देव माणूस या मालिकेने अल्पावधीत स्वतःचा असा एक प्रेक्षकवर्ग तयार करण्यात यश मिळवलं आहे. या यशात डॉक्टर, डिंपी, टोन्या, डिंपी टोन्याची आजी या व्यक्तिरेखांचा महत्वाचा वाटा आहे. कारण डॉक्टर ही व्यक्तिरेखा गंभीर वळणाची असली, तरीही वर नमूद केलेल्यांपैकी काही व्यक्तिरेखा या मालिकेत गंमत निर्माण करतात, वातावरण हलकं फुलकं करण्याचं काम करतात. यात टोन्याच्या आजीच्या म्हणी तर घराघरांत प्रसिद्ध होत आहेत. अशा या व्यक्तिरेखांसोबत मालिकेतील इतर व्यक्तिरेखाही वाखाणल्या जात आहेत. यातील एक व्यक्तिरेखा म्हणजे मंगल ही होय. मंगल ही व्यक्तिरेखा म्हणजे टोन्या आणि डिंपीची आई. ही व्यक्तिरेखा साकारली आहे अंजली जोगळेकर यांनी.
अंजली यांचं नाव हे लघुपटाच्या नियमित प्रेक्षकांसाठी नवीन नाही. कारण आजतागायत त्यांनी अनेक प्रसिद्ध असे लघुपट म्हणजे शॉर्ट फिल्म्स केलेल्या आहेत. यात अगदी प्रामुख्याने नाव घ्यावेसे वाटते ते म्हणजे काव काव या लघुपटाचे. अं धश्रद्धा निर्मूलन या विषयाला केंद्रस्थानी धरून सदर लघुपट तयार केलेला होता. या लघुपटाला पुरस्कार मिळालेच सोबत प्रेक्षकांचाही उत्तम प्रतिसाद लाभला. आज युट्युब वर या लघुपटाला जवळपास ६८ हजार प्रेक्षकांनी पाहिलं आहे. त्यांचे वंदना, सावित्री, दिवली नाही विझता कामा, फिंगरप्रिंट, सिलवट हे लघुपटही प्रसिद्ध झाले आहेत. यांतील सिलवट हा अलीकडच्या काळातील लघुपट. त्यांच्या या लघुपटालाही अनेक पुरस्कार आणि नामांकनं मिळाली आहेत. त्यांच्या कारकिर्दीतील वैशिष्ठयपूर्ण बाब म्हणजे कामातील सातत्य. त्यांनी अभिनयासाठी लघुपट या माध्यमासोबत विविध माध्यमांतून अभिनय केलेला आहे. खिचिक, त्रिज्या, गॅट मॅट हे त्यांनी अभिनित केलेले काही सिनेमे. त्रिज्या या सिनेमाचे परदेशातील फेस्टिव्हल्समधून कौतुक झाले होते. लघुपट, सिनेमा या माध्यमांसोबत त्यांनी मालिका आणि जाहिरातीतूनही अभिनय केलेला आहे. एका बँकेच्या जाहिरातीत त्यांनी सचिन तेंडुलकर यांच्या सोबत काम केले होते. तसेच मालिकांमध्येही त्यांनी उत्तम अभिनय केलेला आहे.
डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित मालिकेत त्यांनी एक व्यक्तिरेखा साकारली होती. तसेच मोलकरीणबाई, मिर्सेस मुख्यमंत्री या मालिकांतही त्या दिसल्या होत्या. अभिनयासोबत त्यांना नृत्य, सांस्कृतिक कार्यक्रम यांची आवड असल्याचे त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट्स मधून दिसून येते. सध्या त्या देव माणूस या मालिकेच्या शूटिंग मध्ये व्यस्त आहेत. वेळोवेळी शूटिंगच्या मधल्या वेळेतील बिहाइंड द सीन्स फोटोज त्या अपलोड करत असतात. तसेच मध्ये मध्ये इतर कलाकारांसोबत त्या गंमती जंमतींमध्ये सहभागी होत असतात. त्यांच्या आत्तापर्यंतच्या कलाप्रवासा प्रमाणेच या पुढच्या काळातही त्यांच्या विविध भूमिका, विविध माध्यमांतून आपल्याला भेटीस येत राहतील हे नक्की. त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टीमकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा !
(वरील फोटोत अंजली जोगळेकर आणि सहअभिनेते माधव अभ्यंकर देवमाणूस मालिकेच्या सेटवर)
(Author : Vighnesh Khale)