तेजस्विनी पंडित. नावाप्रमाणेच तेजस्वी आणि प्रसन्न व्यक्तिमत्व. एक उत्तम अभिनेत्री आणि उत्तम बिझनेस वूमन सुद्धा ! तेजस्विनीला आपण ओळखतो ते तिच्या मालिका, चित्रपट यातील अभिनयासाठी, कॉमेडीची बुलेट ट्रेन मधील सूत्रसंचालक म्हणून. तसेच, मराठी गप्पाच्या नियमित वाचकांना हे माहित असेल कि तिचा एक साड्यांचा एक प्रसिद्ध ब्रँड तिने तयार केला आहे. त्याचं नाव तेजाज्ञा. यात तिची व्यावसायिक भागीदार आहे, तिची जिवलग मैत्रीण आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री अभिज्ञा भावे. या सगळ्यांसोबत तिच्या व्यक्तिमत्वाचा एक खूप छान पैलू आहे. तो म्हणजे सामाजिक बांधिलकी जपण्याचा आणि सामाजिक विषयांवर वेळोवेळी भाष्य करण्याचा. हा पैलू दरवर्षीप्रमाणे, नवरात्रीच्या निमित्ताने, सगळ्यांसमोर येतोच आहे.
(फोटोशूट वर्ष २०१८)
तेजस्विनीने दर वर्षी, नवरात्रोत्सवात काही विषय केंद्रस्थानी ठेऊन त्यावर भाष्य करण्यास सुरुवात केली होती. २०१८ साली, तिने नवरात्रोत्सवात दर दिवशी, ज्या ज्या देवींची प्रामुख्याने पूजा होते त्यांच्या विषयी माहिती देण्याचा प्रयत्न केला होता. मागील वर्षी, म्हणजे २०१९ साली, तिने नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये विविध पर्यावरणविषयक मुद्यांना अधोरेखित केलं होतं. या वर्षी, तिने लॉकडाऊनच्या काळात आणि इतरवेळीही समाजाचा खऱ्या अर्थाने आधार स्तंभ असलेल्या को विड वॉरीयर्सना, आपल्या फोटोजच्या वतीने वंदन केलं आहे. याआधी आपण अनेक कलाकारांना एकत्र येऊन को विड वॉरीयर्सना पाठींबा देताना पाहिलं आहेच. पण तेजस्विनीची हि आभार मानण्याची पद्धत हि कलात्मक, वेगळी आहे हे नक्की. को विड वॉरीयर्समध्ये देवीचे रूप कसे असेल आणि दिसेल हा विचार या फोटोज तयार करण्यामागे दिसतो. सध्या कोलॅब हा अगदी परवलीचा शब्द झाला आहे. त्याचप्रमाणे या तिच्या सामाजिक बांधिलकी जपण्याच्या कामात तिने तरुण छायाचित्रकार, चित्रकार आणि लेखकाशी कोलॅब केलेलं दिसतं.
(फोटोशूट वर्ष २०१९)
तिने हे फोटोज, तिच्या सोशल मिडिया अकाउंटवर प्रसिद्ध केलेले आहेत. यात नवरात्रीच्या प्रतिपदेपासून दर दिवशी एक या प्रमाणे फोटोज शेअर केलेले आहेत. आज हा लेख लिहिताना, चतुर्थीच्या दिवसापर्यंत चार फोटोज शेअर केले गेले आहेत. यात प्रतिपदेला रुग्णाला डॉक्टरांच्या रुपात वाचवणारी देवी असं रूप दाखवण्यात आलंय. द्वितीयेला, लेडीज पोलीस ऑफिसर्सना त्यांच्या अविश्रांत कामासाठी सलाम करण्यात आलं आहे. यात देवीच्या रूपातील पोलीस ऑफिसर, एका वृद्ध महिलेला मदत करताना दिसत आहे. तर तृतीयेला, स्वतःचं आरोग्य धोक्यात घालून, परिसर स्वच्छ ठेवणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना वंदन केलेलं आहे. चतुर्थीला, शेतात ऊन पावसाची पर्वा न करता राबणाऱ्या, आपल्या सगळ्यांचं पोट भरणाऱ्या शेतकरी स्त्रीला सलाम केलेला आहे. नवरात्रीचे अजून पाच दिवस बाकी आहेत. त्यामुळे येत्या काळात, तेजस्विनी कडून कोणकोणते कलात्मक फोटोज शेअर केले जातील हा औत्सुक्याचा विषय ठरला आहे. तिच्या असंख्य चाहत्यांनी या उपक्रमाचं स्वागत केलेलं आहेच.
(फोटोशूट वर्ष – २०२०)
या तिच्या उपक्रमात वर उल्लेखल्या प्रमाणे तरुण कलाकरांचा सहभाग नेहमी असतो. यावर्षी ज्यांचा या उपक्रमात सहभाग आहे त्यांची नावे या निमित्ताने वाचकांसमोर येणं योग्य ठरावं. डिजाईन आणि छायांकन याची जबाबदारी उदय मोहिते यांनी सांभाळली आहे. ‘indian_illustrator’ या नावाने त्यांचं इंस्टाग्राम अकाउंट प्रसिद्ध आहे. विवियन पुलन याने छायाचित्रणाची जबाबदारी पार पाडली आहे. या फोटोज वर उत्तम अशा ओळी कॅप्शन मध्ये लिहिल्या गेलेल्या आहेत. त्याचं श्रेय जातं ते, रेडियो जॉकी आदिश गबाले याला. तो नाशिकच्या रेडियो सिटी वर आर.जे. म्हणून काम करतो. धैर्य या उभरत्या अभिनेता आणि दिग्दर्शकाने या फोटोजची संकल्पना पुढे आणली आणि दिग्दर्शनहि केलेलं आहे. धैर्यला आपण तान्हाजी आणि मुंबई सागा या कलाकृतींतून पाहिलेलं आहेच.
(फोटोशूट वर्ष – २०२०)
गेले कित्येक महिने, क रोनामुळे लॉकडाऊन चालू आहे. या काळात, को विड वॉरीयर्सनी स्वतःच्या घराकडे अक्षरशः पाठ करून काम केलं आहे. दुर्दैवाने यात अनेकांचे प्राणही गेले आहेत. पण त्यांचा लढा चालूच आहे. या लढ्याला तेजस्विनीने आपल्या परीने सलाम करण्याचा प्रयत्न केला आहे. तिच्या या उपक्रमाची आणि संपूर्ण टीमची या निमित्ताने दाद द्यावीशी वाटते. तेजस्विनी आणि या तरुण कलाकारांच्या टीमला मराठी गप्पाच्या टीमचा मानाचा मुजरा !
(Author : Vighnesh Khale)