जय जय स्वामी समर्थ ही मालिका काही काळापूर्वी टीव्हीवर दाखल झाली आणि प्रेक्षकांचा ओढा या मालिकेकडे आपसूक वळू लागला. त्यात कलाकारांच्या उत्तम अभिनयामुळे या मालिकेची लोकप्रियता वाढण्यास मदत होत आहे. यातील स्वामी समर्थांची मध्यवर्ती व्यक्तिरेखा अक्षय मुदवाडकर यांनी साकार केलेली आहे. याविषयी एक लेखही आमच्या टीमने केला होता. या मालिकेच्या ट्रेलर्स मध्ये अक्षय सोबतच अजून एक कलाकार महत्वपूर्ण व्यक्तिरेखा म्हणून पुढे आली होती. या व्यक्तिरेखेचं नाव चंदा आहे असं नंतर कळलं. पहिल्या भागापासूनच या व्यक्तिरेखेने स्वतःचा ठसा प्रेक्षकांच्या मनावर उमटवला आहे. ही व्यक्तिरेखा साकार केली आहे उदयोन्मुख अभिनेत्री विजया बाबर हिने. विजया ही एक अष्टपैलू कलाकार. तिला अभिनयासोबत नृत्य आणि रंगभूषा यांचीही अतिशय आवड आहे.
या तिच्या आवडीच्या कला तिने स्वतःचं शिक्षण सांभाळून अगदी निगुतीने जपल्या आहेत. महाविद्यालयीन जीवनात तिने अनेक स्पर्धांमधून भाग घेतला आहे. यात अभिनय, नृत्य यांचा प्रामुख्याने समावेश होताच. सोबत तिला मेकअप करण्याची आणि फॅशन क्षेत्राचीही आवड आहेच. फॅशनविषयीच्या या आवडीमुळे तिने अनेक सौंदर्यस्पर्धांमधून भाग घेतलेला आहे. कौतुकाची बाब अशी की तिने या वेगवेगळ्या कलाप्रकारातील स्पर्धांमध्ये पारितोषिकं मिळवली आहेत. नवी मुंबईच्या प्रसिद्ध ब्लिस झेस्ट या स्पर्धेतील ‘मिस ग्लॅमरस अँड स्टायलिश’ हा किताब तिने पटकावला होता. ‘बेस्ट स्माईल क्वीन’ महाराष्ट्र २०१८ हा किताबही तिने पटकावला आहे. पण ही पारितोषिकं केवळ महाविद्यालयीन स्पर्धामध्ये मिळाली आहेत अशी नाही. तर झी मराठीच्या नाट्यगौरव पुरस्कारांच्या वेळी तिची महत्वपूर्ण भूमिका असलेल्या ‘शिकस्त ए इश्क’ या प्रायोगिक नाटकाला पारितोषिक मिळालं होतं. तिच्या ‘सिंड्रेला’ या नाटकांचंही असंच कौतुक झालं होतं. नाटकांसोबतच तिने ‘तू कहा’, ‘जिंदगी’ या म्युझिक व्हिडियोजमध्येही तिने अभिनय केलेला आहे.
सध्या ती ‘जय जय स्वामी समर्थ’ या मालिकेत व्यस्त आहे. तिने नुकताच मालिकेतील एक बालकलाकार असलेल्या नित्य पवार सोबत एक गोड फोटो शेअर केला होता. अभिनयासोबच वर उल्लेख केल्याप्रमाणे तिला मेकअपचीही आवड आहे. तिच्या सोशल मीडिया पोस्ट्स वरून तिची ही आवड नक्कीच जाणवून येते. तसेच अजून एक गोष्ट जाणवते ती म्हणजे तिचा नावाप्रमाणे विजेता असण्याचा स्वभाव. तिच्या एका सोशल मीडिया पोस्ट मध्ये आपल्याला हे पाहायलाही मिळते. त्यात ती म्हणते, जो पर्यंत तुम्ही स्वतःला विजेता आहात याप्रमाणे पाहत नाही, तोपर्यंत तुम्ही विजेता असल्याप्रमाणे परफॉर्म करु शकत नाही. हाच स्वभाव तिच्या प्रत्येक क्षेत्रातील कामातून दिसून येतो आणि तिच्या आजवरच्या यशाचं हेच रहस्य असावं. तिने यापूढेही असाच विजेता असण्याचा स्वभाव टिकवून ठेवावा आणि प्रत्येक क्षेत्रात यश मिळवावे ह्या मराठी गप्पाच्या टिमकडून विजेताला शुभेच्छा !