बायकोचा महिमा तर कोण गात नाही, तर तो गावाच लागतो आणि जो नाही गात तो साधू संत बनतो. म्हणजे काय? ज्याला बायको आहे त्याला त्याच्या बायकोचा महिमा गाण्या शिवाय पर्याय नाही. नाहीतर संसार सुखाचा कसा होईल? आणि ज्याने बायकोचा महिमा गायला नाही! त्याचा संसार सुखी झाला असा एक जणही आत्तापर्यंत सापडलेला नाही. याउलट बायकोच्या चुका दाखवणारही तेच आहेत. बायकोच्या चुका दाखवाल तर तुमची काही खैर नाही आणि बायकोची चूक झाली असेल तर ती तुम्ही स्वतःची म्हणून मान्य केली नाही, तरीही तुमचा संसार सुखाने चाललाय असं काही होणार नाही. आता या सगळ्यात आपण नेमके कुठल्या कॅटेगरीतले आहोत ते जा त्या नवऱ्याने त्याचा त्याचं ते समजायचं. आमचं काही प्रयोजन आत्ता मात्र नाही, पण विषय असा आला की एका पती देवानं आपल्या पत्नीवर आरती आणि प्रार्थनाच लिहून टाकली आणि सोबत आपला मोबाईल नंबर ही जोडून टाकला. आता मोबाईल नंबर दिल्यावर आम्ही पण काही शांत बसणारे कार्यकर्ते मंडळी नाही.
आम्हीही फोन लावला तर खरोखरच समोरून अमरावतीला राहणारे सिद्धार्थ रामचंद्र सोनवणे यांना फोन लागला आणि त्यांना हटकलं. काय हो तुम्ही बायकोवर आरती लिहिली आहे म्हणे! आणि ती खूप वायरल झाली… तर त्यांनी आम्हाला पुन्हा आरती ऐकवून दाखवली. व्हायरल व्हिडिओपेक्षा भन्नाट काही गोष्टी त्यांनी आम्हाला सांगितल्यात त्या तुम्हाला सांगतो. सुरुवातीला व्हिडिओमध्ये म्हटलेल्या गोष्टीबद्दल आम्ही सोनवणे तात्यांना विचारलं त्यावर तात्या म्हणाले की, “आजकालच्या सुनबाई या आपले गणगोत ओठ्यात आणि इतरांचे गणगोत गोठ्यात अशाप्रकारे वागणूक देत असतात. स्वतःची मंडळी आली की त्यांच्या साठी पंचपक्वान्न केली जातात पण इतर कोणाच्या ओळखीचे पाहुणे आले की घरातले डबे खाली होतात.” असा मिश्किल टोला त्यांनी लगावला. या सगळ्याच बायकांचा लीला त्यांनी एका आरतीतून गाऊन दाखवले आहेत. त्यासाठी आपल्या बायकोला ते पत्नीमाता असं संबोधित करतात. आरती सुरू असताना बऱ्याच कोपरखळ्या चिमटे आणि टोले शाल जोडीतून ते बायकोला जातात. असं वाटू लागतं की बायकोची ही स्तुती सुरू आहे! पण बारकाईने लक्ष दिल तर कळतं की जो काही तोंड दाबून लाथा बुक्क्यांचा मार नवऱ्याने आजपर्यंत सहन केलाय त्याचीच परतफेड नवरोबा आता करतायत की काय असं एकंदरीत वाटू लागतं. नवरोबाच्या याच लीलांनी अगदी बायकोचेही मन जिंकून घेतले. संपूर्ण आरती ऐकून पोट दुखतं वर बायकोही खो-खो हसू लागली.
नवरोबांनी आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला आरतीतून कशी वाचा फोडली ते बघूया. सर्वात आधी ते म्हणतात की, “जय देवी जय देवी जय पत्नी माते, तुझे अवगुण पाहता शरण मी येते”, असं काहीसं विनोदी पण तितकाच मार्मिक. जे काही शब्द या नवरोबांना आरती मध्ये गुंतवले आहेत, बायकोच्या चुका नेमकेपणानं यमकामध्ये बसवण्याची कला सोनवणे तात्यांना जमली आणि त्यांनी शाल जोड्यातून समस्त नवरे मंडळींची जी भावना मांडून टाकली त्याला तोड नाय. बायकोचा रुसणं फुगणं आणि तिच्या स्वभाव वैशिष्ट्याचं अगदी चपखल वर्णन सोनवणे तात्यांनी केलं. आता सगळंच कसं बायकोवर खापर फोडायचं म्हणून ज्या दैवी पुरुषानं त्यांची सोयरीक जुळवली त्यालाही तो मध्ये आणतो आणि बायकोची तक्रार त्याच्याकडे केली की कशाप्रकारे तो हात झटकतो याचं वर्णनच घालीन लोटांगणमध्ये करतो. सोयरीक जुळवणारे कसे तुम्ही हुंडा घेतला म्हणून ही बायको मिळाली, हे सांगून बाजूला होतात ही व्यथा देखील सोनवणे तात्यांनी मांडली.
बघा व्हिडीओ :