Breaking News
Home / मराठी तडका / देवमाणूस मधील टोन्या खऱ्या आयुष्यात कसा आहे, बघा टोन्याची जीवनकहाणी

देवमाणूस मधील टोन्या खऱ्या आयुष्यात कसा आहे, बघा टोन्याची जीवनकहाणी

देव माणूस ही मालिका सुरू होऊन काहीच महिने झाले असतील. पण एवढ्या कमी कालावधीतही या मालिकेने स्वतःचा असा एक प्रेक्षकवर्ग तयार केला आहे. रहस्यमय मालिका असल्यामुळे यात गंभीर संवाद आणि प्रसंग हे ओघाने आलेच. पण या मालिकेचं वेगळेपण असं की या मालिकेत काही पात्र अशी आहेत की ज्यांच्या खुसखुशीत संवादांमुळे मालिकेत एक वेगळेपणा येतो. हे संवाद प्रामुख्याने ज्या व्यक्तिरेखांच्या तोंडी असतात त्या आहेत, मालिकेतील सरु आजी, डिंपल आणि टोन्या. यातील सगळ्यांत जास्त कौतुक प्रेक्षाकांना कोणाचं असेल तर ते टोन्या या व्यक्तिरेखेचं. कारण शाळकरी वयात विरल माने या मुलाने टोन्याची भूमिका अगदी नैसर्गिक वाटावी इतक्या सहजतेने बजावली आहे. टोन्या या व्यक्तिरेखे प्रमाणेच, विरल खऱ्या आयुष्यात सुद्धा चुणचुणीत आहे. त्याचा मालिकेतला वावर हा जसा गंमत आणणारा असतो तसाच शूटिंग चालू नसतानाही त्याचा मालिकेतील इतर कलाकारांसोबतचा वावर हा मस्तीपूर्ण आणि धम्माल असतो.

असा हा बाल कलाकार आहे मूळचा साताऱ्याचा. त्याला अभिनय आणि नृत्याची आवड आहे. देव माणूस ही त्याची पहिली मालिका. अभिनयाची आवड आणि सहजतेने तो साकारण्याची क्षमता यांमुळे तो या मालिकेचा अविभाज्य भाग झाला आहे. तसेच त्याचे डान्स व्हिडियोजसुदधा प्रसिद्ध झाले आहेत. डान्स करताना लागणारा बिनधास्तपणा आणि मनमोकळेपणा त्यात ठासून भरलेला आहे. त्यामुळे अभिनयासोबतच तो उत्तम डान्स ही करतो. त्याच्या घरी त्याचे आई वडील आणि बहीण असा परिवार आहे.

आधी सांगितल्या प्रमाणे त्याची इतर कलाकारांसोबत मौज मस्ती चालु असते. खासकरून डिंपल ही टोन्याच्या बहिणीची भूमिका बजावणाऱ्या अस्मिता देशमुख सोबत. इतर कलाकारांसोबत ही त्याचं मस्त ट्युनिंग जमतं. त्याचमुळे जेव्हा त्याचा वाढदिवस काही दिवसांपूर्वी होता, तेव्हा संपूर्ण युनिट ने मिळून त्याचा हा वाढदिवस साजरा केला. या आनंदाच्या प्रसंगी त्याचे आई वडीलही सामील होते. या वाढदिवस साजरा करतानाचे व्हिडियोज ही सोशल मीडिया वरती वायरल झाले होते.

सध्या विरल हा देव माणूस च्या शूटिंग मध्ये व्यस्त आहे. अतिशय कमी काळात केवळ आपल्या चुणचुणीतपणा आणि अभिनय यांच्या जोरावर तो लोकप्रिय झाला आहे. अजून त्याचा बराच मोठा अभिनय प्रवास होईल हे नक्की. आपल्या खुसखुशीत संवादांनी प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या या बालकलाकाराला मराठी गप्पाच्या टीम कडून येत्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !

आपण हा लेख वाचलात त्याबद्दल धन्यवाद. देवमाणूस या मालिकेतील अन्य कलाकारांच्या अभिनय प्रवासावर प्रकाश टाकणारे लेख आमच्या टीमने प्रसिद्ध केले आहेत. तुम्हाला ते ही लेख आवडतील अशी अपेक्षा आहे. ते लेख वाचण्यासाठी आपण फक्त एकच करायचं आहे. वर उपलब्ध असलेल्या सर्चमध्ये जाऊन देवमाणूस असं लिहून सर्च करायचं आहे. त्यामुळे या मालिकेतील कलाकारांविषयीचे लेख आपल्याला वाचायला मिळतील. मराठी गप्पाचे नियमीत वाचक असल्याबद्दल मनापासून धन्यवाद !

(Author : Vighnesh Khale)

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *