आपण व्हॉइस ओवर कलाकारांना जेव्हा जेव्हा ऐकतो तेव्हा अचंबित होऊन जातो. ते ज्या सहजतेने विविध माणसांचे, वाद्यांचे, कार्टून्सचे आवाज काढतात, ते पाहून त्यांच्याविषयी असलेला आदर वाढतो. या त्यांच्या कलेपाठी असते त्यांची कित्येक वर्षांची मेहनत. त्यांच्यातील अनेकांना अगदी लहानपणी उमजतं की त्यांना विविध आवाज काढता येतात आणि मग त्यांचा हा प्रवास सुरु होतो. पण हे आवाज जपणं, त्यात विविधता आणणं यासाठी त्यांना सातत्याने प्रयोगशील आणि शिस्तबद्ध राहावं लागतं. हे सगळं सांगण्याचा उद्देश म्हणजे गेल्या काही दिवसांत वायरल झालेला एक व्हिडीओ. हा व्हिडीओ कोकणातील एका गावातला आहे. यात तीन मित्र आहेत.
एक लहान मुलगा आहे तर दुसरे दोन थोडे मोठ्या वयाची मुलं आहेत. क्रिकेट खेळायला आलेले हे मित्र त्या लहान मुलाकडून विविध आवाज ऐकताहेत. कदाचित त्यांना ह्याचा व्हिडिओ वायरल होऊ शकतो, अशी कल्पना आली असावी. कारण त्यांच्याकडून सुरुवातीला लहान बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकण्याची फर्माईश केली जाते. मग एकेक नवनवीन आवाजांची मागणी केली जाते. यात गंमतीचा भाग असा, की आपण सर्वांनी लहानपणी कधी ना कधी मांजर कुत्र्यांचे आवाज काढण्याचा प्रयत्न केलेला असतो. काही असेही असतात, की बाजूने मांजर जाताना, त्यांना म्यांव म्यांव केल्याशिवाय राहवत नाही. असो. पण हे झालं आपल्याविषयी. या मुलांच वैशिष्ठ्य म्हणजे अगदी मोराचा आवाज काढणंही त्याला जमतं. मोराचा आवाज फार कमी ऐकून असतो आपण. यावरून या मुलाची आकलन शक्ती आणि आवाजांची नक्कल करण्याची क्षमता लक्षात यावी.
कारण आपण हा व्हिडीओ पाहिलात तर यातील प्रत्येक आवाज हा हुबेहूब काढलेला आपल्याला दिसतो. मग तो कोंबड्याचे आरवणे असो, मांजराचा आवाज असो, बकऱ्याचा, कोकिळचा आवाज असो वा वर उल्लेख केलेले बाकीचे आवाज. या मुलाने अगदी सहजतेने हे आवाज काढलेले आहेत. त्याची ही कला त्याच्या या वयासाठी निश्चितच अफलातून आहे. आकलन शक्ती, आवाज काढण्याची हातोटी आणि एवढं असूनही काहीही विशेष न केल्याचे निरागस भाव हे या व्हिडीओतुन समोर आलेले त्याचे गुण. त्याने ही कला अशीच जपावी, वाढवावी यासाठी मराठी गप्पाच्या टीमकडून त्याला खूप खूप शुभेच्छा तसेच हा व्हिडिओ ज्यांनी रेकॉर्ड केले त्या मुलांनाही धन्यवाद ! आम्ही तो व्हिडीओ खाली देत आहोत, तुम्ही नक्की पहा व्हिडीओ.
(Author : Vighnesh Khale )