वज्र प्रोडक्शन निर्मित देव माणूस हि मालिका काही आठवड्यांपूर्वी मराठी मालिका क्षेत्रात दाखल झाली आहे. यातील दोन मुख्य कलाकार म्हणजे मध्यवर्ती भूमिकेतील डॉक्टरांची भूमिका करणारे किरण गायकवाड आणि डिम्पी हि भूमिका साकारणारी अस्मिता देशमुख यांच्या अभिनय प्रवासाचा आपण मराठी गप्पा वर आढावा घेतला होता. त्या लेखांना असंख्य वाचक लाभले. तुमच्या या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. नुकतीच या मालिकेतील एका व्यक्तिरेखेची एग्झीट झाली. ती व्यक्तिरेखा म्हणजे रेशमा. हि व्यक्तिरेखा साकारली होती नवोदित, बिनधास्त अभिनेत्री गायत्री बनसोडे हिने. या व्यक्तिरेखेच्या शेवटी या मालिकेतील सहकलाकारांनी गायत्रीला निरोप दिला. यानिमित्ताने मराठी गप्पाने गायत्रीच्या अभिनय कारकीर्दीचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न केला आहे. आमच्या इतर लेखांप्रमाणे तुम्हाला हा लेखही आवडेल हे नक्की.
गायत्री हि मुळची मराठवाड्यातली. पण तिचं बालपण पुण्यानजीक पिंपरीत गेलं. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण हे पुण्यात झालं. तिने फॅशन डिझायनरचा कोर्स केला होता. पण पुढे नोकरी लागली आणि त्याच कामात तिचं मन व्यग्र झालं. पण काही निमित्ताने तिला नाटकांत काम करण्याची संधी मिळाली. हे तिच्या आयुष्यातील एक वेगळं वळण ठरलं. यानंतर ते आजतागायत तिने सातत्याने नाटकांतून काम केलेलं आहे. द लास्ट कलर, गाईच्या शापाने हि तिची सुरुवातीच्या काळातील नाटके. यातून पुढे अभिनय शिकत शिकत तिने शॉर्ट फिल्म्स, वेब सिरीज यांच्यामध्ये आपला ठसा उमटवला. या सरत्या लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात तिने एक छोटंसं नाटक ऑनलाईन हि सादर केलं. ‘शेवट तितका गंभीर नाही’ हे त्या नाटकाचं नाव.
वर उल्लेखल्याप्रमाणे तिने शॉर्ट फिल्म्समध्येही काम केलंय. ‘आस’, ‘खत का आनंद’ या हिंदी शॉर्ट फिल्म्समध्ये ती झळकली आहे. आस या शॉर्ट फिल्मला दीड लाखांहून अधिक सिनेरसिकांनी पाहिलेलं आहे. तसेच काळ या सिनेमातही तिने अभिनय केला आहे. शॉर्ट फिल्म च्या सोबतीने सध्या वेब सिरीजची चलती आहे. अशा काळात हि नव्या दमाची अभिनेत्री पाठी कशी राहील. तिची सध्या ‘जेव्हा गर्लफ्रेंड शिव्या देते’ हि वेब सिरीज सुरु आहे. यांच्या कलाकृतींसोबतच गायत्रीने, मेहनत वाया गेली या मराठी गाण्यातही अभिनय केलेला आहे. या गाण्याला युट्युबवर दोन लाखाहून अधिक प्रेक्षक लाभले आहेत. विविध माध्यमांतून अभिनय करताना, गायत्रीने स्वतःची नृत्याची आवडही दांडिया ग्रुपच्या सोबतीने जपली आहे. तिने नुकतीच टाईम्स ऑफ इंडिया या प्रथितयश वृत्तपत्राला मुलाखत दिली त्यात तिने हे सांगितलं.
नृत्यासोबतच तिला वाचनाचीही आवड आहे. तिच्या सोशल मिडिया अकाउंटवरून ती वेळोवेळी वाचत असलेली पुस्तके आपल्या चाह्त्यांसोबत शेअर करत असते. याव्यतिरिक्त तिला खाण्याची हि विशेष आवड आहे. ती अत्यंत फुडी आहे. गेल्या काही वर्षांपासून गायत्री हि कलाक्षेत्रात मुशाफिरी करते आहे. त्यात नाटक, शॉर्ट फिल्म्स, वेब सिरीज, सिनेमा, म्युझिक विडीयो हि विविध माध्यमं तिने हाताळली आहेत. यासाठी स्वतःच्या कलेवर जेवढा विश्वास असावा लागतो तसाच बिनधास्तपणा सुद्धा. तिच्या सोशल मिडिया अकाउंट वरूनही तिचा बिनधास्त अंदाज दिसून येतो. अशा या नवोदित, नवनवीन प्रयोग करण्यास उत्सुक आणि बिनधास्त अभिनेत्रीला येत्या काळातही उत्तम भूमिका मिळतील हे नक्की. तिच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा !
आपण हा लेख वाचलात. वर सांगितल्याप्रमाणे या मालिकेतील किरण गायकवाड आणि अस्मिता देशमुख या कलाकारांविषयी मराठी गप्पाच्या टीमने लेख लिहिले आहेत. तसेच या मालिकेच्या निर्मात्या श्वेता शिंदे यांच्या अभिनय कारकिर्दीविषयी सुद्धा मराठी गप्पाने एक लेख लिहिलेला आहे. आपणास हे लेख वाचायचे असतील तेव्हा, वर उपलब्ध असलेल्या सर्च ऑप्शन मध्ये जा. देवमाणूस असं लिहा आणि सर्च करा. आपल्याला मराठी गप्पावर उपलब्ध असलेले सगळे लेख वाचायला मिळतील. मराठी गप्पावरील लेख सातत्याने वाचत असल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद !
(Author : Vighnesh Khale)