मराठी मनोरंजन क्षेत्रातील एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे आशालताजी वाबगावकर. त्यांनी संगीत नाटक, चित्रपट, मालिका अशा विविध माध्यमांतून कित्येक दशके, प्रेक्षकांना आपल्या अभिजात अभिनयाने – गायकीने आनंद दिला. आज सकाळी त्यांचं सातारा येथे पहाटे कोविड -१९ मुळे दुःखद निधन झालं. त्यांच्या निधनाने झालेली पोकळी भरून न निघणारी आहे. त्यांच्यासारख्या ज्येष्ठ अभिनेत्रीच्या निधनाने मराठी मनोरंजनविश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांचा प्रवास हा कित्येक दशकांचा आणि विविध कलाकृतींनी भरलेला. या प्रवासात त्यांनी अभिनयातून, गाण्यातून तसेच आपल्या लेखणीतूनही प्रेक्षकांना फक्त आणि फक्त आनंदच दिला.
आशालता या मुळच्या गोव्याच्या. त्यांच्या मनोरंजन क्षेत्रातील प्रवासाला सुरुवात झाली ती, मराठी-कोंकणी संगीत नाटकांमधून. मत्स्यगंधा हे त्यांचं गाजलेलं संगीत नाटक. त्यांनी गुंतता हृदय हे, वाऱ्यावरची वरात, महानंदा यांसारख्या लोकप्रिय कलाकृतींमधूनही अनेक दिग्गजांच्या साथीने आपली अभिनय कला जोपासली. पुढे नाटकासोबतच चित्रपटांतूनही आपला अभिनय प्रवास सुरु ठेवला. त्यांनी अभिनित केलेले प्रसिद्ध मराठी चित्रपट म्हणजे वहिनीची माया, उंबरठा, सूत्रधार, नवरी मिळे नवऱ्याला आणि असे अनेक. त्यांनी मराठी सोबतच, हिंदी कालाकृतींमधून आपली अभिनय कला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली. ख्यातनाम दिग्दर्शक बसू चटर्जी यांच्या ‘अपने पराये’ मधून त्यांनी हिंदी चित्रपटात प्रवेश केला. सदर चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्रीचं फिल्मफेअर अवॉर्ड हि पदार्पणातच मिळालं होतं. पुढे मजल दरमजल करत त्या विविध कलाकृतींचा भाग होत राहिल्या. अनेक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलाकारांबरोबर त्यांनी काम केलं.
अभिनयाबरोबरच त्यांना गायनाचीही आवड होती. गाण्याचं शास्त्रशुद्ध शिक्षण त्यांनी पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्याकडून घेतलं. अभिषेकीबुवांनी स्वरबद्ध केलेलं, “गर्द सभोवती रानसाजणी तू तर चाफेकळी” हे गीतही त्यांनी आपल्या आवाजात गायलं होतं. आजही, हे गीत जुनी गीतं ऐकणाऱ्यांच्या आवडीचं असतं. आशालताजींना हे गीतसुद्धा तेवढंच जवळचं होतं. याच गाण्याचे पहिले दोन शब्द त्यांनी आपल्या ‘गर्द सभोवती’ पुस्तकाचे शीर्षक म्हणून वापरले होते. त्या ऑन स्क्रीन जेवढ्या प्रेमळ भूमिका करत, तशाच त्या खऱ्या आयुष्यातही मायाळू होत्या. त्यांना जवळून ओळखणाऱ्या मराठी चित्रपट श्रुष्टीतील अनेक दिग्गजांनी त्यांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. अलका कुबल यांनी आशालताजी यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून न निघणारी आहे असं म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या.
सुलेखा तळवलकर यांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली. सुबोध भावे यांनी आशालताजींच्या सोबत एका मालिकेत काम केलं होतं. तेव्हापासून त्यांचात अतूट स्नेह निर्माण झाला होता. ते त्यांना माँ असं संबोधत असतं. सुबोधजींनी “आमच्या सर्वांची ‘माँ’, आशाताई आम्हाला पोरकं करून गेल्या. आशाताई तुला भावपूर्ण श्रद्धांजली” असं म्हणत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. मराठी तारका चे निर्माते दिग्दर्शक, महेश टिळेकर यांनीही आपले अनुभव व्यक्त करताना आशालताजी यांना श्रद्धांजली अर्पण केली. आशालताजी यांच्या जाण्याने मराठी मनोरंजन क्षेत्रातील एक प्रेमळ व्यक्तिमत्व हरपलं आहे. त्यांच्या सारख्या ज्येष्ठ कलाकाराच्या निवर्तण्याने मनोरंजन विश्व आणि प्रेक्षक यांची मोठी हानी झाली आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच टीम मराठी गप्पाची प्रार्थना.
(Vighnesh Khale)