Breaking News
Home / मराठी तडका / देवमाणूस मालिकेतील कलाकारांची खरी नावे आणि माहिती, बघा खऱ्या आयुष्यात कसे आहेत

देवमाणूस मालिकेतील कलाकारांची खरी नावे आणि माहिती, बघा खऱ्या आयुष्यात कसे आहेत

रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या दुसऱ्या पर्वाने आपला काही काळापूर्वी निरोप घेतलाय. त्या जागी एक नवीन मालिका आली आहे जिने कमी काळात प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्यात यश मिळवलं आहे. बरोबर ओळखलंत. वज्र प्रोडक्शन निर्मित ‘देवमाणूस’ हे त्या मालिकेचे नाव. या मालिकेविषयी प्रेक्षकांची मतमतांतरे वेगवेगळी असू शकतात, पण यातील कलाकारांचा अभिनय मात्र प्रेक्षकांना नक्कीच आवडतो आहे असं दिसतं. यामुळेच या मालिकेतील विविध व्यक्तिरेखा आणि त्या साकारणारे कलाकार प्रसिद्ध होत आहेत. या लेखाच्या निमित्ताने या मालिकेतील कलाकारांची तोंडओळख करून घेण्याचा प्रयत्न.

किरण गायकवाड :

किरण गायकवाड या गुणी अभिनेत्याला आपण ‘लागिरं झालं जी’ या मालिकेतील भैय्यासाहेब या खलनायक व्यक्तिरेखेसाठी ओळखतो. या व्यक्तिरेखेचा “देअर यु आर” हा डायलॉग तर खूपच प्रसिद्ध झाला होता. या व्यक्तिरेखेसाठी अनेक नामांकनं आणि पुरस्कारही त्याने पटकावले आहेत. हि मालिका झाल्यानंतर किरण पुन्हा एकदा खलनायक म्हणून ‘देवमाणूस’ या मालिकेतून आपल्या समोर आला आहे. अर्थात, खलनायक असला तरीही हि भूमिका वेगळी आहे हे निश्चित.

आज आघाडीचा अभिनेता म्हणून प्रसिद्ध असला तरीही शाळेत-कॉलेजमध्ये केवळ एक आवड म्हणून किरणने अभिनयाकडे पाहिलं. त्याचा एकंदर अभिनय बघून त्याच्या प्राध्यापकांनी त्याला या क्षेत्रात येण्याविषयी सुचवलं होतं. पण घरी आर्थिक हातभार लागावा या उद्देशाने शिक्षण झाल्यावर किरणने नोकरी धरली. पण काही कारणांमुळे ती नोकरी सुटली आणि किरण पुन्हा रंगमंचाकडे वळला तो कायमचा. दरम्यानच्या काळात अभिनयासोबत, कलादिग्दर्शक म्हणूनही त्याने काम केलं. अशाच एका कामानिमित्ताने त्याची ओळख झाली ती शिवानी बावकर हिच्याशी. शिवानीने काही काळाने “लागिरं..” साठी ऑडिशन दिली होतं. तिची निवडही झाली होती. तिने मालिकेचे लेखक तेजपाल यांना किरण याचं नाव सुचवलं होतं. किरण कडून फोटोज मागवून ते दाखवले होते. पण तेजपाल यांना त्यावेळी सदर व्यक्तिरेखेसाठी किरण योग्य वाटला नाही. पण काही काळाने निखील चव्हाण या आपल्या मित्राला भेटताना तेजपाल आणि किरण यांची गाठ पडली. यावेळेस किरणचे फोटोज पाहिल्याचं तेजपाल यांना आठवलं. किरणचं एकंदर व्यक्तिमत्व भैयासाहेब या मुख्य खलनायकासाठी उत्तम असेल असं तेजपाल यांना वाटलं. त्याच्या अभिनयाची एक विडीयो क्लिप त्यांनी मागवून घेतली आणि पुढे किरण याला भैय्यासाहेब हि व्यक्तिरेखा मिळाली. कलाक्षेत्रात कोणतीहि पार्श्वभूमी नसतानाही मेहनत, चिकाटी, नाविन्याची आवड यांमुळे आज किरणला लोकप्रियता मिळवता आली आहे. अशा या गुणी कलाकाराला येत्या काळात अनेक विविध भूमिका मिळोत आणि त्याचा यशाचा आलेख सदैव उंचावत राहो या मराठी गप्पाच्या टीम कडून शुभेच्छा !

