Breaking News
Home / मराठी तडका / जयदीप खऱ्या आयुष्यात कसा आहे पहा, पत्नी आहे हिंदी अभिनेत्री

जयदीप खऱ्या आयुष्यात कसा आहे पहा, पत्नी आहे हिंदी अभिनेत्री

सुख म्हणजे नक्की काय असतं विचारत लोकांच्या मनात घर केलंय ते एका नवीन मालिकेने. यातील गौरी आणि जयदीप या मध्यवर्ती भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. गिरीजा प्रभू आणि मंदार जाधव यांनी गरीब घरातील मुलगी आणि श्रीमंत घरातील मुलगा हि पात्र खूप छानरित्या वठवली आहेत. यातील मंदार जाधव यांना आपण त्यांच्या ‘श्री गुरुदेव दत्त’ मालिकेतील प्रमुख भूमिकेसाठीही ओळखतो. पण त्यांचा यशस्वी अभिनय प्रवास कित्येक वर्षे आधी सुरु झाला आहे. आज त्यांच्या याच प्रवासाविषयी थोडसं. मंदार यांनी ‘श्री गुरुदेव दत्त’ या मालिकेतील दत्तगुरूंची भूमिका वठवताना आपला सगळा अनुभव आणि अभिनय कौशल्य पणाला लावलं होतं. याचमुळे प्रेक्षकांना मंदार या भूमिकेसाठी अगदी योग्य वाटले आणि त्यांची भूमिकेसाठी प्रशंसा झाली. पण हे झालं नजीकच्या काळातलं.

याआधी त्यांनी ‘महावीर हनुमान’ मालिकेतील श्रीरामांची पौराणिक व्यक्तिरेखा साकारली होती. तसचं ‘वीर शिवाजी’ या छत्रपती शिवाजी महाराजांवरील हिंदी मालिकेचाही ते भाग होते. त्यांनी या ऐतिहासिक भूमिकांबरोबरच इतरही लोकप्रिय भूमिका केल्या आहेत. मंदार यांनी २००७ साली केलेल्या ‘अल्लादिन’ च्या भूमिकेसाठी त्यांना भारतभरातून लहान मुलाचं प्रेम मिळालं होतं. आजही हि व्यक्तिरेखा करायला मिळाल्याबद्दल मंदार नेहमीच आपली कृतज्ञता व्यक्त करतात. या लोकप्रिय व्यक्तिरेखांबरोबरच त्यांनी ‘से सलाम इंडिया’, ‘बालिका वधू’, ‘पवित्र रिश्ता’, ‘रजिया सुल्तान’, ‘प्यार का दर्द’, ‘रूप’ याकलाकृतींमधून अभिनय केला होता. ‘से सलाम इंडिया’ हा तर त्यांचा पदार्पणाचा चित्रपट.

कोणतीही चांगला कलाकार भूमिका करताना त्या भूमिकेनुसार जे जे गरजेचं आहे ते ते स्वतः करत असतो. मंदार हे याच पठडीतलं नाव म्हणायला हरकत नाही. कारण रजिया सुल्तान मधील प्रिन्स इक्बाल असो वा दत्तगुरूंची भूमिका. अभिनयाबरोबरच या मालिकांमधील स्टंट्सही त्यांनी स्वतः केले आहेत. हिंदीत काम करत असताना मायबोली मराठीत काम करावं अशी त्यांची खूप मनापासून इच्छा होती, जी पूर्ण झाली ती ‘श्री गुरुदेव दत्त’ या मालिकेने. मालिका, सिनेमा या माध्यमांबरोबरच ते काही म्युजिक विडीयोजचा सुद्धा भाग होते. त्यांना हा अभिनयाचा वारसा मिळाला आहे त्यांचे वडील श्री. सुभाष जाधव यांच्याकडून. सुभाषजी हे कलाक्षेत्रात लेखन, अभिनय आणि दिग्दर्शनासाठी प्रसिद्ध आहेत. तसेच मंदार यांचे बंधू मेघन हे सुधा उत्तम अभिनेतेही आहेत.

त्यांनी आपल्या बंधुप्रमाणेच पौराणिक भूमिका वठवली आहे. त्यांनी ‘जय श्री कृष्णा’ या मालिकेत श्रीकृष्णाची मध्यवर्ती भूमिका बजावली आहे. तसचं नव्याने दाखल झालेल्या ‘तेरा यार हु मै’ या नवीन मालिकेतही ते काम करत आहेत. तसचं, मंदार याचं लग्न झालंय मितिका शर्मा यांच्याशी. त्याही उत्तम अभिनेत्री आहेत. या दोघांना दोन गोंडस मुलं सुद्धा आहेत. मितिका या ‘देवो के देव महादेव’, ‘ख्वाहिश’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांचा भाग राहिल्या आहेत. एकूण काय, तर संपूर्ण जाधव कुटुंब रंगलंय अभिनयात असं म्हणायला हवं. किंबहुना याचा सुंदर अनुभव मंदार यांना फॉलो करणाऱ्यांना आला असेल. कारण टाटा स्काय च्या जाहिरातीमध्ये संपूर्ण जाधव कुटुंबाने भाग घेतला होता. यात प्रसिद्धी पासून दूर असणाऱ्या मंदार यांच्या आईसुद्धा होत्या. या जाहिरातीचं शुटींग मेघन यांनी केलं होतं.

सतत काम करत राहणं म्हणजे कोणत्याही कलाकारासाठी आव्हानच. त्यातही अनेक ऐतिहासिक भूमिका साकारताना मनावर ताण हा येतोच. पण या सगळ्यांवर मंदार मात करतात, कारण फिटनेस हा त्यांच्या आयुष्याचा महत्वपूर्ण भाग आहे. खरं तर एवढ्या व्यस्त वेळापत्रकात व्यायामावर दुर्लक्ष होऊ शकते, पण मंदार मात्र त्यात खंड पडू देत नाहीत. सेट वरसुद्धा वेळात वेळ काढून व्यायाम करत ते स्वतःला फिट ठेवतात. सकस आहार आणि चांगले विचार यांनाही व्यायामाबरोबरच महत्वाचं स्थान आहे असं ते मानतात. याच त्यांच्या फिटनेसमुळे एका प्रथितयश वर्तमानपत्राने तयार केलेल्या यादीत महाराष्ट्रातील आकर्षक पुरुषांच्या यादीत त्यांना स्थान दिलं होतं. उत्तम अभिनय, काम करतानाचं सातत्य यामुळे त्यांनी मनोरंजन क्षेत्रात त्यांनी स्वतःची एक जागा बनवली आहे. उत्तमोत्तम भूमिका त्यांनी गेल्या काळात केल्या आहेतच. त्याच प्रमाणे येत्या काळातही त्यांच्याकडून केल्या जाणाऱ्या भूमिकांना न्याय मिळेल यात शंका नाही. तर अशा या कुशाग्र अभिनेत्याला येत्या काळासाठी टीम मराठी गप्पा कडून खूप खूप शुभेच्छा !
(Author : Vighnesh Khale)

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.