सध्या न्यू नॉर्मल म्हणत म्हणत अनेक गोष्टींची काळजी घेत आपलं जनजीवन सुरू झालं आहे. सगळं १००% जनजीवन सुरळीत झालेलं नसलं तरीही अनेक गोष्टी आपल्या आजूबाजूस चालू होत आहेत. अगदी मनोरंजन क्षेत्रातही नाटकांच्या प्रयोगांना झालेली सुरुवात हे त्यातलं एक प्रातिनिधिक उदाहरण. अजून एक उदाहरण म्हणजे अनेक ग्रामपंचायतींच्या झालेल्या निवडणुका. विविध ठिकाणी झालेल्या या निवडणुकांचे निकाल नुकतेच प्रसिद्ध झाले आणि अनेक चुरशीच्या लढतींमधून विजयी उमेदवार समोर आले. या निवडणुकांना अनेक बाबींचे कंगोरे होते त्यामुळे या निवडणुकांची हवा होती. या निवडणुकांचे निकाल लागले आणि अनेकांनी जल्लोष केला. यात एका उमेदवाराच्या पत्नीने केलेला जल्लोष हा सध्या कौतुकाचा आणि चर्चेचा विषय बनला आहे.
पुण्यातील खेड तालुक्यातील पाळू गावातही निवडणूका होत्या. या गावातील अनेक उमेद्वारांमधील एक उमेदवार म्हणजे संतोष गुरव. गावच्या विकासासाठी काम करण्याची त्यांची इच्छा. ही इच्छा पूर्ण करण्याचा मार्ग त्यांना ग्रामपंचायतीतून दिसला. अर्ज भरला, निवडणूक लढवली आणि जिंकूनही आले की. निकाल ऐकला आणि त्यांनी आपल्या पत्नीला हा निकाल कळवला. तेवढ्यात अकस्मात एक गोष्ट घडली की संतोष यांनाही क्षणभर काय चाललं आहे, हे कळेना. त्यांना त्यांच्या पत्नीनं म्हणजे रेणुका गुरव यांनी खांद्यावर उचलून घेतलं होतं. बायको नवऱ्याला उचलून घेतेय हे चित्र कदाचित पहिल्यांदाच पाहिलं असेल सगळ्यांनी. टीव्ही कार्यक्रमांतून कौतुक म्हणून बायकोला उचलून घेणारे नवरे बघायची सवय आपल्याला. संतोष यांचंही तसंच काहीसं झालं असावं. पण आपल्या पत्नीने आपल्या आनंदात सहभाग घेतलेला पाहून तेही हरखून गेले. बरं रेणुका वहिनींनी त्यांना केवळ उचलून घेतलं आणि ठेऊन दिलं असं झालं नाही. त्यांनी काही काळ पतीराजांना खांद्यावर उचलून घेत गावातून एक फेरी मारली.
नवरा जिंकला म्हणून एवढ्या उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया देणाऱ्या रेणुका वहिनींचं कौतुक झालं नसतं तरच नवल. त्यात हा सोशल मीडियाचा काळ. त्यामूळे या जोडीचे रेणुका वहिनींनी संतोष दादांना खांद्यावर घेतल्याचा व्हिडिओ आणि फोटोज वायरल झाले. म्हणता म्हणता सगळ्या बाजुंनी या जोडीचं कौतुक झालं. बरं यात ठरवलेलं किंवा मुद्दामहून केलेलं, असं काही नव्हतं. त्यामुळे सामान्य जनांच्याही ते प्रशंसेस कारणीभूत ठरलं. यात मराठी गप्पाची टीमही मनापासून सामील आहे. या जोडी मधलं प्रेम असंच अबाधित राहो ही सदिच्छा. आम्ही तो व्हिडीओ खाली देत आहोत नक्की पाहून घ्या. तसेच येत्या काळातील त्यांच्या वैयक्तिक आणि राजकीय वाटचालीसाठी ही मराठी गप्पाच्या टिमकडून मनःपूर्वक शुभेच्छा !
बघा व्हिडीओ :