अस्मिता देशमुख :

देवमाणूस या मालिकेतील डिंम्पी हि व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहते ते तिच्या संवादांमुळे. जे पात्र लोकांना आवडतं त्यावर मिम्स बनतात त्यांच्याबद्दल तर हा सध्याचा एक ट्रेंडच आहे म्हणा. तर अशा या डिंम्पीचं म्हणजे डिंपलचं खऱ्या आयुष्यातलं नाव आहे, अस्मिता देशमुख. अस्मिता मुळची पुणेकर. सायकॉलॉजीस्ट म्हणून शिक्षण पूर्ण करत असताना तिने अभिनयाची आवड जोपासली आहे. तिच्या कारकिर्दीतील ‘देवमाणूस’ हि मोठी कलाकृती.

या मालिकेसोबतच तिने म्युझिक विडीयोज, शॉर्ट फिल्म्स यांतून अभिनय केला आहे. तीच्या “मले पिरतीचं गोखरू रुतलं गं” या म्युजिक विडीयोचं खूप कौतुक झालं होतं. तसचं तिने अभिनय केलेलं टिक टॉक विडीयोज सुद्धा प्रसिद्ध झाले होतेच. तिच्या अकार आणि चाणक्य या कलाकृतीही गाजल्या आणि अर्थातच त्यातही तिने स्वतःची छाप सोडली आहेच. अशा या हुशार आणि तरुण अभिनेत्रीला तिच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !

विरल माने :

डिंम्पी म्हंटली कि तिचा भाऊ टोन्याचा विषय आलाच. डिंम्पी सारखाच त्याच्या संवादांमुळे तो लक्षात राहतो. लहान असला तरीही चुणचुणीत आहे अशी हि व्यक्तिरेखा. या व्यक्तिरेखेला साजेसा अशा एक छोटा अभिनेता हि व्यक्तिरेखा साकारतो आहे. या छोट्या अभिनेत्याचं नाव आहे विरल माने. विरल हा मुळचा साताऱ्याचा आहे. शाळकरी वयाचा असला तरीही त्याची अभिनयाची समज खूप चांगली आहे. त्यामुळे चुणचुणीत टोन्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो.

त्याला डान्स करण्याचीहि आवड आहे. त्याचे काही डान्स विडीयोज सुद्धा आपल्याला सोशल मिडीयावरती पहायला मिळतात. तो जसा प्रेक्षकांचा आवडता आहे तसाच तो त्याच्या सहकलाकारांचाही आवडता आहे. त्यांच्या सोबत सेटवर त्याची धम्माल चालू असते. नुकताच त्याचा वाढदिवस झाला तेव्हा सगळया कलाकार मंडळींनी त्याचा वाढदिवस अगदी जल्लोषात साजरा केला. अशा या नवोदित कलाकाराच्या पुढील शिक्षण आणि वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा !

रुख्मिणी सुतार :

अभिनयाला वयाचं बंधन नसतं हेच खरं असं वाटायला लावणारी एक व्यक्तिरेखा आपल्याला देव माणूस या मालिकेत पहायला मिळते. या मालिकेतील टोन्या आणि डिम्पीची आज्जी हि व्यक्तिरेखा प्रेक्षकांमध्ये भलतीच प्रसिद्ध झाली आहे. तिरकस बोलण्याच्या शैलीमुळे या आज्जींना घराघरातून लोकप्रियता मिळते आहे. या तिरकस बोलण्यात विशेषकरून ज्या म्हणी आजींच्या तोंडी असतात त्यांच्यामुळे संवादांना एक प्रकारची फोडणी मिळते असं म्हणू शकतो.

हि खमकी आज्जी साकारली आहे रुख्मिणी सुतार यांनी. त्यांना आपण काही मालिका आणि सिनेमांतून पाहिलेलं आहेच. त्यांचे गाजेलेले सिनेमे म्हणजे इडक, अतिथी इत्यादी. तसेच मिर्सेस मुख्यमंत्री या मालिकेतही त्यांनी वैशिष्ठ्यपूर्ण भूमिका केली होती. सध्या त्यांनी साकारलेली आज्जी प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू आणते आहे. त्यांच्या या पुढील काळातील भूमिकाही प्रेक्षकांना आनंद देणाऱ्या असतील हे नक्की. त्याच्या पुढील वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टीमकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा !

