देव माणूस या मालिकेचे काही काळापूर्वी आगमन झाले तेव्हा या मालिकेविषयी खूप उत्सुकता होती. थरारपट असणाऱ्या या मालिकेचं कथानक कसं असेल याविषयी बऱ्याच गोष्टी चर्चिल्या गेल्या आणि मालिका दाखल झाल्यापासून या मालिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. स्वतःचा एक प्रेक्षकवर्ग निर्माण करण्यात या मालिकेने यश मिळवलेले आहे. या मालिकेतील अनेक कलाकारांविषयी आपण मराठी गप्पावरचे लेख वाचले असतीलच. त्यास आपला वाचकसंख्येच्या रूपात जो भरघोस प्रतिसाद मिळाला त्याबद्दल धन्यवाद. हा लेख लिहीत असतानाही मालिकेत नेहमीप्रमाणे कथानक वेगवेगळी वळणं घेत आहे. याच्या केंद्रस्थानी डॉक्टर आणि मंजुळा आहेत. आपण यापूर्वी मालिकेतील डॉक्टरांची भूमिका करणाऱ्या किरण गायकवाड यांच्याविषयी जाणून घेतलं आहेच. आज आपण मंजुळा ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेत्रीविषयी जाणून घेऊ.
मंजुळाच्या भूमिकेत असलेली गुणी अभिनेत्री आहे प्रतिक्षा जाधव. मुळची पुणेकर असलेल्या प्रतिक्षाने कलाक्षेत्रात अनेक कलाकृतींमधून अभिनय आणि नृत्याविष्कार साकार केला आहे. अभिनयातील या अनुभवाचा वापर तिने मंजुळा ही व्यक्तिरेखा साकारताना अगदी उत्तमपणे केला आहे. त्यामुळे सुरुवातीला डॉक्टरला न जुमानणारी आणि मग गावकऱ्यांच्या वागणुकीमुळे दुखावलेली मंजुळा तिने उत्तमरीतीने साकारली आहे. प्रतिक्षा हिचा अभिनय प्रवास सुरु झाला ते रंगमंचावरून. एकांकिका आणि नाटकं यांतून अभिनय करत करत मग तिने चित्रपट आणि मालिका क्षेत्रांत प्रवेश केला. तिने अभिनित केलेले चित्रपट म्हणजे खेळ आयुष्याचा, चला खेळ खेळूया दोघे, तात्या विंचू लगे रहो. चित्रपटात यशस्वी होत असताना तिने क्रा ईम पेट्रोल, छोटी मालकीण, मोलकरीणबाई, दिल ढुंढता है या सुप्रसिद्ध मालिकांतून अभिनय केला आहे. या मालिकांतून सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही भूमिका तिने खुबीने वठवल्या आहेत. अभिनयासोबत ती नृत्यात निपुण आहे. तिच्या अनेक चित्रपटात तिने नृत्य केलेलं आहे. अभिनय, नृत्य यासोबतच तिला नवनवीन फॅशन ट्रेंड्स चीही आवड आहे. किंबहुना, तिचे विविध फोटोज पाहिले असता, वेगवेगळे लुक्स करायला तिला आवडतात. पण ही तिची केवळ आवड राहिली नसून, तिने यात व्यावसायिक म्हणून सहभाग घेतला आहे. तिने स्वतःचं एक सलोन पुण्यात सूरु केलं आहे.
मालिका, चित्रपट यांसोबतच तिने म्युझिक व्हिडियोज मधूनही अभिनय केलेला आहे. या गणेशोत्सवात सागरिका म्युझिक तर्फे तिचा ‘हे गणराया’ हा म्युझिक व्हिडिओ प्रसिद्ध झाला. त्यास उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. तसेच तिचं स्वतःचं असं युट्युब चॅनेल आहे. ज्यावर शूटिंगमधल्या फावल्या वेळेत चालणारी मस्ती आपल्याला पाहायला मिळते. तसेच प्रतिक्षाला फिरण्याचीही प्रचंड आवड आहे. तिच्या या युट्युब चॅनेल आणि इतर सोशल मीडियाच्या माध्यमांतून आपल्याला तिचे परदेशवारी केल्याचे फोटोज आणि व्हिडियोज पाहायला मिळतात. आयुष्य असो वा कारकीर्द. प्रतिक्षा हिला नवनवीन गोष्टी पडताळून पाहायला आवडतात असं दिसून येतं. तिच्या फिरण्याच्या आवडीवरून जसं हे कळतं, तसंच ती करत असलेल्या विविध भूमिका आणि त्यातील तिचा दिवसागणिक बहरत जाणार अभिनय याची साक्ष देतात. येत्या काळातही या प्रयोगशिलतेमुळे प्रतिक्षा आपल्याला विविध भूमिका आणि माध्यमांतून दिसेल आणि कलाकृतींतून आनंद देईल हे नक्की. तिच्या पुढील वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा !
(Author : Vighnesh Khale)