Breaking News
Home / मराठी तडका / पावनखिंड चित्रपटात बाजीप्रभूंची भूमिका साकारणारे अभिनेते नक्की आहेत तरी कोण, बघा जीवनकहाणी

पावनखिंड चित्रपटात बाजीप्रभूंची भूमिका साकारणारे अभिनेते नक्की आहेत तरी कोण, बघा जीवनकहाणी

चित्रपटगृह पुन्हा खुली झाल्यापासून अनेक बहुप्रतिक्षित चित्रपट आपल्या भेटीला आले. त्यातही मराठी चित्रपटांनी तर या काळात मुसंडीच मारली आहे असं म्हणायला हवं. अगदी नजीकच्या काळातले झोंबिवली, पांघरूण, त्याआधीचा झिम्मा ही याची काही प्रातिनिधिक उदाहरणं होत. पण अस असलं तरी ही घोडदौड थांबलेली नाही. किंबहुना, यात आता एका अशा चित्रपटाची भर पडली आहे ज्याची आपण बराच काळ वाट बघत होतो. ‘शिवराज अष्टक’ साकारण्याचा पण घेतलेल्या दिग्पाल लांजेकर आणि टीमच हे तिसरं चित्रपुष्प !

होय, पावनखिंड हा तो चित्रपट ! प्रदर्शित होण्याआधी दाखल झालेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरने जो काही धमाका केला होता त्यास तोड नाही. कित्येक दशलक्षांच्या घरात व्ह्यूज मिळालेल्या या ट्रेलरने एक नवीन इतिहास रचला आणि आता तर हा चित्रपट खुद्द दाखल झाला आहे. सगळ्यांकडून कौतुकाची थाप मिळवतो आहे. विविध ठिकाणी मिळणाऱ्या रेटिंग्ज, प्रेक्षकांच्या सोशल मीडियावरील कौतुकाच्या पोस्ट्स, चित्रपटगृहाच्या बाहेरील रांगा याची साक्ष देतात. या सगळ्या यशाचं श्रेय दिग्पाल आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं आहे यात काही शंका नाही. पण त्यातही एक नाव मात्र अगदी अग्रक्रमाने पुढे आलेलं दिसतं. अजय पूरकर हे ते नाव होय.

बाजीप्रभू देशपांडे यांची ऐतिहासिक आणि या चित्रपटातील केंद्रस्थानी असलेली व्यक्तिरेखा साकार करणारे अभिनेते म्हणजे अजय पूरकर होय. अर्थात हे नाव काही आपल्याला नवीन नाहीये. कारण गेली दीड ते दोन दशके ते सतत आपलं मनोरंजन करत आले आहेत. कधी नायक म्हणून, कधी खलनायक म्हणून तर कधी एक गायक म्हणून त्यांनी आपली कारकीर्द उभी केली आहे. त्यांच्यातील अभिनय आणि गायन या कलांचा मिलाप आपल्याला अनेक कलाकृतींतूनही दिसून आला. नांदी हे त्यातील एक महत्वाचं नाव होय. कलाकारांची मांदियाळी असलेल्या या नाटकात अजय यांनी आपल्या दोन्ही कलांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आणि कौतुक मिळवलं होतं. त्यांची मुख्य भूमिका असलेलं कोड मंत्र हे नाटक ही प्रेक्षकपसंतीस उतरलं. एकाच वर्षात तब्बल २४ पुरस्कार या नाटकाने मिळवले होते. अनेक दिग्गजांनी या नाटकाचे कौतुक केलं होतं. बरं, अजय जी यांनी नाटकांसोबतच मालिका आणि अर्थातच चित्रपट क्षेत्रात ही जबरदस्त व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. मालिका क्षेत्रातील त्यांचा हा प्रवास सुरु झाला तो असंभव या मालिकेतून आणि पूढे मराठी सोबतच त्यांनी अनेक हिंदी मालिकांमध्ये ही काम केलं. यात ऐतिहासिक मालिकांचा ही समावेश होताच.

त्याचप्रमाणे चित्रपटांमधून ही मुशाफिरी सुरू होतीच. बालगंधर्व, प्रेमाची गोष्ट, कदाचित, फेरारी की सवारी, रिस्पेक्ट, फर्जंद, फत्तेशिकस्त आणि आताचा, ‘पावनखिंड’ ही यातील काही प्रातिनिधिक नावं घेता येतील. अर्थात येत्या काळात यात अजून लोकप्रिय कलाकृतींची नावं येतीलच यात शंका नाही. वर उल्लेख केल्याप्रमाणे अजय जी हे उत्तम अभिनेते आणि गायक आहेत. कलाकारांच्या मांदियाळीने नटलेल्या सा रे ग म प या रियालिटी शोमधून त्यांचा हा सांगितिक प्रवास आपण सगळ्यांनीच अनुभवला आहे. या त्यांच्या संपूर्ण प्रवासात त्यांना त्यांच्या आईंची साथ अगदी ठामपणे लाभली. अगदी लहानपणापासून त्या माउलीने अजय यांच्यावर छत्रपती शिवरायांचे विचार बिंबवले. सोबतच कलेचे संस्कार ही होतेच आणि प्रोत्साहन ही होतं. मागील वर्षी त्यांचं दुःखद निधन झालं. त्यावेळी अजय यांनी, ‘फिनिक्स’ असं या माऊलीचं वर्णन केलं होतं. या माऊलीच्या आयुष्यात संघर्ष अमाप होता पण त्यांची जिद्द ही त्या संघर्षाला पुरून उरेल अशीच होती. हीच लढाऊ वृत्ती या माउलीने अजय यांना बहाल केली आहे हे मात्र नक्की. आज या लेखाच्या निमित्ताने अजय पूरकर यांच्या कारकिर्दीचा आढावा घ्यावा हा विचार चालू असताना माहिती घेणं ही चालू होतं. त्यावेळी ते पेशाने वकील आहेत हे कळलं. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वाची ही एक नवीन बाजू लक्षात आली.

तसेच त्यांनी दिलेल्या विविध मुलाखतींतून बाजीप्रभू देशपांडे यांची व्यक्तिरेखा साकारणं हे त्यांचं स्वप्न होतं हे कळलं. गेल्या दीड ते दोन वर्षांत ते हे स्वप्न जगले आहेत हे नक्की आणि आज या चित्रपटाच्या प्रदर्शनाने हे स्वप्न पूर्णत्वास गेलं आहे. या काळात त्यांनी केलेली अपार मेहनत आज फळास येते आहे. त्यांची आधीच लोकप्रिय ठरलेली कारकीर्द या चित्रपटामुळे एका नवीन उंचीवर जाऊन पोहोचली आहे हे नक्की ! या लेखाच्या निमित्ताने अजय पूरकर यांना त्यांच्या कलाक्षेत्रातील योगदानासाठी मानाचा मुजरा आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !!!

आजच्या या लेखातून अजय पूरकर यांच्या कारकीर्दीचा आढावा घेण्याचा प्रयत्न आपल्या टीमने केला आहे. आपल्या टीमचा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *