Breaking News
Home / मराठी तडका / निवेदिता आणि अशोक सराफ ह्यांच्यात १८ वर्षांचे अंतर असूनदेखील अश्याप्रकारे झाले होते प्रेम

निवेदिता आणि अशोक सराफ ह्यांच्यात १८ वर्षांचे अंतर असूनदेखील अश्याप्रकारे झाले होते प्रेम

चित्रपटांत सेलेब्रेटींची प्रेमकहाणी पाहून प्रत्येकाच्या मनात हा विचार तर नक्कीच आला असेल, कि पडद्यावर प्रेम कहाणी दाखवणाऱ्या ह्या कलाकारांना खऱ्या आयुष्यात कश्याप्रकारे प्रेम होत असेल, आपल्याला सुद्धा त्यांच्या खऱ्या आयुष्यातील प्रेमकहाणी जाणून घेण्याबद्दल उत्सुकता लागून राहिलेली असते. आणि त्यातला त्यात आपल्या आवडत्या कलाकाराची प्रेम कहाणी म्हटलं कि एक पर्वणीच. तर आजच्या लेखात आपण अश्याच एका अभिनेत्याच्या प्रेमकहाणी बद्दल जाणून घेणार आहोत, जो महाराष्ट्रातील तमाम रसिकांच्या मनात आहे. ज्याने आपल्या चतुरस्त्र अभिनयाने सर्व चाहत्यांचे मन जिंकले. होय आम्ही तुम्हांला मराठी चित्रपटसृष्टीतले सर्वांचे लाडके कलाकार अशोक मामा ह्यांच्या प्रेमकहाणीबद्दल सांगणार आहोत. अशोक सराफ ह्यांचे लग्न सुप्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता जोशी ह्यांच्या सोबत झाले. दोघांची प्रेमकहाणी खूपच रंजक आहे. दोघांमध्ये तब्बल १८ वर्षांचे अंतर असूनदेखील त्यांची नाळ कसं काय जुळली, हे आपण आजच्या लेखात जाणून घेणार आहोत.

मूळचे बेळगावचे असणाऱ्या अशोक सराफ ह्यांचा जन्म ४ जून १९४७ रोजी मुंबईत झाला. दक्षिण मुंबईतील चिखलवाडी या भागात त्यांचे बालपण गेले. मुंबईतील डी.जी.टी. विद्यालयातून त्यांनी आपले माविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. तर निवेदिता जोशी ह्यांचा जन्म ६ जून १९६५ ला झाला. प्रेमाला वयाचे बंधन नसते असे म्हणतात. अगदी हीच गोष्ट दोघांनाही खरी ठरली. प्रेम करताना रंग रूप, वय वैगेरे काही दिसत नाही. ह्या गोष्टीचे भान नसतेच म्हणा ना. त्यावेळी फक्त समोरच्याचे मन आणि त्याच्या मनात असणारी आपल्याबद्दलची काळजी ह्याच गोष्टी सर्वात जास्त परिणाम करतात. अगदी असंच झाले ह्या दोन कलाकारांमध्ये. ह्या दोन्ही जोडप्यात तब्बल १८ वर्षांचा फरक आहे. दोघांची ‘डार्लिंग डार्लिंग’ ह्या नाटकावेळी पहिली भेट झाली होती. निवेदिताच्या वडिलांनी अशोक सराफ ह्यांच्याशी ओळख करून देताना एका छोट्या मुलीशी हि माझी मुलगी अशी ओळख करून दिली होती. १९७१ साली अशोक सराफ यांचा ‘दोन्ही घरचा पाहुणा’ हा सिनेमा रिलीज झाला होता. त्यावेळी त्यांचे वय २४ वर्षे होते. तर निवेदिता सराफ १९७१ साली केवळ सहा वर्षांच्या होत्या. त्यानंतरच्या काही काळात अशोक सराफ ह्यांचे चित्रपट करियर चांगले चालू होते. निवेदिता जोशी सुद्धा चित्रपटांत अभिनेत्रीची भूमिका निभावत होत्या. ‘नवरी मिळे नवऱ्याला’ ह्या चित्रपटांत अशोक सराफ आणि निवेदिता जोशी हे दोघेही कलाकार होते. त्या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान त्यांचे एकमेकांशी कधीच बोलणे झाले नाही. हा चित्रपट लोकांना खूप आवडला. आणि ह्या चित्रपटापासूनच ह्या दोघांच्या प्रेमकहाणीला सुरुवात झाली. त्यानंतर ‘तू सौभाग्यवती हो’ ह्या चित्रपटात देखील हे दोन्ही कलाकार होते. परंतु तेव्हा सुद्धा त्यांच्यात जास्त संभाषण होत नव्हते. परंतु ‘धुमधडाका’ हा चित्रपट दोघांमधील खरे प्रेम होण्यास कारणीभूत ठरला.

‘धुमधडाका’ चित्रपटावेळी दोघेही एकमेकांशी बोलू लागले. त्यानंतर दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. आणि काही काळानंतर ह्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. असं म्हणतात कि प्रत्येक प्रेमप्रकरणात कोणता ना कोणता ट्विस्ट असतोच. अगदी तसाच ट्विस्ट ह्यांच्या प्रेमकहाणीतसुद्धा आला. निवेदिता जोशींच्या आईची इच्छा होती कि, तिने चित्रपटसृष्टीत काम करण्याऱ्या कलाकारांसोबत लग्न करू नये. परंतु निवेदिता जोशींचा स्वभाव एकदम ठाम असा होता, म्हणजे जे ठरवले ते करणारच. तिने सुद्धा घरच्यांना सांगितले कि, लग्न करणार तर अशोक सराफ ह्यांच्या सोबतच. शेवटी तिची हि गोष्ट घरच्यांना सुद्धा मान्य करावी लागली. तर दुसरीकडे अशोक सराफ ह्यांच्या घरचे सर्व कारभार त्यांचे मोठे भाऊ पाहत होते. अशोक सराफ ह्यांनी आपल्या प्रेमाची कल्पना त्यांच्या भाऊ आणि वहिनींना दिली तेव्हा दोघांनीही त्याला दुजोरा दिला. अगदी घरातील नातेवाईक, खास मित्रमंडळी आणि काही मोजकेच लोकं ह्यांच्या उपस्थित दोघांचाही विवाह गोव्यातील मंगेशी देवीच्या मंदिरात घरगुती पद्धतीने झाला. दोघांच्याही लग्नानंतर अशोक सराफ ह्यांचे चित्रपट खूपच सुपरहिट होऊ लागले होते. अशोक सराफ हे मराठीतील सुपरस्टार बनले होते. मराठी चित्रपट सृष्टीत त्यांनी त्यानंतर अनेक सुपरहिट चित्रपट दिले. परंतु लग्नानंतर निवेदिता जोशी ह्यांनी चित्रपटातून ब्रेक घेऊन संसाराकडे लक्ष दिले. मुलाचे संगोपन आणि संसाराची जबाबदारी ह्यामुळे निवेदिता १३ वर्षे अभिनयापासून दूर राहिल्या. निवेदिताने संसाराची जबाबदारी समर्थपणे पेलल्यामुळेच मी करिअरमध्ये पुढे जाऊ शकलो, असे अशोक सराफ ह्यांनी एका मुलाखतीत सांगितले.

ह्या दोघांनीही ‘मामला पोरीचा’, ‘धुम धडाका’, ‘नवरी मिळे नव-याला’, ‘बाळाचे बाप ब्रह्मचारी’, ‘तुझी माझी जमली जोडी’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘फेका फेकी’, ‘माझा छकुला’ ह्यासारख्या अनेक चित्रपटात काम केले. ह्या दोघांच्याही लग्नाला आता जवळजवळ ३२ वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालेला आहे. असं म्हणतात कि चित्रपट कलाकारांच्या जोड्या टिकणे म्हणजे खूपच कठीण गोष्ट असते. परंतु हि जोडी मात्र त्याला अपवाद ठरली. मराठी चित्रपटसृष्टीतली एक आदर्श जोडी म्हणून ह्या जोडीकडे पाहिले जाते. आणि हि जोडी तितकीच लोकप्रिय सुद्धा ठरली. मग ते चित्रपटांत असू दे किंवा मग खऱ्या आयुष्यात. दोघांनाही अनिकेत नावाचा मुलगा आहे. अनिकेत हा प्रसिद्ध शेफ असून युट्युबवर त्याचे स्वतःचे चॅनेल सुद्धा आहे. ह्या चॅनेलवर तो त्याच्या जेवणाचे खास व्हिडीओ शेअर करत असतो. अशोक सराफ हे आता चित्रपटांत काम करत असले तरी खूपच कमी दिसून येत आहेत. तर दुसरीकडे निवेदिता जोशी ह्या ‘अग्गबाई सासूबाई’ ह्या मालिकेत मुख्य भूमिका साकारत असून हि मालिका प्रेक्षकांना खूपच आवडत आहे. ह्या मालिकेत त्या आसावरी नावाच्या महिलेची भूमिका साकारत असून हि भूमिका खूपच लोकप्रिय होत आहे. तर अश्या ह्या गुणी कुटुंबाला आयुष्याच्या पुढील वाटचालीसाठी मराठी गप्पा कडून खूप खूप शुभेच्छा.

About IrK0sFrKWQ

One comment

  1. Adhok Saraf is my favorate marathi actor and Hero , I like Ashok Saraf’s every seen and comedy.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *