टाईमपास हा मराठी सिनेसृष्टीतल्या गाजलेल्या चित्रपटांपैकी एक. तो प्रदर्शित झाला आणि अख्खी तरुणाई या चित्रपटावर फिदा झाली. या चित्रपटाची लोकप्रियता एवढी कि दुसरा भाग, प्रदर्शित केला गेला. तो सुद्धा प्रेक्षकांना आवडला. या चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं. टाईमपास नंतरही या लोकप्रिय कलाकारांनी अनेक भूमिका केल्या आहेत. त्यांच्याच प्रवासाचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.
प्रथमेश परब :
दगडू हि धमाल व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता म्हणजे प्रथमेश परब. प्राजूवर मनापासून प्रेम करणारा, प्राजुच्या वडिलांची अयोग्य मराठी बोलण्यासाठी ओरडा खाणारा, यारो का यार अशी व्यक्तिरेखा त्याने उत्तम निभावली. पण या सिनेमाच्या यशानंतर त्याने आपला अभिनय प्रवास अजून जोमात चालू ठेवला. मिताली मयेकर सोबत ‘उर्फी’ हा सिनेमा केला. लोकांनी त्यालाही पसंती दर्शवली. नंतर त्याची भूमिका असलेले टकाटक, झिपऱ्या, लालबागची राणी, खिचीक, ३५% काठावर पास हे सिनेमेसुद्धा प्रदर्शित झाले. हिंदीतही त्याने ‘दृश्यम’ या अजय देवगन यांच्या सिनेमात भूमिका बजावली.
पण नाटकाची मूलतः आवड असणारा हा कलाकार नाटकांमध्ये काम न करता स्वस्थ कसा बसेल. त्याचा टाईमपास पासून पुढे प्रवास चालू असतानाही ‘लौट आओ गौरी’ हे नाटक चालूच होतं. तो एम. एल. डहाणूकर कॉलेजच्या थियेटर मॅजिक या नाटकाच्या ग्रुपचा सदस्य आहे. त्यांच्यासोबत त्याने अनेक नाटकांत मुख्य भूमिका केल्या आहेत. यातील त्याची अस्लम हि भूमिका गाजली. तसचं, सुप्रिया पाठारे, विजय पाटकर या कलाकारांसोबत केलेलं ‘दहा बाय दहा’ हे नाटकही गाजलं. सिनेमे, नाटक यांच्यासोबत त्याने झी युवावरील ‘प्रेम हे’ या मालिकेतही काम केलं आहे. तसेच तो एका म्युजिक विडीयोमध्ये सुद्धा झळकला. त्याचा अजून एक म्युजिक विडीयो, ‘नजरेचा तीर’ काही दिवसातच रिलीज होईल. सोबतच, त्याचे डॉक्टर डॉक्टर, डार्लिं ग हे सिनेमेही येत्या काळात प्रदर्शित होतील. टाईमपास नंतरही प्रथमेशच्या यशाची घोडदौड जोमात सुरु आहे. येत्या काळातही ती अशीच सुरु राहो या टीम मराठी गप्पाकडून शुभेच्छा !
केतकी माटेगावकर :
टाईमपास मधली प्राजू आपल्या सगळ्यांना आठवत असेलंच. तिचा साधा अंदाज, अभिनयातली समज यांच्यामुळे प्राजू हि व्यक्तिरेखा साकारणारी केतकी माटेगावकर अभिनेत्री म्हणून सगळ्यांना आवडली. तसे तिने टाईमपास आधीही काही सिनेमे केले होते. शाळा हा तिचा पहिला सिनेमा. ‘आरोही’, ‘तानी’ हे नंतर आलेले. या सगळ्या सिनेमांमधील तिच्या अभिनयाचं कौतुक झालं, पण लोकप्रियतेचा उच्चांक गाठला तो टाईमपासने. पुढे तिने ‘काकस्पर्श’ हा सचिन खेडेकर यांच्या सोबतचा सिनेमा केला.
पण या सगळयांआधी ती आपल्याला भेटली ते एका गाण्याच्या रियालिटी शो मधील बाल कलाकार म्हणून. तिच्या घरी, गाण्याची परंपरा आहेच. तिचे आई वडील दोघेही गायन क्षेत्राशी संबधित आहेत. त्यांनी केतकीला नेहमीच तीच्या गायन कलेसाठी प्रोत्साहन दिले आहे. किंबहुना, अभिनेत्री म्हणून घवघवीत यश मिळाले असले तरीही तिने आपलं गायन चालूच ठेवलं आहे. तिने अनेक प्रथितयश गायकांसाठी गाणं गायलं आहे. यातलं पुढचं पाउल म्हणजे, तिने नुकतचं स्वतःच युट्युब चॅनेल लाँच केलंय. यावर ती प्रामुख्याने स्वतःची गायकी प्रस्तुत करताना दिसते आहे. आपल्या गाण्यांमधून ती संगीत क्षेत्रातील दिग्गजांना मानवंदना देताना दिसते आहे. केतकी हिने मनोरंजन क्षेत्रात गायिका म्हणून प्रवास सुरु केला, अभिनयातही स्वतःची चमक दाखवली आहे. दोन्ही क्षेत्रांतील तिच्या कामासाठी तिचं कौतुक झालं आहे. केतकीला तिच्या पुढील वाटचालीसाठी टीम मराठी गप्पाकडून खूप खूप शुभेच्छा !
