मराठी मनोरंजन वाहिन्यांवर सातत्याने नवनवीन मालिका आपल्या भेटीस येत असतात. अनलॉक च्या काळात आपण अनेक मालिकांना दाखल होताना पाहिलं आहे. यात नवीन वर्ष सुरू झाल्याबरोबर वाहिन्यांनी अजून काही नवीन मालिका आपल्या भेटीस आणल्या आहेत. यातील एक मालिका म्हणजे स्वामी समर्थ यांच्या जीवनचरित्रावर आधारित ‘जय जय स्वामी समर्थ’ ही मालिका. महाराष्ट्रच नव्हे तर अखंड भारतवर्षात ज्यांना पूज्य मानलं जातं, त्या स्वामी समर्थांविषयी मालिका येणं यामुळे त्यांच्या भक्तगणांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं होतं आणि आहे. यात अर्थातच उत्सुकता होती ती स्वामी समर्थांची मध्यवर्ती भूमिका कोण साकारणार याची.
मालिकेच्या प्रोमोजमधून या उत्सुकतेला उत्तर मिळालं. अक्षय मुदवाडकर या अभिनेत्याने ही मध्यवर्ती व्यक्तिरेखा साकार केली आहे. अक्षय हा मुळचा नाशिकचा. त्याला अभिनयाची आवड पहिल्यापासून. त्यामुळे तो रंगभूमीच्या संपर्कात आला आणि इथेच रमला. त्याने अनेक हौशी, प्रायोगिक आणि व्यवसायिक नाटकांतून अभिनय केलेला आहे. यात गां’धी’ह’त्या आणि मी, द लास्ट व्हॉ’इसरॉय या नाटकांचा समावेश होतो. यातील त्याचं यश वाखाणण्याजोगे आहे. त्याने सातत्याने आपल्या अभिनयासाठी पारितोषिकं मिळवलेली आहेत. नाटकांसोबतच तो मालिका क्षेत्रातही रमला आहे. त्याने ‘स्वराज्य जननी जिजामाता’ या मालिकेत एक महत्वाची व्यक्तिरेखा साकार केली होती. त्याचं अभिनय कौशल्य हे आता स्वामींच्या भूमिकेतून अजून तावून सुलाखून निघेल हे निश्चित. अक्षय हा सोशल मिडियावरती जास्त दिसत नाही. पण त्याची युट्युबवर मात्र गंमतीशीर व्हिडियोजच्या माध्यमांतून हजेरी असते.
त्याचं स्वतःचं एक चॅनेल त्याने सुरू केलेलं आहे. त्यात त्याने आपल्या बायको, अभिनय क्षेत्रातील मित्रमंडळी आणि त्यांच्या घरचे यांच्यासोबत विविध मजेशीर व्हिडियोज बनवले आहेत. रोजच्या जीवनातले गंमतीशीर प्रसंग यातून रेखाटण्याचा यशस्वी प्रयत्न या माध्यमांतून केलेला आहे. याचप्रमाणे आणि विविध माध्यमांतून येत्या काळात वेळोवेळी त्याच्याकडून वैविध्यपूर्ण कलाकृती पाहायला मिळतील हे नक्की. त्याच्या या पुढील वाटचालीत स्वामी समर्थ त्यास यश देवो आणि त्याची वाटचाल अजून यशस्वी होवो या मराठी गप्पाच्या टीमच्या शुभेच्छा ! तसेच मित्रांनो आपल्या मराठी गप्पावरील लेखांना तुमचा मिळत असलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. तुमचे प्रेम असेच राहू द्या, आम्ही नवीननवीन विषय घेऊन तुमच्या भेटीस येत राहू.