मीनाक्षी राठोड आणि कैलास वाघमारे हे जोडपं आपल्याला सुपरिचित आहेच. या दोघांच्याही भूमिका गेल्या काही काळात फारच लोकप्रिय झाल्या आहेत. कैलास यांना आपण तान्हाजी या सिनेमात चुलत्या या भूमिकेतून पाहिलं आहे. हि भूमिका आधी लिहिली गेली होती, पण छोटी होती. ऑडिशनच्या वेळेस कैलास याचं काम बघून ती पुढे वाढवली गेली. मीनाक्षी यांनाही आपण नाळ या सिनेमातून पाहिलं आहेच. बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेतील सरपंचाची बायको हि भूमिका खूप गाजली आहे. तसेच दोघांनीही शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला या लोकप्रिय नाटकांत एकत्र काम केलं आहे. तसेच मंडी या शॉर्ट फिल्ममध्येही हि जोडी एकत्र दिसली होती. अभिनयाव्यतिरिक्त दोघांनाही कविता आणि गाणं आवडतं. सोशल मिडीयावरील त्यांच्या एका विडीयो मध्ये दोघेही मिले सूर मेरा तुम्हारा हे गाणं गाताना दिसले होते. पण या दोघांचे सूर मात्र कुठे आणि कसे जुळले हे तुम्हाला माहिती आहे का? वाचा तर मग !
मीनाक्षी आणि कैलास एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. कैलास मीनाक्षी यांना दोन वर्षे सिनियर. ते कॉलेजच्या विविध कार्यक्रमांत ते सतत आघाडीवर असतं. त्यामुळे ते कॉलेजमध्ये प्रसिद्ध होतेच. मनमिळाऊ स्वभावामुळे त्यांचा मित्रपरिवार मोठा होता. कॉलेज मध्येच दोघांची पहिली भेट झाली. मग बोलणं सुरु झालं. बरं, हि मैत्री एवढी वाढली कि त्यातून छोटे छोटे वाद व्हायला लागले. पण हे वाद झाले असले तरीही काही वेळाने ते एकमेकांशी पुन्हा बोलायला लागत. त्यामुळे हि केवळ मैत्री नसून प्रेम असल्याची भावना मनात आहेत, हे दोघांनाही जाणवलं. त्यात कैलास कविता करायचे आणि त्या मीनाक्षी यांना पाठवायचे. त्या कवितांमुळे त्या त्यांच्या जास्तच प्रेमात पडल्या. पुढे काही काळाने त्यांनी एकमेकांना विचारलं. होकार कळतच होता. ते दोघेही पुढे कलाक्षेत्रात काम करायचं म्हणून मुंबईला आले. इथे कलाक्षेत्रात प्रवास चालु होता. दोघांनीही अनेक शॉर्ट फिल्म्स, नाटकं केली. कलाकार म्हणून स्वतःची ओळख निर्माण होत असतानाच त्यांच्या घरच्यांनीही लग्नाचा विषय पुढे केला आणि मुंबईत आल्यानंतर काही काळाने त्यांनी लग्न केलं.
आज ते दोघेही एक प्रथितयश कलाकार म्हणून उदयास येत आहेत. मीनाक्षी यांची “सुख म्हणजे नक्की काय असतं” या मालिकेत देवकी हि भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडते आहे. मीनाक्षी यांनी नाटक, सिनेमा, वेबसिरीज अशा विविध माध्यमांतून अभिनय केला आहे. कैलास यांनी अगणित शॉर्ट फिल्म्स, नाटकामध्ये लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून काम केलं आहे. ड्राय डे, भि कारी सारख्या व्यावसायिक सिनेमातूनही त्यांनी काम केले आहेच. लॉकडाऊनच्या आधी त्यांचे काही सिनेमे प्रदर्शनाच्या वाटेवर होते. नजीकच्या काळात त्यातले काही प्रदर्शित होतील. दोघांच्याही या वाटचालीत प्रेक्षकांची पसंती दोघांनाही मिळत आलेली आहेच. मीनाक्षी यांना लोकमत स्त्रीरत्न पुरस्कार मिळाला आहे. तसेच कैलास यांनाही त्यांच्या कलाकृती साठी संकृती कालादार्पणचे पुरस्कार मिळाले आहेत. दोघेही गुणी कलाकार आहेतच आणि सतत नवनवीन भूमिकांतून ते आपल्या भेटीस येत असतात. त्यांचे कवितांचे कार्यक्रमही होत असतात. तर अशा या हरहुन्नरी जोडीला त्यांचा पुढील प्रवासात अमाप यश मिळो आणि त्यांच्या प्रत्येक कलाकृती लोकप्रिय ठरोत या मराठी गप्पाच्या टीम कडून शुभेच्छा !
(Author : Vighnesh Khale)