आपण मराठी गप्पावर उपलब्ध असलेले कलाकारांविषयी अनेक लेख मोठ्या संख्येने वाचता. आपल्या प्रतिसादामुळे नवोदित आणि उत्तम कलाकारांविषयी लेख लिहिण्याचा उत्साह वाढतो. आज अशाच एका उभरत्या नृत्यांगना आणि अभिनेत्रीविषयी आपण वाचणार आहात. हि कलाकार अस्सल सातारकर. बालपण, शिक्षण साताऱ्यात झालं. तिने लहान वयापासून नृत्याची आवड जोपासत पुढे उत्कृष्ठ नृत्यांगना म्हणून नाव कमावलेलं आहेच. सध्या तिने एका गाजलेल्या मालिकेतून मुख्य खलनायिकेच्या भूमिकेतून मालिका विश्वात पदार्पण केलेलं आहे. तुझ्यात जीव रंगला हि ती मालिका आणि माधुरी पवार हे या मालिकेत नव्याने दाखल झालेल्या अभिनेत्रीच नाव. या तिच्या नवीन भूमिकेनिमित्त तिच्या कला प्रवासाचा आढावा घेण्याचा मराठी गप्पाचा हा प्रयत्न.
माधुरी हि मुळची साताऱ्याची. साताऱ्याच्या मातीतील गोडवा आणि बिनधास्तपणा तिच्या स्वभावात दिसून येतो. तिने तिच्या मुलाखतींमधून नमूद केल्या प्रमाणे तिच्या वडिलांकडून तिला नृत्याची प्रेरणा मिळाली. आयुष्यात फार लवकर तिने आवड म्हणून नृत्य करायला सुरुवात केली. पुढे मोठं झाल्यावर तिने सांस्कृतिक कार्यक्रमातून भाग घेण्यास सुरुवात केली. याच कलेने तिच्या शिक्षणासाठी तिला मदत केली. घरची आर्थिक परिस्थिती बेताची. त्यामुळे एम.बी.ए. च्या उच्च शिक्षणासाठी पैसे जमा करताना या नृत्यकलेने व खासकरून लावणी या आपल्या लाडक्या लोककला प्रकाराने तिला साथ दिली. अनेक महोत्सव, सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेता घेता तिने टी.वी.वरील रियालिटी शोजसाठी ऑडिशन्स देणंही सुरु केलं होतं. बरेच प्रयत्न केले पण यश काही पहिल्या फटक्यात मिळालं, असं झालं नाही. पण स्वभावात जिद्द असलेल्या माधुरीने हार मानली नाही. म्हणतात न जे होतं ते चांगल्यासाठी. त्याप्रमाणे तिला एक कार्यक्रम करण्याची सुवर्णसंधी मिळाली.
या कार्यक्रमात लावणीसम्राज्ञी सुरेखाजी पुणेकर, उत्तम अभिनेत्री आणि नृत्यांगना दिपाली सय्यद, आघाडीची अभिनेत्री आणि नृत्यांगना सोनाली कुलकर्णी यांच्या देखेरेखेखाली आपली कला सादर करता आली. या सगळ्यांनी तिचं नेहमीच कौतुक तर केलंच, सोबत येणाऱ्या पाहुण्या कलाकारांनीहि तिचं सातत्याने कौतुक केलं. एवढंच नव्हे तर आपल्या नृत्यकौशल्याच्या जोरावर तिने या कार्यक्रमाचं विजेतेपद मिळवलं. या कार्यक्रमाचं नाव, ‘अप्सरा आली’. तिच्या या दैदिप्यमान यशाने सगळ्यांना आनंद झाला. तिच्या कारकीर्दीचं वैशिष्ठ्य असं कि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना तिचं कौतुक आहे. तिच्या सोशल मिडियापोस्ट बघितल्यास अनेक शाळांमधूनहि तिच्या यशासाठी तिचा सत्कार झालेला दिसतो. ‘अप्सरा आली’चं घवघवीत यश संपादन केलं म्हणून माधुरी थांबली असं झालं नाही. ती नृत्य करताना ज्या गतीने रंगमंचावर वावरते त्याच गतीने तिने आपली घोडदौड सुरु ठेवली. सांस्कृतिक कार्यक्रमातून नृत्य सादर करणं होतंच. सोबत तिने एक वेब सिनेमा केला. ‘गागर’ हे या सिनेमाचं नाव. सोबतच तिने काही गाण्यांच्या माध्यमांतून आपला अभिनय आणि नृत्यकला दोन्ही सादर केले आहेत.
नुकतचं तिचं एक गाणं प्रसिद्ध झालं. ते म्हणजे ‘पावसाळी या ढगांनी’. सुमित म्युझिक या प्रतिष्ठित कंपनीने हे गीत सादर केलेलं असून, यात महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक अजय गोगावले यांनी गायन केलेलं आहे. तसेच ‘सर्वेश्वरा मोरेश्वरा’ या गणपती बाप्पाच्या स्तुतीपर गीतातही तिचा सहभाग होता. या सगळ्यांसोबत तिचं स्वतःचं असं एक युट्युब चॅनेल आहे. या चॅनेलच्या माध्यमांतून तिच्या प्रसिद्धीची आपल्याला कल्पना यावी. तिच्या नृत्याच्या विडीयोजना लाखोंनी व्युज मिळालेले आहेत. अशी हि लोकप्रिय असलेली अभिनेत्री, पण तिला या प्रसिद्धीचा गर्व नाही. तिच्या वागण्यात साधेपणा उठून दिसतो. तिच्या चाहत्यांशी संवाद साधताना जणू काही आपण तिला ओळखतो असं वाटत राहतं. पण या वागण्यात मोकळेपणा असला, तरीही एक शिस्त असते हे नक्की. अशी हि गुणी कलाकार मोकळ्या वेळेत उत्तम जेवणहि बनवते. तसेच ती सामाजिक विषयांवरील कार्यातही भाग घेते. पाणी फौंडेशनच्या उपक्रमात तिने भाग घेतला होता. तेथील लोकांचं काम बघून तिलाही राहवेना तेव्हा तिने चटकन तिथल्या श्रमदानात योगदान दिलं.
अशी हि संवेदनशील अभिनेत्री सध्या ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेत नुकतीच ती दाखल झाली आहे. पण अगदी कमी काळात या मालिका माध्यमातून आणि नंदिता वाहिनी या भूमिकेतून ती रसिकांचं मन जिंकून घेईल हे नक्की. येत्या काळात तिचा बहुप्रतीक्षित फांजर हा सिनेमा प्रदर्शित होण्याचीही चिन्ह आहेत. आज पर्यंत तिने आपल्या नृत्याने, अभिनयाने प्रेक्षकांना मनमुराद आनंद दिला आहे. तिचे सध्याचे प्रोजेक्ट्स आणि येत्या काळातील कलाकृतीही अशाच आनंददायी ठरतील हे नक्की. तिच्या पुढील वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टीमकडून खुप खूप शुभेच्छा !
(Author : Vighnesh Khale)