देव माणूस या मालिकेने अगदी कमी कालावधीत स्वतःचा असा प्रेक्षक वर्ग तयार केला आहे. यांतील कथानक हे सतत काही ना काही वळणं घेत असते. तसेच या मालिकेच्या कथेमुळे काही पात्रं नेहमी दिसतात. तर काही वेळेस नवीन पात्रं कथेच्या गरजेनुसार दाखल होतात तर काही मालिकेचा निरोप घेतात. मागच्या एका लेखात आपण पाहिलं की गायत्री बनसोडे या अभिनेत्रीची व्यक्तिरेखा संपुष्टात आल्याने तिला मालिकेचा निरोप घ्यावा लागला होता. गायत्री हीची रेश्मा ही व्यक्तिरेखा लोकांच्या ओळखीची झाली होती. याच व्यक्तिरेखेप्रमाणे सद्या अपर्णा ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय बनली आहे. रेश्माप्रमाणे अपर्णा ही सुद्धा डॉक्टर या व्यक्तिरेखेच्या खोट्या प्रेमाला बळी पडलेली दाखवली आहे. ही व्यक्तिरेखा निभावली आहे ऐश्वर्या नागेश हिने.
ऐश्वर्या ही मूळची चिपळूणची. तिथेच तिचं शालेय आणि बारावी पर्यंत शिक्षण झालं. या काळात ती सातत्याने सांस्कृतिक कार्यक्रमांचा भाग होत असे. मग ते एकपात्री नाटक असो वा एकांकिका. ती नेहमीच रंगमंचावर आत्मविश्वासाने वावरत आली आहे. या काळात तिने अनेक पुरस्कार जिंकले. तसेच तीच्या कॉलेज मध्ये भरवल्या जाणाऱ्या रॅम्प वॉक स्पर्धांमध्ये ही तिचा सहभाग असे. या स्पर्धांमधूनही तिने नेहमीच पहिला क्रमांक राखला आहे. या काळात तिची एक शॉर्ट फिल्मही प्रसिद्ध झाली होती. पुढे ती बी.एम.एम. करण्यासाठी म्हणून मुंबईला आली. इथेही तिने स्वतःचा कालाक्षेत्रातला सहभाग चालूच ठेवला. इथेही कॉलेज मध्ये भरवल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये ती हिरीरीने भाग घेते. याच काळात तिचं पहिलं दोन अंकी नाटकही प्रसिद्ध झालं होतं. गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात तिचं हे नाटक रंगमंचावर आलं होतं. गेला काही काळ ती देव माणूस या मालिकेच्या शूटिंग मध्ये व्यस्त आहे. या मालिकेत अपर्णाची व्यक्तिरेखा साकारताना तिने स्वतःचा संपूर्ण अनुभव पणाला लावला आहे, असं म्हंटल्यास वावगं ठरू नये. कारण व्यावसायिक मालिकांचा अनुभव नसतानाही तिने केलेलं काम हे कौतुकास पात्र ठरत आहे.
अभिनया व्यतिरिक्त ऐश्वर्याला डिझाइन्स काढायला खूप आवडतात. तिचे काही मेहेंदीचे डिझाइन्स हे एका प्रसिद्ध सप्ताहिकातही प्रसिद्ध झालेले आहेत. ऐश्वर्याला नाविन्याची आवड आहे हे तिच्या नवनवीन फोटोशुट्स वरुन दिसून येतं. तसेच ती मनमिळाऊ सुद्धा आहे. तिचं आणि मालिकेतील इतर कलाकारांची चांगली मैत्री झाल्याचं तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरील पोस्ट्स मधून दिसून येतं. तिचा या मालिकेच्या शूटिंग दरम्यान झालेला वाढदिवसही या सहकलाकारांनी अगदी उत्साहात साजरा केला होता. तर अशी या उत्साही, नाविन्याची ओढ असलेल्या नवोदित अभिनेत्रीने कलाविश्वात पदार्पणात उत्तम काम केलं आहे. येत्या काळातही ती अनेक उत्तमोत्तम भूमिका सादर करेल हे नक्की. तिच्या पुढील वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा !
(Author : Vighnesh Khale)