भाऊ कदम :
भाऊ कदम या दोन शब्दांनी महाराष्ट्राला गेल्या काही वर्षात अगदी झ पाटून टाकलं आहे. त्यांची एन्ट्री झाली आणि टाळ्या शिट्ट्या वाजल्या नाहीत असं कमीच झालं असावं. चेहऱ्यावरचे अगदी निरागस भाव, पण विनोद करण्याची वेळ आली कि अचूक टायमिंग साधत केलेली प्रहसनं यांमुळे ते नेहमीच प्रेक्षकांचे फेवरीट ठरले आहेत. ‘चला हवा येऊ द्या’ आणि त्याआधी ‘फु बाई फु’ या शोजमधून त्यांनी लोकांना खूप हसवलं. पण त्याआधी कित्येक वर्ष त्यांचा प्रवास हा चालूच होता. याच दरम्यान ‘टाईमपास’ हा सिनेमा आला आणि आधीच दौडणारं त्याचं करियर अधिक जोमाने पुढे सरसावलं. दगडूच्या वडिलांची भूमिका त्यांनी अगदी उत्तमरीतीने वठवली. पुढे त्यांनी ‘चला हवा येऊ द्या’ मध्ये काम तर सुरूच ठेवलं आणि सोबतीला अनेक सिनेमेही केले. शांतेचं कार्टं चालू आहे या नाटकातूनही त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.
त्यांची मुख्य भूमिका असलेले सिनेमे म्हणजे हाफ तिकीट, नशीबवान, लूज कंट्रोल, झाला बोभाटा, सायकल, आलटून पालटून, वेडिंगचा सिनेमा आणि बरेचसे. यातील ‘हाफ तिकीट’ हा सिनेमा तर परदेशातही प्रसिद्ध झाला आहे. तसचं त्यांची प्रमुख भूमिका असलेला, सोबत प्रियदर्शन जाधव, हृषिकेश जोशी यांची भूमिका असलेला ‘सायकल’ आता पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आला. हा सिनेमा नेटफ्लिक्स वर १० सप्टेंबर पासून होता. तसेच येत्या काळात त्यांचा ‘मनमौजी’ हा नवीन सिनेमासुद्धा आपल्या भेटीला येईलच.
आपल्या करियर मध्ये मोठं यश मिळवूनही आजही त्यांचा स्वभाव साधाच आहे. आपल्याकडे स्टारपण असतानाही ते सामाजिक कार्यातही भाग घेत राहिले आहेतच. अशा या गुणी कलाकाराला येत्या वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा !
वैभव मांगले :
“हम क्या बोल रहा है, तुम क्या बोल रहा है” असं म्हणत समोरच्या व्यक्तीचा पाणउतारा करणारी व्यक्तिरेखा म्हणजे टाईमपास मधील प्राजूचे बाबा. हि भूमिका वठवली ती, वैभव मांगले यांनी. आपण वैभव मांगले यांना त्यांच्या ‘फु बाई फु’ मधील स्कीट्स, एक डाव भटाचा, काकस्पर्श, नवरा माझा नवसाचा, फक्त लढ म्हणा, ट्रिपल सीट या सिनेमा-नाटकांसाठी ओळखतो. मुळचे कोकणातले वैभवजी मुंबईत आले आणि मजल दरमजल करता करता स्वतःतील अभिनय गुणांनी त्यांनी स्वतःची वेगळी शैली आणि मनोरंजन क्षेत्रातलं स्थान पक्क केलं आहे.
नजीकच्या काळात त्याचं गाजलेलं नाटक म्हणजे अलबत्या-गलबत्या. यातील चेटकीण सगळ्यांनाच भावली. तसचं साईबाबांवरील मालिकेत त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. वैभवजी कोणतीही भूमिका निभावताना त्यातील व्यक्तिरेखांचा अगदी बारकाईने अभ्यास करतात. त्याचमुळे त्यांच्या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांची पसंती आणि अनेक वेळेस पुरस्कारही मिळाले आहेत. त्यांची बारकाईने काम करण्याची हीच वृत्ती त्यांच्या नवीन रंगीत कलाप्रवासात त्यांना मदत करते आहे.
ते सध्या चित्रकलेत रममाण झाले आहेत. आपण त्यांच्या सोशल मिडिया अका उंटला भेट दिल्यास, त्यांच्या विविध चित्रं पहायला मिळतात. त्यांनी सुरुवातीला, रॉक पेंटिंग करायला सुरुवात केली. आत्ता त्याचसोबत ते विविध वस्तू, व्यक्ती, प्रेक्षणीयं स्थळं यांची चित्रे काढतात. काही चित्रे तर इतकी हुबेहूब वाटतात कि त्यांच्या चाहत्यांनाही तशी कमेंट केल्यावाचून राहवत नाही. त्यांची काही चित्रे, कलारसिकांनी विक तही घेतली आहेत. नाटक, सिनेमा, मालिका अशा प्रत्येक माध्यमातील व्यक्तिरेखांमध्ये रंग भरणारा हा कलाकार, आता कॅनवासवर अगदी बारकाईने रंग भरतो आहे. त्यांच्या या नवीन कला प्रवासाला मराठी गप्पाच्या टीम कडून मनःपूर्वक शुभेच्छा !
(Author : Vighnesh Khale)