टीव्ही आपल्या आयुष्यात आल्यापासून मनोरंजनाचं जसं एक नवीन दार उघडं झालं. तसच या टीव्ही वरील बातम्यांमुळे आपली सभोवतालची परिस्थिती जाणून घेण्यासाठीचं एक दृश्य कवाड उघडंलं गेलं. तोपर्यंत रेडियोवर मनोरंजन आणि बातम्या ऐकणं हे चालायचं. टीव्ही मुळे मनोरंजन क्षेत्राचा दृश्य स्वरूपात आस्वाद घेता येऊ लागला. याच सोबत, बातम्यांच्या प्रसारणानिमित्ताने आपल्या आवडत्या वृत्तनिवेदकांची आपल्याला तोंडओळख होऊ लागली. अनेक वृत्तनिवेदक लोकप्रियही झाले. आजही ती परंपरा कायम आहे. किंबहुना, अनेक वृत्तवाहिन्या पुढे आल्यामुळे अनेक वृत्तनिवेदक आणि त्यांच्या वृत्तनिवेदनाच्या पद्धती लोकप्रिय झाल्या आहेत. पण या सगळ्यांत एक मराठी नाव प्रामुख्याने घेतलं जातं, ते म्हणजे ज्ञानदा कदम हिचं.
तिचं अभ्यासपूर्ण विश्लेषण, सूत्रसंचालनाची हातोटी आणि छाप पडेल असं व्यक्तिमत्व यामुळे ती महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आहे. तिच्या पत्रकारितेतील प्रवासाचा थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न. ज्ञानदाचं मूळ गाव कोकणातलं. तिचं बालपण सगळं मुंबईत गेलं. तिने एका मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे, शाळेत असताना टीव्हीवर आपण दिसलो तर किती छान होईल हि बालसुलभ भावना तिच्या मनात होती. तसच आयुष्यात सरधोपट मार्ग निवडण्यापेक्षा वेगळा मार्ग निवडून उल्लेखनीय काम करावं, असं तिचं मत होतं. त्यादृष्टीने तिने महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं. मग रेडियोवर काम सुरु केलं. आजच्या ऑनलाईनच्या जगातही रेडियो वाहिन्या स्वतःचं अस्तित्व टिकवून आहेत. तिथून माध्यमांतील काम कसं चालत, याचा एक अनुभव म्हणून येतो. ज्ञानदाने आपल्या या काळात हा अनुभव कमावला. रेडियोसोबतच तिने काही वृत्तपत्रांसाठीही काम केलं.
त्याच काळात स्टार ग्रुपने, ‘स्टार माझा’ नावाने एक मराठी वृत्तवाहिनी सुरु करण्याचं काम सुरु केलं होतं. राजीव खांडेकर यांच्यासारख्या तरुण पण अनुभवी पत्रकारावर आणि त्यांच्या टीमवर नवनवीन मुलांना एकत्र घेऊन या नव्या वाहिनीची संपूर्ण टीम बांधणं, हे काम आलं होतं. राजीव खांडेकर यांनी एका व्याख्यानात सांगितलं होतं, कि त्यांनी अशी काही मुलं या वाहिनी साठी निवडली ज्यांना मिडियामधील शिक्षण आणि कामाची थोडी पार्श्वभूमी असेल. पण तरुण मुलं, जी निर्भीडपणे काम करू शकतील असा एक निकष यावेळी वापरला गेला. अशा नव्या उत्साही आणि अभ्यासू मुलांची निवड केली गेली. ज्ञानदा हि सुद्धा त्या सुरुवातीच्या काळात निवड झालेली एक पत्रकार. एका अर्थाने, तिने या संस्थेच्या अगदी सुरुवातीच्या काळापासून ते आजच्या ‘ए.बी.पी. माझा’ एक अग्रगण्य वृत्तसंस्था होण्यापर्यंतचा प्रवास अनुभवला आहे.
किंबहुना, या प्रवासाची साक्षीदार होत असताना, अनेक लोकोपयोगी कार्यक्रमांतून तिने या संस्थेच्या जडणघडणीत आपला वाटा उचलला आहे. कारण, सुरुवातीच्या काळात ती वार्तांकनाचं काम करत असे फिल्डवर जाऊन. पुढे तिने स्टुडियोमधूनही तिने वार्तांकन करायला सुरुवात केली. पण या काळात तिने पत्रकारितेतील अनेक बारकावे समजावून घेतले. स्वतःत पत्रकार म्हणून तीने सुधारणा केल्या. आज या तिच्या मेहनीतचं आणि सातत्याचं फळ म्हणजे तिला मिळत असलेली प्रेक्षक पसंती. ‘काय सांगशील ज्ञानदा’ म्हणून तिच्यावर अनेक मिम्स केले गेले. तिच्या कामाची दखल, सोशल मिडीयावरती घ्यायला सुरुवात झाली. मध्यंतरी ती, क रोना पॉझिटीव असल्याचं कळल्यावर अनेकांनी हळहळ व्यक्त केली. तिला आपापल्या परीने शुभेच्छाही दिल्या. ती बरी झाल्यावर आनंदही व्यक्त केला गेला. ज्ञानदानेहि लोकांकडून मिळणाऱ्या या प्रशंसेचा आणि काळजीचा सदैव सकारात्मकतेने स्वीकार केला आहे. खरं तर, सतत कॅमेऱ्यासमोर वावरताना आणि इतकी लोकप्रियता मिळताना, कामावर लक्ष केंद्रित करणं कठीण होऊ शकतं. पण प्रसिद्धीच्या पाठी न पळता, आपलं काम उत्तम रीतीने करत राहण्याकडे तिचा कल दिसतो.
त्याचमुळे निवडणुका असोत, ‘माझा कट्टा’वरील मान्यवरांच्या मुलाखती असोत, ‘माझा विठ्ठल, माझी वारी’, ‘माझा विघ्नहर्ता’ असे गंभीर, माहितीपूर्ण, अध्यात्मिक असे विविध विषय मांडणारे कार्यक्रम असोत ती नेहमी यात आघाडीवर दिसते. क रोनामधून बरी झाल्यावर तिने पुन्हा आपल्या कामाला सुरुवात केली ती दुप्पट उत्साहाने. लॉकडाऊनच्या संपूर्ण काळात कधी घरातून तर कधी स्टुडियोमधून काम चालू ठेवलं. आजही ती त्याच उत्साहाने वृत्तनिवेदन आणि सूत्रसंचालन करताना दिसते. तिच्या वृत्तनिवेदनासाठी तिला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. येत्या काळातही तिचं काम असच उत्तमरीतीने सुरु राहिल हे नक्की. तिच्या पत्रकारितेसाठी तिला मानसन्मान मिळत राहोत तसेच ती उत्तरोत्तर प्रगती करत राहो या मराठी गप्पाकडून तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !
(Author : Vighnesh Khale)