Breaking News
Home / मराठी तडका / दख्खनचा राजा जोतिबा मालिकेतील अंबाबाईची भूमिका केलेली हि अभिनेत्री नक्की आहे तरी कोण

दख्खनचा राजा जोतिबा मालिकेतील अंबाबाईची भूमिका केलेली हि अभिनेत्री नक्की आहे तरी कोण

जोतिबाच्या नावानं चांगभलं म्हणत ‘दख्खनचा राजा जोतिबा’ ही मालिका काही दिवसांपूर्वी दाखल झाली. या मालिकेतून अनेक अनुभवी आणि नवोदित कलाकार आपल्या भेटीस आले आहेत. यातील एक महत्वाच्या कलाकार म्हणजे निशाजी परुळेकर. त्यांनी या मालिकेत देवी अंबाबाईची भूमिका साकार केली आहे. आज या लेखाच्या निमित्ताने आपण त्यांच्या आयुष्याचा आणि कलाकारकिर्दीचा थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. निशाजी यांचं मूळ गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील. पण नोकरीनिमित्त आई वडील मुंबईत असल्यामुळे निशाजी आणि त्यांचे भाऊ यांचं संपूर्ण बालपण मुंबईला गेलं. शिक्षणही येथे झालं. एकदा एका मुलाखतीत त्यांनी या बालपणीच्या आठवणींना उजाळा देत म्हंटलं होतं कि, त्यांना कलाविश्वाविषयी आकर्षण वाटायचं. त्या लहानपणी शनिवारी आणि रविवारी दूरदर्शनवर दाखवले जाणारे सिनेमे आवर्जुन बघत.

पण सुरुवातील अभ्यास आणि मग नोकरी यांच्यामुळे कलाविश्वाकडे दुर्लक्ष झालं. काही काळाने लग्न झालं, मुलगी झाली आणि मग या क्षेत्रात येण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यांनी प्रयत्न सुरू केले. सुरुवात अवघड आणि अडथळ्यांची होती, पण त्यांच्या श्रमांचं चीज झालं. दूरदर्शनवरील इन्स्पेक्टर या मालिकेत त्यांना एक भूमिका मिळाली. त्यांच्या या मालिका प्रवासात त्या अनेक लोकप्रिय मालिकांचा महत्वपूर्ण भाग राहिल्या आहेत. सध्याची दख्खनचा राजा जोतिबा ही मालिका यात आहेच. सोबत देवयानी, बाळू मामाच्या नावाने चांगभलं या लोकप्रिय मालिकाही आहेत. मालिका करता करता त्यांनी सिनेमात पदार्पण केलं ते आजतागायत. किंबहुना त्यांनी या माध्यमांतून केलेलं काम इतकं प्रचंड आहे की या सरत्या लॉक डाऊन मध्ये अनेक दिवस त्यांचे कित्येक चित्रपट सलग दाखवले गेले होते. म्हणजे दर दिवशी कुठचा ना कुठचा चित्रपट हा वेगवेगळ्या वाहिन्यांनावर दाखवला जात होता.

त्यांच्या या प्रवासात त्यांनी अनेक चित्रपट केले. आपसूकच अनेक भूमिकाही केल्या. या भूमिकांतील, त्यांची सर्वात आवडती भूमिका ही रमाबाई भीमराव आंबेडकर (रमाई) ही आहे, असं त्यांनी एके ठिकाणी नमूद केलं आहे. त्यांच्या इतरही भूमिका खूप गाजल्या. त्यांच्या गाजलेल्या चित्रपटांपैकी काही म्हणजे माहेरची वाट, आम्ही चमकते तारे, हिरकणी – धाडसी मातृत्वाचा बुरुज, करुणा शिवशंकरा, महानायक वसंत तू, सासूच्या घरात जावयाची वरात, एका लग्नाची गोष्ट, बाबो आणि असे अनेक. गेली कित्येक वर्षे सातत्याने त्या चित्रपटांतून आपल्या भेटीस येत आहेत. तसेच हिरकणी या चित्रपटातील स्टंटस त्यांनी स्वतः केल्याचं त्यांनी नमूद केलं होतं. यावरून त्यांच्या अभिनयाप्रति असलेल्या समर्पित आणि प्रयोगशील, धाडसी वृत्तीची कल्पना यावी.

(अभिनेत्री निशा परुळेकर आणि सहाअभिनेते नागेश भोसले, सीरिअल देवयानी)

अशा या सदैव कलाक्षेत्रात व्यस्त असणाऱ्या निशाजी, सामाजिक कार्यातही नेहमीच अग्रेसर असतात. स्वतःचं कुटुंब, पतीसोबत सुरू केलेला व्यवसाय, अभिनयातील कारकीर्द, सामाजिक काम या सगळ्यांना त्यांनी उत्तम आणि यशस्वी रीतीने सांभाळलं आहे. या सगळ्या घटकांचा उत्तम समतोल साधला आहे. त्यांचा जीवन प्रवास ऐकत असताना त्यांच्या बालपणी त्यांनी जे कष्ट सहन केले त्याची जाणीव होते. पण त्याचं कुठेही भांडवल करताना त्या दिसत नाहीत. किंबहुना, परिस्थिती बदलण्यासाठी मेहनत करणं, प्रगतिशील राहणं हे त्यांच्या आजवरच्या प्रवासात दिसून येतं. त्याचमुळे त्या सदैव आत्मविश्वासपूर्ण असतात. कलाकार आणि माणूस म्हणून स्वतःच्या कार्यकक्षा सतत विस्तारत असतात. अशा या अष्टपैलू निशाजींना मराठी गप्पाच्या टीमकडून पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !

(Author : Vighnesh Khale)

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *