नवोदित कलाकार मनोरंजन क्षेत्रात येणं आणि स्वतःच अभिनय कौशल्य अजमावणं हे सतत चालूच असतं. परंतु अशा नवोदित कलाकारांपैकी काही जण हे जणू या मनोरंजन क्षेत्रासाठीच बनले आहेत, असं वाटत राहतं. यातीलच एक आघाडीचं नाव म्हणजे मोनालिसा बागल. सिनेमा जगतात मुशाफिरी करणारी मोनालिसा आता दाखल झाली आहे टेलीविजनच्या पडद्यावर. ‘टोटल हुबलाक’ मधली गरोदर स्त्री साकार करत तिने छोट्या पडद्यावर एंट्री तर घेतली आहेच आणि तिचा प्रवास आता “चला हवा येऊ द्या” म्हणत विनोदाच्या वळणावर आला आहे. या तिच्या वाटचालीविषयी आज मराठी गप्पा वर थोडसं.
मोनालिसाला आपण ओळखतो ते “झाला बोभाटा”, “ड्राय डे” सारख्या सिनेमांसाठी. पण या सिनेमांच्या आधीही तिने एक महत्वाचा सिनेमा केला होता. २०१४ साली प्रसिद्ध झालेल्या त्या सिनेमाचं नाव होतं “सौ. शशी देवधर”. यात सई ताम्हणकर यांच्या लहानपणीची भूमिका तिने केली होती. तिच्या अभिनयाचं कौतुकही झालं होतं. पण त्यानंतर नवीन सिनेमे स्वीकारण्याअगोदर तिने अभ्यासासाठी थोडा वेळ घेतला होता. नंतर तिने “मिस रायगड” सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला होता आणि त्यातही तिची दखल घेतली गेली होती. पण तिचं यश हे केवळ इथपर्यंतच सीमित नाहीये. तिच्या झाला बोभाटा या सिनेमासाठी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ सातारा शाखेच्या वर्धापनदिनी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देऊन तिला गौरवलं गेलं होतं. तिला एका प्रथितयश संस्थेकडून मोस्ट प्रॉमिसिंग न्यू कमर हा पुरस्कारही अभिनयासाठी मिळाला आहे. याचसोबत तिला मानाच्या अशा “मराठी तारका”च्या दीपावली विशेष फोटोशूटमध्ये सहभाग घेण्याची संधी मिळाली होती.
संस्थांकडून पुरस्कार मिळण्याचा आनंद असतोच पण त्याचबरोबर सच्चा कलाकाराला ओढ असते ती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्याची. अशी वाहवा मोनालिसाला मिळाली ते एका गाण्यामुळे. महाराष्ट्राच्या घराघरात या तरुण अभिनेत्रीला पोहोचवण्याचं काम केलं ते “मला आमदार झाल्यासारखं वाटतंय” या गाण्याने. बरं हे सगळं होत असताना ती तिरकीट, परफ्युम सारखे सिनेमेही करत होतीच. लॉकडाऊन झालं म्हणून तिचे चार सिनेमे थांबले होते पण येत्या काळात ते प्रदर्शित होतील. खरं तर एवढ्या कमी वयात आपल्या कामाच्या जोरावर तिने आपला जम चांगलाच बसवलाय असं म्हणायला हरकत नाही. तिने अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं नसलं तरीही आंतरिक उत्स्फूर्तता आणि सहकलाकारांकडून ती नेहमी शिकत असते.
तिने आपल्या करियरमध्ये दिलीप प्रभावळकर, चिन्मय मांडलेकर, सयाजी शिंदे, भाऊ कदम, कुशल बद्रिके यांच्यासोबत काम केलं आहे आणि हीच परंपरा पुढे चालू राहील यात शंका नाही. कारण, सध्या ती काम करत असलेल्या ‘चला हवा येऊ द्या : लेडीज जिंदाबाद’ मध्ये तर अशा गुणी कलाकारांची एक मोठ्ठी फळीच आहे. त्यात “चला हवा येऊ द्या”चे मूळ विनोदी कलाकार आलेच आणि सोबत आहेत अनुभवी आणि लोकप्रिय नायिका. त्यामुळे येत्या काळात तिच्या अभिनयात अजून अमुलाग्र बदल झालेला आपल्याला दिसेल यात शंका नाही. तिला या क्षेत्रात येणासाठी खंबीर पाठींबा देणाऱ्या तिच्या आईची खूप इच्छा होती कि तिने ‘चला…” च्या सेट वर जावं. गेल्याच वर्षी त्या अकस्मात गेल्या आणि या वर्षी मोनालिसा या कार्यक्रमात दाखल झाली. त्यामुळे आई असती तर तिला नक्की अजून अभिमान वाटला असता, ती खुश झाली असती असं तिने एका मुलाखतीत सांगितलं होतं.
आपलं सौंदर्य प्रेक्षकांना दिसतंच पण त्याचबरोबर आपला अभिनय उत्तम व्हावा याकडे तिचं नेहमीच लक्ष असतं. तिला वाचनाचीही आवड आहे. तिने काही दिवसांपूर्वीच, द अल्केमिस्ट हे पाउलो कोएल्हो यांच सुप्रसिद्ध पुस्तक वाचतानाचा फोटो सोशल मिडियावरती टाकला होता. आज मोनालिसा अभिनयाबरोबरच बॉक्सहिट नावाच्या कंपनीची मालक आहे. अभिनयासोबत व्यवसायाचा अनुभवसुद्धा ती घेते आहे. तिच्या या फिल्म डीस्ट्रीब्युशनच्या व्यवसायात ती तिचं शिक्षण आणि अनुभव यांचा नक्की वापर करत असणार. अशा या प्रगतीशील अभिनेत्रीची अभिनयाची व्याप्ती वाढत जाईल आणि व्यवसायातही तिची यशस्वी घोडदौड सुरूच राहील यात शंका नाही. तिच्या पुढील वाटचालीसाठी टीम मराठी गप्पाकडून खूप खूप शुभेच्छा !
(Author : Vighnesh Khale)