लॉक डाऊन काळात अनेक मालिका आपल्या भेटीस आल्या होत्या. काही खूप वर्षांपूर्वीच्या पौराणिक मालिका होत्या, तर काही अगदी अर्ध्या दशकापूर्वीच्या. अशीच एक मालिका, हा लेख लिहीत असताना अजूनही पुनःप्रक्षेपित होते आहे. आजही प्रेक्षकांच्या मनातील या मालिकेचं गारुड कमी झालं नाहीये, असंच म्हणावं लागेल. या मलिकेचं नाव देवयानी. या मालिकेतून अनेक नवे चेहरे पुढे आले आणि आज प्रथितयश कलाकार म्हणून ते प्रसिद्ध आहेत. यांतील सर्वात लक्षात राहिलेला चेहरा म्हणजे शिवानी सुर्वेचा. शिवानी हिचा उल्लेख यापूर्वी मराठी गप्पाच्या लेखांमधून झाला होता. परंतु, तिच्या कारकीर्दीवर दृष्टिक्षेप टाकणारा लेख लिहिला नव्हता. आज या लेखाच्या निमित्ताने आपण या सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या जीवन आणि कलाप्रवासविषयी जाणून घेणार आहोत.
शिवानीचा जन्म झाला तो चिपळूण येथे. पुढे कोकणातून सुर्वे कुटुंबीय डोंबिवली येथे राहण्यास आले. लहान वयापासूनच शिवानीला परिस्थितीचा अंदाज आला होता. आई वडिलांचे कष्ट दिसत होते. त्यामुळे आपण त्यांना हातभार लावावा आणि काही पैसे जमवून द्यावे, असं शिवानीला वाटे. म्हणतात ना, इच्छाशक्ती तीव्र असेल, तर मार्ग सापडत जातो. कलाक्षेत्राविषयी आवड असणाऱ्या शिवानीला नाटकांतून आणि मालिकांतून काम करण्याची संधी मिळाली. पण या संधी काही सहजगत्या मिळाल्या नाहीत. त्यासाठी गणित ठिकाणी तिला ऑडिशन्स द्याव्या लागल्या. तसेच अनेक कलाकार नेहमी मुलाखतींतून सांगत असतात त्याप्रमाणे या क्षेत्रात नकार ऐकण्याचीही सवय असावी लागते. शिवानी च्या बाबतीतही असंच काहीसं झालं. बिग बॉस मराठी च्या दुसऱ्या पर्वात याविषयी बोलताना, तिने म्हंटलं होतं की एका प्रॉडक्शन हाऊसने तिला जेव्हा पहिल्यांदा नकार दिला, तेव्हा तिला हा नकार खूप जिव्हारी लागला. तिने मग पुढचे काही महिने केवळ ऑडिशन्स देण्यात घालवले. स्वतःतील अभिनेत्रीला घडवण्याचे प्रयत्न चालू होतेच. काही काळाने तिला यश आलं आणि तिचा मालिका क्षेत्रातील प्रवास सुरु झाला तो आजतागायत.
गमंत अशी की ज्या प्रॉडक्शन हाउस मधून नकार आला होता, त्यांच्याही काही मालिकांमध्ये तिने काम केलं होतं. आज पर्यंत तिने असंख्य मराठी आणि हिंदी मालिका केल्या आहेत. नव्या, सुंदर माझं घर, अनामिका, लाल इश्क, एक दिवाना था, तू जीवाला गुंतवावे या तिच्या काही मालिका. या मालिका करत असताना कलाक्षेत्रात प्रगती करणं, आर्थिक सुबत्ता मिळवणं ही उद्दिष्टे होतीच. पण सोबत एक स्वप्न होतं. सुरुवातीच्या काळात मुंबईला शूटिंगसाठी खूप ये जा करावी लागे. पण त्याला पर्याय नव्हता. त्यामुळे मुंबईत स्वतःचं हक्काचं घर असावं आणि स्वतःचं वाहन असावं अशी शिवानीची इच्छा होती. सातत्याने काम केल्याने तिने या दोन्ही इच्छा पूर्ण केल्या. अगदी तरुण वयात तिने मुंबईत समुद्राशेजारी स्वतःचं घर आणि गाडी घेतल्याचा उल्लेख तिने बिग बॉस मराठी २ मधील एका टास्क दरम्यान केला होता. या काळात शिवानीने शॉर्ट फिल्म मध्येही काम केलंय. ‘अटॅक-निर्भया…फिअर नो मोर’ असं या शॉर्ट फिल्मचं नाव. आजपर्यंत युट्युबवर जवळपास ८० लाख लोकांनी ही शॉर्ट फिल्म पाहिलेली आहे.
सोबतच तिचा एक सिनेमाही काही काळापूर्वी प्रसिद्ध होऊन गेला. ‘ट्रिपल सीट’ असं त्या सिनेमाचं नाव. यात तिच्यासोबत अंकुश चौधरी, पल्लवी पाटील हे आघाडीचे कलाकारही होते. शिवानीच्या काळाप्रवासाचा धांडोळा घेतांना असं लक्षात येतं की, तिने कलाक्षेत्रातील मालिका माध्यमातून सगळ्यात जास्त काम केलं आहे. सोबत शॉर्ट फिल्म आणि बिग बॉस मराठी सारखा रियालिटी शो आहेच. तसेच सिनेमांतूनही ती दिसते आहे. यांमुळे अभिनेत्री म्हणून तिच्या गाठीशी खूप मोठा अनुभव कमी काळात जमा झाला आहे. आजतागायत तिने ज्याप्रकारे, या अनुभवाचा वापर करून प्रत्येक व्यक्तिरेखा जिवंत केली आहे त्याप्रमाणे येत्या काळातही ती तिच्या प्रत्येक भूमिका अविस्मरणीय करेल हे नक्की. तिच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टीमकडून तिला खूप खूप शुभेच्छा !
(देवयानी फेम शिवानी सुर्वे सोबत सहकलाकार संग्राम साळवी)
(Author : Vighnesh Khale)