काही मालिकेतील नायक नायिकेप्रमाणे, त्या मालिकेतील खलनायक किंवा खलनायिकासुद्धा गाजतात. नजीकच्या काळातलं खलनायक गाजल्याचं उत्तम उदाहरण म्हणजे भैय्यासाहेब हि व्यक्तिरेखा. किरण गायकवाड या गुणी अभिनेत्याने ती ‘लागिरं झालं जी’ या मालिकेतून निभावली होती. खलनायक असूनही लोकांच्या पसंतीस ती उतरली होती. या व्यक्तिरेखेचा ‘देअर यु आर’ हा डायलॉग तर खूपच प्रसिद्ध झाला होता. या व्यक्तिरेखेसाठी अनेक नामांकनं आणि पुरस्कारही त्याने पटकावले आहेत. हि मालिका झाल्यानंतर किरण पुन्हा एकदा खलनायक म्हणून ‘देवमाणूस’ या मालिकेतून आपल्या समोर आला आहे. सध्या ‘देव माणूस’ हि सीरिअल खूप गाजत आहे. आणि ह्या सीरिअल मधील किरणने निभावलेले डॉक्टर अजित कुमार देव हे पात्र खूपच चर्चेत आहे. अर्थात, खलनायक असला तरीही हि भूमिका वेगळी आहे हे निश्चित. प्रेक्षकांनाही त्याचे काम खूप आवडत आहे. दरम्यानच्या काळात त्याने टोटल हुबलाक नावाची विनोदी मालिकासुद्धा केली होती. मोनालिसा बागल सोबत तो या मालिकेत झळकला होता.
सध्या तो मालिकांमध्ये रमला असल्याचं चित्र असलं तरीही तो सुरुवातीला, शाळेत-कॉलेजमध्ये केवळ एक आवड म्हणून त्याने अभिनयाकडे पाहिलं. त्याचा एकंदर अभिनय बघून त्याच्या प्राध्यापकांनी त्याला या क्षेत्रात येण्याविषयी सुचवलं होतं. पण घरी आर्थिक हातभार लागावा या उद्देशाने शिक्षण झाल्यावर किरणने नोकरी धरली. पण काही कारणांमुळे ती नोकरी सुटली आणि किरण पुन्हा रंगमंचाकडे वळला तो कायमचा. दरम्यानच्या काळात अभिनयासोबत, कलादिग्दर्शक म्हणूनही त्याने काम केलं. अशाच एका कामानिमित्ताने त्याची ओळख झाली ती शिवानी बावकर हिच्याशी. शिवानीने काही काळाने ‘लागिरं..’साठी ऑडिशन दिली होतं. तिची निवडही झाली होती. तिने मालिकेचे लेखक तेजपाल यांना किरण याचं नाव सुचवलं होतं. किरण कडून फोटोज मागवून ते दाखवले होते. पण तेजपाल यांना त्यावेळी सदर व्यक्तिरेखेसाठी किरण योग्य वाटला नाही. पण काही काळाने निखील चव्हाण या आपल्या मित्राला भेटताना तेजपाल आणि किरण यांची गाठ पडली. यावेळेस किरणचे फोटोज पाहिल्याचं तेजपाल यांना आठवलं. किरणचं एकंदर व्यक्तिमत्व भैयासाहेब या मुख्य खलनायकासाठी उत्तम असेल असं तेजपाल यांना वाटलं. त्याच्या अभिनयाची एक विडीयो क्लिप त्यांनी मागवून घेतली आणि पुढे किरण याला भैय्यासाहेब हि व्यक्तिरेखा मिळाली.
हा किस्सा घडला, किरण सोबत इतर कलाकार निवडले गेले आणि पुढे काही वर्ष या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. यातील प्रत्येक व्यक्तिरेखा लोकांच्या आजही लक्षात आहेत. असा हा गुणी अभिनेता खलनायक रंगवत असला तरीही खऱ्या आयुष्यात खूप चांगला माणूस आहे. शिवानी बावकर, निखील चव्हाण आणि इतर कलाकारांसोबतची त्याची मैत्री त्याच्या सोशल मिडिया अकाउंटवर पहायला मिळते. तसेच अभिनयाबरोबर सामाजिक प्रश्नांची जाणीवही त्याला आहे. पाणी फौंडेशन आणि झी मराठी यांच्या सौजन्याने आयोजित तुफान आलंया या उपक्रमाअंतर्गत तो श्रमदान करताना दिसला होता. अभिनय करताना प्रयोगशील राहावं आणि नवनवीन माध्यमातून काम करावं असं त्याच्या बोलण्यातून जाणवतं. येत्या काळात वेबसिरीज सारखी माध्यमे आणि विविध भूमिकांतून अभिनय करावा असा त्याचा मानस आहे. तसं त्याने एका पत्रकार परिषदेदरम्यान बोलूनही दाखवलं होतं. अभिनयाची पार्श्वभूमी नसतानाही मेहनत, चिकाटी, नाविन्याची आवड यांमुळे आज त्याला लोकप्रियता मिळवता आली आहे. अशा या गुणी कलाकाराला येत्या काळात अनेक विविध भूमिका मिळोत आणि त्याचा यशाचा आलेख सदैव उंचावत राहो या मराठी गप्पाच्या टीम कडून शुभेच्छा !
(Author : Vighnesh Khale)