरू असतं. या काळात तिच्या युट्युब चॅनेल्सच्या सबस्क्रायबर्सची संख्या जवळपास दहा लाखांच्या पल्याड गेली आहे. तसेच तिने हिंदी सोबत गुजराती भाषा शिकण्याचा ही प्रयत्न केल्याचं ती एका व्हिडियोत सांगते.

तसेच bbc ला दिलेल्या मुलाखतीत तिने मराठीतही एक वाक्य म्हणण्याचा प्रयत्न केला आहेच. तसेच तिला जापनीज व्यतिरिक्त इंग्रजी, इंडोनेशियन भाषा ही उत्तम येतात. अशी ही मायो तिच्या व्हिडियोज मधून नियमितपणे आपल्याला भेटत असते. आजच्या आपल्या या लेखातून आमच्या टीमने या लोकप्रिय युट्युबरच्या कारकिर्दीचा थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे.

आमच्या टीमचा हा एक नवीन प्रयत्न आहे. आमचा हा नवीन प्रयत्न आपल्याला भावला का हे नक्की सांगा. त्यासाठी नेहमीप्रमाणे आपण आमच्या कमेंट्स सेक्शन मध्ये आपल्या प्रतिक्रिया आणि सकारात्मक सूचना देऊ शकता. आपल्या या दोन्ही गोष्टी आम्हाला अनेक नवनव्या बाबी शिकवतात आणि प्रोत्साहन ही देतात. तेव्हा आपलं हे प्रोत्साहन आम्हाला अबाधितपणे मिळत राहू दे. आपला आमच्या टीमशी असलेला स्नेह असाच वृद्धिंगत होत राहो हीच सदिच्छा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *