आपली मराठी भाषा ही समृद्ध भाषांपैकी एक भाषा आहे. कोणत्याही भाषेस समृद्ध बनवणारे अनेक घटक असतात. त्यातील दोन महत्वाचे घटक म्हणजे म्हणी आणि वाक्प्रचार होय. अवलोकन आणि अनुभव यांतून हे दोन्ही प्रकार समृद्ध होत जातात आणि पर्यायाने भाषेस सौष्ठव प्राप्त करून देतात. त्यामुळे त्यांचे स्वतःचे असे एक स्थान असते. आपली भाषा तर याचे उत्तम उदाहरण आहे.
अर्थात आपल्याकडे या दोहोंचा भरणा खूप आहे. पण तरीही काही म्हणी आणि वाक्प्रचार आपण वरचेवर वापरत असतो. दैनंदिन जीवनात त्यांचा वापर करत असतो. हा वापर इतका असतो की एखादी घटना बघायला आणि यांचा वापर व्हायला एकच वेळ येते. यातील एक म्हणजे ‘देव तारी त्याला कोण मारी’ ही ती म्हण होय. आपल्या आजूबाजूला गेल्या दोन वर्षांत जे काही वातावरण तयार झालं आहे ते पाहता आपण याचा वापर अनेकवेळा केलेला असेल. याव्यतिरिक्त ही काही प्रसंग असे ही घडले की ज्यांना आपण सगळ्यांनीच बघितलं आहे. ते प्रसंग पाहून आपली तर दातखीळीच बसली होती. अगदी जीवावर बेततं की काय अशी ही अवस्था दिसून येत होती. पण सरतेशेवटी ‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीचा प्रत्यय आपण स्वतः बघितला.
एक प्रसंग तर आपण विसरू म्हणालो तरी विसरणार नाही. तो प्रसंग म्हणजे भरधाव मेल समोर येत असते आणि तेवढ्यात प्लॅटफॉर्म वर असलेलं एक मुलं खाली रुळांवर पडतं. या प्रसंगी त्याची आई बघू शकत नसल्याने हतबल आहे. पण कोण कुठूनसा मयुरेश शेळके नावाचा रेल्वे कर्मचारी येतो आणि धावत जाऊन त्या मुलाला वाचवतो. त्या कर्मचाऱ्यांचं तिथे असणं, त्याने अगदी चित्याला लाजवेल या वेगाने जाणं आणि त्या लहानग्याला आणि सोबत स्वतःच्या जीवाला वाचवणं. सगळंच अतर्क्य आणि अशक्य वाटावं असं पण तरीही शक्य होऊन गेलेलं. एवढ्या चट्कन कसं काय सगळं झालं याचं आजही आश्चर्य वाटतं. त्यामुळे मयुरेशच्या धडासाला दाद ही दिली जाते आणि देवाला नमन ही केलं जातं. अशीच अतर्क्य वाटणारी एक घटना मागील वर्षी घडली. ही घटना म्हणजे अनेक छोट्या छोट्या पण महत्वाच्या गोष्टींनी बनलेला प्रसंग आहे. हे कसं काय शक्य झालं आहे हे काही सांगता येत नाही. अनेकांना आठवत नसेल तर केवळ एक आठवण म्हणून सांगावसं वाटतं. ही घटना घडते एका रस्त्यावर. एका सीसीटीव्ही फुटेज मधून आपल्याला एक बाईकस्वार रस्त्याच्या कडेला उभा असलेला दिसून येतो. बरं तो बाईकवरच असतो. त्यामुळे त्याला हालचाल करण्यावर मर्यादा येतात.
तेवढ्यात त्याला मागून बहुधा काहीसा मोठा आवाज येतो किंवा एखादं मोठं वाहन येत असावं याचा अंदाज आला असावा. आपल्या बाबतीत ही अनेकवेळा हे होतं. पण हे भलं मोठं धुड म्हणजे एक मोठं जेसीबी कंपनीचं अवजड वाहन असतं. बरं नुसतं आलं असतं तर गोष्ट वेगळी. पण या अवजड वाहनाच्या चालकाला त्याचा तोल सांभाळता येत नाही बहुधा. त्यामुळे एकदम रस्त्याच्या एका कडेला असलेलं हे वाहन हा तरुण उभा असलेल्या कडेकडे येतं. हे सगळं अगदी झटक्यात होतं. अगदी एका क्षणांत होतं. व्यक्ती कितीही चपळ असेल तरी अशा प्रसंगी काही करू शकेल असं वाटत नाही. इतका तो प्रसंग चट्कन घडतो. बरं त्यात अपघा’त होतो. पण तरीही यातील बाईकस्वार वाचतो. ही घटना ज्यांनी ज्यांनी बघितली असेल त्यांना ही या घटनेने चक्रावून सोडलं असेल. आपण नसेल बघितली तर या लेखाच्या खाली एकदा पहा. आपल्याला व्हिडियो बघायला मिळेल. एक मात्र खरं या दोन्ही घटनांनी ‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीचा प्रत्यय ही येतो हे नक्की. असो.
मंडळी हा होता आजचा लेख. नेहमीच नवीन विषयांवर आपण लिहीत असतो. आज या जुन्या घटना आठवल्या आणि त्याविषयी लिहावं अस वाटलं. त्यातूनच आजचा हा लेख लिहिला गेला आहे. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!
बघा व्हिडीओ :