मराठी गप्पा म्हणजे मनोरंजन क्षेत्रातील बातम्या, कालाकारांविषयी माहिती या लेखांचे माहेरघर. त्यात आमच्या टीमने अनेक वायरल व्हिडियोज बद्दल लेख लिहिण्यास सुरुवात केली, आणि त्यासही उत्तम प्रतिसाद लाभला. हे वायरल व्हिडियोज बहुतांश वेळा मजेशीर असल्याने करमणूक होत असली, तरी काही वायरल व्हिडियोज बघून पोटात गोळा आल्या वाचून राहत नाही. आता गेला काही वेळ वायरल झालेला एक व्हिडिओ याचं उत्तम उदाहरण आहे. हा व्हिडीओ म्हणजे दहिसर रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज आहे. हे फुटेज पाहिलं असता, दोन म्हणी प्रामुख्याने आठवतात. काळ आला होता पण वेळ आली नव्हती आणि देव तारी त्याला कोण मारी. कारणच असं घडलं होतं.
एक व्यक्ती दहिसर रेल्वे स्थानकात आली. तिला प्रवास करायची ट्रेन वेगळ्या फलाट क्रमांकावर येणार, हे त्या व्यक्तीला कळलं. मग काय, रेल्वे ब्रिज चा वापर करण्याऐवजी ती व्यक्ती थेट रेल्वे रुळांवरून जाण्याचा प्रयत्न करू लागली. त्यात दोन रुळांवरून कोणी जाऊ नये म्हणून फेंसिंग घातलेलं. तेही या व्यक्तीने ओलांडलं. आता एकच रूळ बाकी होता. पण त्यात मात्र या महाशयांचा एक बूट पायातून सुटला. इथे समोरून ट्रेन येत होती आणि तिच्या मोटरमनला कल्पना आली असावी. त्यांनी वेग कमी केला. हा प्रकार फलाटावर असलेले कॉन्स्टेबल निकम बघत होते. त्यांनी धावत पळत येऊन सदर व्यक्तीला घाई करण्यास सांगितले. कारण आपला उडालेला बूट परत पायात घालण्यासाठी ही व्यक्ती त्या फेंसिंग जवळ गेली होती. अगदी काही क्षणात रेल्वे त्याच जागी दाखल होणार होती जिथून ही व्यक्ती फलाटावर दाखल झाली असती. सदर व्यक्तीने फलाट गाठण्याच्या प्रयत्न केला. तेवढ्यात चपळाईने निकम यांनी त्या व्यक्तीस वर ओढून घेतले. योगायोग असा की मोटरमनने ही प्रसंगावधान दाखवत ट्रेन थांबवली होती. पण वेग कमी असला तरीही ती ट्रेन थोडी पुढेच जाऊन थांबली. यामुळे एक मात्र नक्की, कॉन्स्टेबल निकम यांनी धैर्य दाखवून त्या व्यक्तीस ओढले नसते तर अनर्थ घडण्यास क्षणाचाही अवधी लागला नसता.
पण म्हणून वर उल्लेखलेल्या दोन म्हणी आठवतात. देव तारी त्याला कोण मारी. निकम यांच्या रूपाने देवदूतच धावून आला, असं म्हंटल्यास वावगं ठरू नये. तसेच मोटरमनचेही प्रसंगावधान वाखाणण्याजोगे. या दोघांमुळे काळ आला होता, पण वेळ आली नव्हती असं म्हणावसं वाटतं. कॉन्स्टेबल निकम यांचं महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री श्री. अनिल देशमुख साहेब यांनी शाल आणि श्रीफळ देऊन गौरव केला आहे. मराठी गप्पाच्या टीमलाही कॉन्स्टेबल निकम आणि मोटरमन यांचा अभिमान आहे. या दोघांनी दाखवलेले धैर्य हे कौतुकास्पद आणि अभिनंदनास पात्र आहे ! तसेच मराठी गप्पाच्या वाचकांना विनंती. ट्रेन असो वा कोणतेही प्रवासी वाहन वा जागा. तिथे ‘अति घाई दुःखात नेई’ हे वाक्य नेहमी लक्षात ठेवा. उशीर झाला तरीही चालेल पण लाखमोलाचा जीव जाता कामा नये. आपण जसे आम्हाला वाचक म्हणून प्रिय आहात, तसेच आपल्या घरच्यांनासुद्धा. प्रवास करत असताना स्वतःची आणि इतरांची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा.
बघा व्हिडीओ :