मराठी मालिकांमध्ये गेल्या काही काळात अव्वल स्थान कमावलेल्या बहुतांश मालिका ह्या स्टार मराठी वाहिनी वरील असल्याचं आपल्या निदर्शनास आलं असेल. विविध विषय आणि त्यांची आकर्षक मांडणी, नव्या आणि जुन्या कलाकारांचा उत्तम मेळ ही याची कारणे असू शकतात. या कलाकारांच्या मांदियाळीत काही नवीन चेहरे आपल्याला प्रेक्षकमनावर स्वतःची छाप सोडताना दिसून येतात. आजच्या या लेखातून आपण अशाच एका नवीन, पण कमी कालावधीत स्वतःची छाप पाडणाऱ्या कलाकाराबाबत जाणून घेणार आहोत. या कलाकाराला आपण मागील वर्षी टीव्ही वर पाहिल्यांदा पाहिलं ते डबल रोल मधून. यात एक व्यक्तिरेखा होती ती कोल्हापूरच्या मुलाची तर दुसरी व्यक्तिरेखा होती मुंबईला वाढलेल्या मुलाची. दोन वेगवेगळ्या स्वभावाच्या व्यक्तिरेखा या कलाकाराने उत्तमरीतीने साकार केल्या होत्या.
आपल्या पैकी काहींनी बरोबर ओळखलं आहे. ह्या कलाकाराचं नाव आहे संचित चौधरी. संचित हा मूळचा नागपूरकर. त्याला अभिनयाविषयी मनस्वी आवड. नागपुरातील नाट्यकृतींमध्ये तो हिरीरीने भाग घेत असे. अनेक एकांकिका, नाटकं यातून त्याने अभिनय केलेला आहे. रंग रसिया या नाट्यसंस्थेमार्फत त्याने अनेक प्रसिद्ध नाट्यकृती साकार केल्या आहेत. यातील ‘त्रिकोणात चौथा कोण?’, ‘पाणीपुरी’ या त्याच्या एकांकिका विशेष गाजल्या. त्यातील त्याच्या अभिनयाचं विशेष कौतुक झालं. या नाट्यकृतींन्वये त्याने पुरुषोत्तम करंडक सारख्या अनेक लोकप्रिय नाट्य स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता. स्वतःतील अभिनेत्याला त्याने घडवलं. पण या प्रवासात त्याने आपल्या शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणाकडे दुर्लक्ष केलं नाही. घरी शिक्षणाचं वातावरण होतंच. संचित याने स्वतःचं शिक्षण पूर्ण केलं आणि काही काळ शिक्षक म्हणून नोकरीही केली. पण त्याला अभिनय क्षेत्रात काम करण्याची इच्छा स्वस्थ बसू देईना. तेव्हा या पठ्ठ्याने थेट मुंबई गाठली. एरवी ही नाटकांच्या दौऱ्यानिमित्ताने मुंबईत येणं जाणं असे. आत्ता पूर्ण वेळ कलाकार म्हणून त्याने काम सुरू केलं आणि काही काळात त्याला त्याची पहिली मालिका मिळाली. ‘प्रेमाचा गेम सेम टू सेम’ ही ती मालिका. वर उल्लेख केलेला डबल रोल हा याच मालिकेतला. या पहिल्या मालिकेतील त्याच्या अभिनयाचं कौतुक झालं.
मधला काळ लॉक डाऊनचा गेला आणि मग संचित पुन्हा एकदा एका नवीन मालिकेतून आपल्या समोर आला. ‘तुझ्या इश्काचा नादखुळा’ ही संचित याची नायक म्हणून लगोलग दुसरी मालिका. या मालिकेतील ‘रघु’ ही व्यक्तिरेखाही आधीच्या मालिकेतील व्यक्तिरेखांसारखीच प्रसिद्ध होते आहे. संचित याने ‘अ नॉर्मल डे’ या शॉर्ट फिल्म मध्येही अभिनय केलेला आहे. अभिनयासोबतच संचित याला चित्रकलेचीही आवड असल्याचं दिसून येतं. तसेच तो कामाच्या धावपळीतही स्वतःचा फिटनेस जपतो. संचित हा नाटक आणि मालिका यांतून आपल्या समोर सदैव आलाच आहे. तसेच अनेक शॉर्ट गंमतीदार व्हिडियोज मधून तो आपल्या समोर आला आहे. त्याने अल्पावधीतच स्वतःला ज्या प्रकारे प्रेक्षकांसमोर नायक म्हणून पेश केलं आहे त्यामुळे त्याची लोकप्रियता ही वाढीस लागल्याचं दिसतं आहे. येत्या काळात संचित विविध माध्यमांतून आणि विविध कलाकृतींतून प्रेक्षकपसंती मिळवत राहावा आणि त्याची लोकप्रियता वाढती राहावी या मराठी गप्पाच्या टीमकडून त्याला शुभेच्छा !