गेल्या काही दिवसांत आमच्या टीमने ‘तुझ्या इश्काचा नादखुळा’ या मालिकेतील नायक संचित चौधरी याच्या कारकिर्दीचा आढावा घेणार लेख लिहिला होता. या लेखाला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. आजच्या या लेखातून आपण या मालिकेच्या नायिकेविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत. तिचे टप्पोरे डोळे तुमच्या मनाचा ठाव घेतात असं वाटत राहतं, तिच्या लांबसडक केसांच्या बटा कपाळावर रेंगाळत असतात, पण तरीही छान दिसतात आणि तिचं एकंदर रघु वरील प्रेम प्रेक्षकांना खूप आवडतं. अशी ही स्वाती रंगवली आहे अक्षया हिंदाळकर हिने. अक्षया मूळची मुंबईची. मुंबईत तिचं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण झालं. तिला स्वतःला अभिनयाची आवड.
या आवडीतून तिने रंगमंचावर एक नाटक केलं. ‘ती अशीच होती’ असे या नाटकाचे नाव. पुढे ती मालिका क्षेत्रात आली आणि इथेच रमली. तिची पहिली मालिका म्हणजे ‘सरस्वती’. ह्या सुप्रसिद्ध मालिकेतील तिच्या अभिनयाचं कौतुक झालं. या मालिकेतील मुख्य भूमिकेत असलेली तीतीक्षा तावडे आणि अक्षया या जिवलग मैत्रिणी. पुढे अक्षया हिने ‘कुलस्वामिनी’ मालिकेत काही काळ अभिनय केला होता. तसेच नायिका म्हणून तिची ‘साता जल्माच्या गाठी’ ही मालिका गाजली. तिच्या अभिनयात प्रत्येक कलाकृतीगणिक लक्षात घ्यावे असे सकारात्मक बदल झालेले दिसून येतात. ‘साता जल्माच्या गाठी’ नंतर सध्या ‘तुझ्या इश्काचा नादखुळा’ या मालिकेतील मुख्य नायिकेच्या भूमिकेत अक्षया आपल्याला दिसून येते आहे. ती मालिकांमध्ये रमली असली तरीही मध्यंतरी एक चित्रपट ही केला. ‘रॉकी’ या मराठी चित्रपटात ती झळकली होती. या चित्रपटातील मनगुज हे गीत गाजलं होतं. अभिनयासोबतच अक्षया ही उत्तम नृत्यांगना सुद्धा आहे. अभिनयासोबतच अक्षया ही तिच्या आरोग्याबाबत खूप जागरूक असते. पॉवर योगा, मेडिटेशन आणि इतर व्यायाम प्रकारांच्या माध्यमांतून ही अभिनेत्री स्वतःला फिट ठेवते.
मागील वर्षी जेव्हा लॉक डाऊनचा काळ नुकताच सुरू झाला होता, तेव्हा सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने आपल्या चाहत्यांसाठी पॉवर योगाचे धडे दिले होते. एरवी व्यक्तिरेखेनुसार स्वतःला मालिकेत दर्शवणारी अशी ही अभिनेत्री सेट वर तेवढीच खट्याळपणे वावरते. तिच्या सोशल मीडिया पोस्ट्स मधून तिच्या सहकलाकारांशी असलेले तिचे ऋणानुबंध दिसून येतात. अशी ही गुणी कलाकार सध्या तिच्या ‘तुझ्या इश्काचा नादखुळा’ मालिकेत व्यस्त आहे. गेल्या काही काळात तिने अनेक मालिकांतून तिच्या चाहत्यांचं मनोरंजन केलेलं आहे. येत्या काळातही हा सिलसिला चालू राहील हे नक्की. अक्षया हिला तिच्या पुढील वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टिमकडून मनःपूर्वक शुभेच्छा !