गायत्री बनसोडे :

नुकतीच देवमाणूस या मालिकेतील एका व्यक्तिरेखेची एग्झीट झाली. ती व्यक्तिरेखा म्हणजे रेशमा. हि व्यक्तिरेखा साकारली होती नवोदित, बिनधास्त अभिनेत्री गायत्री बनसोडे हिने. या व्यक्तिरेखेच्या शेवटी या मालिकेतील सहकलाकारांनी गायत्रीला निरोप दिला. गायत्रीने शिक्षण पूर्ण झाल्यावर तिने एके ठिकाणी काम करायला सुरुवात केली. पण काही निमित्ताने तिला नाटकांत काम करण्याची संधी मिळाली. हे तिच्या आयुष्यातील एक वेगळं वळण ठरलं. यानंतर ते आजतागायत तिने सातत्याने नाटकांतून काम केलेलं आहे. द लास्ट कलर, गाईच्या शापाने हि तिची सुरुवातीच्या काळातील नाटके. यातून पुढे अभिनय शिकत शिकत तिने शॉर्ट फिल्म्स, वेब सिरीज यांच्यामध्ये आपला ठसा उमटवला आहे. या कलाकृतींसोबतच गायत्रीने, मेहनत वाया गेली या मराठी गाण्यातही अभिनय केलेला आहे. या गाण्याला युट्युबवर दोन लाखाहून अधिक प्रेक्षक लाभले आहेत.

तिने आपल्या छोट्याश्या कारकिर्दीत नाटक, शॉर्ट फिल्म्स, वेब सिरीज, सिनेमा, म्युझिक विडीयो अशी विविध माध्यमं हाताळली आहेत. यासाठी स्वतःच्या कलेवर जेवढा विश्वास असावा लागतो तसाच बिनधास्तपणा सुद्धा. तिच्या सोशल मिडिया अकाउंट वरूनही तिचा बिनधास्त अंदाज दिसून येतो. अशा या नवोदित, नवनवीन प्रयोग करण्यास उत्सुक आणि बिनधास्त अभिनेत्रीला येत्या काळातही उत्तम भूमिका मिळतील हे नक्की. तिच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा !

एकनाथ गीते :

रेश्मा या व्यक्तिरेखेचा विषय निघाला कि तिच्या नवऱ्याचा म्हणजेच विजय या व्यक्तिरेखेचा उल्लेख होतोच. श्रीमंत, तापट, पैशाचा माज असलेला अशी हि व्यक्तिरेखा. हि भूमिका साकारली आहे एका गुणी अभिनेत्याने. एकनाथ गीते असं या कलाकाराचं नाव. एकनाथ मुळचा परभणीचा. लहानपणापासून अभिनय करण्याची आवड. शाळेत तो सांस्कृतिक कार्यक्रमांत भाग घेत असे. पुढे अभिनयाचं शिक्षण घ्यावं आणि कलाक्षेत्रात काम करावं म्हणून मुंबईला आला. शिक्षण घेता घेता त्याने मॉडेलिंग केलं, अभिनय केला आणि म्हणता म्हणता फार कमी काळात अनेक कलाकृतींचा तो भाग बनला.

प्रेमा तुझा रंग कसा, तू अशी जवळी रहा, श्री गुरुदेव दत्त, या त्याच्या गाजलेल्या मराठी मालिका. क्राईम पेट्रोल, मेरे साई या हिंदी मालिकांतूनही त्याने अभिनय केलेला आहे. तांडव हा त्याचा पहिला मराठी चित्रपट. अभिनयासोबतच वॉईस ओवर कलाकार म्हणूनही त्याने काम केलेलं आहे. झी फाईव्हच्या एका वेब सिरीजमध्ये त्याने बंगाली ते हिंदी अशा डबिंगसाठी वॉईस ओवर कलाकार म्हणून काम केलेलं आहे. काही जाहिरातींमध्येही त्याने अभिनय केलेला आहे.

सध्या त्याची विजय हि व्यक्तिरेखा प्रचंड गाजते आहे. या व्यक्तिरेखेचे चाहते विविध विडीयोज, चित्र यांच्या माध्यमांतून त्यांचं प्रेम सतत व्यक्त करत असतात. एकनाथ साठी विजय हि व्यक्तिरेखा आणि देवमाणूस हा मैलाचा दगड ठरणारी भूमिका अनं कलाकृती ठरते आहे हे नक्की. या गुणी अभिनेत्याच्या पुढील वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा !

(Author : Vighnesh Khale)

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *