एखादा डॉ न प्रेमात पडला पण, प्रेमाचा मामला असल्याने आवडत्या व्यक्तीला पटवताना त्याला नेहमीची डॉ नगिरी करता येत नसेल तर ? आणि त्याला आवडत असलेली व्यक्ती एखाद्या कॉलेजची एकदम कडक शिस्तीची डीन असेल तर ? संकल्पना एकदम भन्नाट. आणि अशाच भन्नाट संकल्पनेवर आधारित मालिका म्हणजे ‘डॉक्टर डॉ न’. या मालिकेचे वैशिष्ठ म्हणजे यात आपल्या दोन लाडक्या कलाकारांनी बऱ्याच काळानंतर घेतलेली एन्ट्री. यातील एक कलाकार म्हणजे देवदत्त नागे आणि दुसऱ्या कलाकार म्हणजे श्वेता शिंदे. मुख्य भूमिकेत असलेले हे दोघेही उत्तम अभिनेते आहेत हे तर सर्वश्रुत आहेच. सोबतच, या मुख्य जोडीतील श्वेताजी गेले काही वर्ष निर्माती या भूमिकेत आहेत, हे आपल्याला माहिती असेलच. नुकतीच त्यांच्या वज्र प्रॉडक्शनने एक नवीन मालिका आपल्या भेटीस आणली आहे. ती मालिका म्हणजे ‘देवमाणूस’. या मालिकेच्या निमित्ताने श्वेता शिंदे यांच्या मनोरंजन क्षेत्रातील वाटचालीचा घेतलेला धावता आढावा.
श्वेताजी आपल्याला अभिनेत्री म्हणून अनेक मालिकांतून भेटल्या आहेत. त्यांच्या भूमिका असलेल्या बहुतेक सर्वच मालिका गाजल्या आहेत. वादळवाट, अवंतिका, चार दिवस सासूचे, अवघाची हा संसार, काटा रुते कुणाला हि त्यातली काही उदाहरणं. यातील बहुतांश मालिकेत त्यांच्या व्यक्तिरेखा या खलनायकी होत्या. पण त्यांनी काटा रुते कुणाला सारख्या मालिकेतून सकारात्मक भूमिकाही केलेली आहे. त्यांनी चार दिवस सासूचे या दीर्घकाळ चाललेल्या मालिकेत महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. यात रोहिणीजी हट्टंगडी मुख्य भूमिकेत होत्या. डॉक्टर डॉनच्या निमित्ताने या दोन्ही अभिनेत्री पुन्हा वीस वर्षानंतर या मालिकेतून एकत्र काम करताना दिसल्या आहेत. या मराठी मालिकांसोबतच श्वेताजींनी घराना, कुमकुम, तुम्हारी दिशा, परिवार या हिंदी मालिकाही केलेल्या आहेत. अशाच एका मालिकेच्या सेटवर त्यांचे पती संदीप भंसाली यांच्याशी त्यांची पहिल्यांदा भेट झाली. पुढे मैत्री, प्रेम आणि मग लग्न झालं. काही काळाने मुलीचा जन्म झाला. या काळात श्वेताजी अभिनयापासून दूर राहिल्या. त्यांनी घरच्यांना पूर्ण वेळ दिला. पण म्हणतात ना, एकदा अभिनय करायला चेहऱ्याला रंग लावला कि तो कधीही जात नाही. त्यामुळे काही काळाने त्या पुन्हा एका मालिकेच्या निमित्ताने अभिनय करण्यास सज्ज झाल्या. सज्ज झाल्या असंच म्हणणं योग्य ठरेल कारण या मालिकेतील भूमिकेसाठी त्यांनी स्वतःच्या फिटनेस कडे जास्त लक्ष दिलं. वजन कमी केलं. अभिनय अगदी तडाखेबंद केला. त्यामुळे त्यांच्या या भूमिकेत पुनरागमन करताना त्यांनी अगदी दणक्यात केलं. या लोकप्रिय मालिकेचं नाव “लक्ष्य” आणि लोकप्रिय भूमिकेचं नाव “इन्स्पेक्टर रेणुका राठोड”.
त्यांनी मालिका क्षेत्रात जसं काम केलं आहे तसचं नाटक आणि सिनेमाक्षेत्रातही काम केलं आहे. बाप रे बाप डोक्याला ताप, इश्श्य, अधांतरी, देऊळ बंद, आभास हे काही सिनेमे. आभास हा तर पूर्णपणे विसिडी आणि डीव्हीडी वर प्रदर्शीत होणारा पहिला मराठी सिनेमा होता असं एका मुलाखतीतून दिसतं. या सिनेमात प्रसाद ओक, प्रदीप वेलणकर हे आघाडीचे कलाकारही होते. तसेच इश्श या सिनेमाचा विषयही वेगळा होता. त्याचं मनोमिलन हे नाटकही गाजलं. यात अशोकजी सराफ यांच्या समवेत त्यांनी रंगमंचावर काम केलं होतं. तसेच, प्रेम नाम है मेरा “प्रेम चोप्रा” या नाटकातही त्या होत्या. हे झालं अभिनयाविषयी. त्यांनी नृत्यातही आपण सरस असल्याचं दखवून दिलं आहे. एका पेक्षा एक आणि नच बलिये या सुप्रसिद्ध डान्स रियालिटी शोमध्ये त्यांनी स्पर्धक म्हणून भाग घेतला होता. एकंदरच श्वेताजींच्या मनोरंजन विश्वातील वाटचालीचा आढावा घेतल्यास त्यांनी कलाकार म्हणून त्यांच्या प्रत्येक प्रोजेक्ट मध्ये काही तरी नवीन शोधण्याचा प्रयत्न केला आहे असं जाणवत. कारण अभिनेत्री म्हणून त्यांनी प्रेमात पडलेली नायिका, खलनायिका, विनोदी भूमिका, पोलिसांची कणखर भूमिका अशा विविध भूमिका जिवंत केल्या आहेत. तसेच स्वतःतील नृत्याची कलाही त्यांनी सादर केली होतीच.
त्यांचा हाच विविध प्रयोग करण्याचा स्वभाव निर्मिती क्षेत्रातही दिसून येतो. कारण, त्यांनी आणि दिग्दर्शक संजय खांब यांनी वज्र प्रॉडक्शनची सुरुवात केली २०१६ साली. पुढील वर्षी आलेली लागिरं झालं जी हि या प्रॉडक्शनची पहिली लोकप्रिय मालिका. ती किती तुफान चालली हे सर्वश्रुत आहेच. त्यानंतर आलेली मिर्सेस मुख्यमंत्री हि दुसरी मालिका. ती सुद्धा लोकप्रिय झाली आणि आता देवमाणूस हा एक थरारपट घेऊन वज्र प्रॉडक्शनची टीम आपल्यासमोर आली आहे. अवघ्या चार वर्षाच्या या प्रॉडक्शनने तीन वेगवेगळ्या धाटणीच्या मालिका आत्तापर्यंत सादर केल्या आहेत. कलाक्षेत्रात काहीतरी नवीन योगदान देण्याची ओढ यातून दिसून येते. येत्या काळातही, श्वेताजी एक अभिनेत्री आणि निर्मात्या म्हणून अनेक उत्तमोत्तम आणि विविध विषयांशी निगडित प्रोजेक्ट्स आपल्या समोर घेऊन येतील आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करतील यात शंका नाही. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा !
(Author : Vighnesh Khale)