प्रत्येक कलाकाराला असं वाटत असतं, कि आपल्या पदार्पणापासूनच आपल्याला यश मिळावं. लोकांनी आपल्या कामासाठी आपल्याला ओळखावं. पण प्रत्येक वेळेस हे शक्य होत नाही. पण काही वेळेस मात्र ते शक्य होतं. कलाकार पहिल्या फटक्यातच घराघरात पोहोचतात. त्याच्या मेहनतीचं कौतुक होतं. आज आपण अशाच एका नवोदित पण लोकप्रिय अशा अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत. जिने पदार्पणातच सगळ्यांना याड लावलं आणि आपली घोडदौड सुरु ठेवली आहे.
प्रेरणा महादेव राजगुरू. डोक्यात थोडी घंटी वाजली का? कळलं नसेल तर इंग्लिश मधे सांगू का ? आता कळलं ना? हो. प्रेरणा राजगुरू म्हणजे आपल्याला माहिती असलेली रिंकू राजगुरू. सैराटने वेड लावलेल्या तरुणाईची लाडकी अभिनेत्री. तिचा जन्म झाला अकलूज मध्ये २००१ साली. तिने जिजामाता कन्या प्रशाला ह्या शाळेतून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. रिंकू नववीत शिकत असताना वयाच्या १४ व्या वर्षी शाळा चालू असतानाच तिची भेट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या सोबत झाली.
कोणताही कलाकार एखाद्या भूमिकेत चपखल दिसला पाहिजे असं मानणाऱ्या नागराज यांनी रिंकूला ‘सैराट’ साठी ऑडीशन द्यायला सांगितलं. आणि पुढे जो इतिहास घडला तो आपण सगळ्यांनी पहिलाच आहे. बिनधास्त, जे मनात ते ओठावर अशी धडाकेबाज आर्ची तीने उत्तम साकारली. एवढी, कि प्रत्येक मुलाला, आपल्याला पण एक आर्ची आयुष्यात पाहिजे असं वाटून गेलं. तिच्या या दमदार अभिनयामुळे केवळ तिला कौतुकच मिळालं असं नाही तर काम सुद्धा मिळालं. तेही “सैराट” च्या कन्नड रिमेक मधे. मानसु मल्लिगे असं या रीमेकचं नाव. सैराट प्रमाणे तो सुद्धा लोकप्रिय झाला.
दरम्यानच्या काळात तिला ६३ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावेळी विशेष पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. तिचा गौरव त्या वेळेचे राष्ट्रपती आणि ज्याचं नुकतंच निधन झालेले कै. प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते झाला. तिने आपलं शालेय शिक्षण या कामाच्या रहाटगाडग्यात पूर्ण केलं. तिने तिथेही आपण सर्वोत्तम आहोत हे दाखवून दिलं. तिच्या १० वीच्या रीजल्टची चर्चा महाराष्ट्रात झाली होती.
मग आला तिचा नवीन सिनेमा कागर. ग्रामीण महाराष्ट्रातील राजकारणाभोवती तो लिहिला गेला होता. तिच्या अभिनयाचं कौतुक झालं. नुकतीच तिची एक वेबसिरीज सुद्धा प्रसिद्ध झाली. लारा दत्ता यांच्यासारख्या नामवंत अभिनेत्री बरोबर काम करण्याची संधी तिला मिळाली. आणि तिनेही याचं सोनं केलं. समीक्षकांनीही तिच्या व्यक्तिरेखेचं कौतुक केलं.
‘मेकअप’चित्रपटांत सुद्धा तिने आपल्या अभिनयाचे छाप सोडली. सध्या तीचा ‘झुंड’ हा हिंदी चित्रपट बनत आहे. ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन सैराट फेम नागराज मंजुळे करत असून आकाश ठोसर हा तिचा सहकलाकार म्हणून काम करणार आहे. प्रसिद्धी मिळाली, यश मिळालं म्हणून रिंकूने काम, मेहनत घेणं सोडलेलं नाहीये. आणि सतत यश मिळण्यासाठी हेच महत्वाचं असतं.
आणि याच बरोबर महत्वाचं असतं ते आयुष्य जगणं सुद्धा. अन्यथा कामाच्या ओझाखाली आपण दबून जातो. पण रिंकूने मात्र योग्य ताळमेळ घातला आहे. तिचं सोशल मिडिया अकाऊंट बघितलं तर कळून येतं. तिला नवनवीन कपडे घालायला आवडतात. त्याचे फोटोज तर ती शेयर करते. तिच्या जवळ एक मांजर आहे तिच्याशी खेळायला आवडतं. आणि वाचन करायला सुद्धा आवडतं. नुकतंच तिने एक फोटो अपलोड केलाय ज्यात तिच्या हातात सुप्रसिद्ध अभिनेत्री कै. स्मिता पाटील यांच आत्मचरित्र आहे. सेटवर सुद्धा ती धमाल करतेच. मग ती सीन्सदरम्यान मस्करी असो व सीन्सनंतर सेट वर क्रिकेट खेळणं.
एकूणच काय, तर रिंकू एखाद्या कसलेल्या कलाकारांप्रमाणे स्वतःला काम करता करता सांभाळते आहे. स्वतःच करियर पण जिद्दीने पुढे घेऊन जाते आहे. मराठी, हिंदी, कन्नड अशा विविध भाषांमध्ये काम करता करता सिनेमा ते वेबसिरीज हा पल्ला तिने गाठलाय. येणाऱ्या काळात हि मराठमोळी अभिनेत्री मनोरंजनक्षेत्र आपल्या अदाकारीने गाजवणार यात शंकाच नाही. आणि तिच्या या वाटचालीसाठी तिला आपल्या मराठी गप्पा कडून खूप खूप शुभेच्छा !
(Author : Vighnesh Khale)