पेट्रोलच्या किमती हा नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतो. सध्या पेट्रोलच्या किंमती खूप वाढत आहेत. काही दिवसांअगोदरच पेट्रोलच्या किमतींनी शंभरचा आकडा पार केला आहे. पेट्रोलच्या वाढत्या किंमतीमुळे सोशल मीडियावरदेखील लोकांनी ह्याबद्दल आपले मत व्यक्त केले. अनेकांनी पेट्रोल महाग झाल्यामुळे टीका केल्या, त्याचसोबत अनेकांनी आता पेट्रोल आपल्या खिश्याला परवडेनासे झाल्याची, खंतही बोलून दाखवली. जो तो आपापल्या परीने व्यक्त होत असतो. प्रत्येकाची व्यक्त होण्याची पद्धतसुद्धा वेगळी असते. म्हणतात ना व्यक्ती तश्या प्रवूत्ती. अगदी तसंच ज्याला जसं वाटेल तसा व्यक्त होत असतो. सोशल मीडियावर टीका करण्यापर्यंत तर ठीक आहे हो. पण एकाने ह्या गोष्टीचा राग म्हणून मर्यादाच ओलांडली. त्याने चक्क पेट्रोल पंपालाच आग लावली आणि तिथून पळ काढला.
सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप वायरल होत आहे. हा व्हिडीओ हरियाणा येथील असल्याचे बोलले जात आहे. घडलं असं कि, संपूर्ण चेहरा झाकलेला एक बाईकस्वार पेट्रोल पंपावर आला. आल्या आली त्याने बाइकवरूनच पंपावरील प्राईज मीटर इंडिकेटरकडे पाहिले. मग प्राईज मीटर इंडिकेटरच्या बाजूला असलेली काही बटणं दाबली. आणि काही कळायच्या आतच त्या बाइकस्वाराने त्या पंपावर पेट्रोल ओतायला सुरुवात केली. एव्हाना हे सगळं पाहून पेट्रोल पंपावरील एक कर्मचारी ताबडतोब तेथे आला. आणि त्या बाइकस्वाराला रोखू लागला. परंतु बाइकस्वाराने त्या पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याच्या अंगावर देखील पेट्रोल ओतले. आणि त्याला आपल्या पासून लांब जा, नाहीतर तुझी सुद्धा खैर नाही असे जणू इशाऱ्याने सांगितले. त्यानंतर बाईकस्वाराने काही सेकंदासाठी बाईकवरून उठून पेट्रोलचा पंप बाजूला ठेवला. आणि पुन्हा बाईकवर बसून त्या पंपावर आग लावून ताबडतोब तिथून पसार झाला. पेट्रोलपंपाला आग लावणे हाच त्याचा उद्धेश होता.
हा बाईकस्वार गेल्यानंतर काही सेकंदातच पेट्रोलपंपाला आग लागली. काही क्षण तर हि आग वाढू लागेपर्यंत जवळपास कोणीच दिसत नव्हते. ह्या आगीचे भयानक दुर्घटनेत रूपांतर होते कि काय अशी भीती वाटत असतानाच पेट्रोल पंपावरील कर्मचारी अग्निरोधक (fire extinguisher) मारू लागतो. आगीची व्याप्ती कमी होऊ लागते, परंतु त्यानंतर कर्मचारी जो अग्निरोधक बाटला असतो ते कदाचित संपल्यामुळे तो तिथे सोडून जातो. आणि दुसरा कर्मचारी मागून अग्निरोधक मारत त्या पेट्रोल पंपाला लागलेली आग विझवतो. एव्हाना तो संपुर्ण परिस्थितीवर नियंत्रण मिळवतो आणि खूप मोठ्या प्रमाणात होणारी हानी थोडक्यात वाचते. पेट्रोल कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या ह्या प्रसंगावधानामुळे एक मोठी दुर्घटना होण्यापासून वाचली.
असं सांगण्यात येत आहे कि, पेट्रोलच्या वाढत्या किंमतीमुळे त्या बाइकस्वाराने अशी कृती केली. परंतु अशी कृती केल्यामुळे खूप मोठी दुर्घटना होऊ शकते. सोबतच जीवित हानीसुद्धा होऊ शकते. कृपया कुणीही भावनेच्या आहारी जाऊन अशी कृती करू नका, कदाचित आपल्यामुळे इतरांना नाहक त्रास भोगावा लागू शकतो. टीका-टिप्पण्णी, निषेध इथपर्यंत ठीक आहे. परंतु असे हिंसक प्रकार करू नयेत, हीच आमच्या वाचकांना विनंती. आम्ही हा व्हिडीओ खाली देत आहोत, तुम्ही बघून घ्या, आणि कमेंट करायला विसरू नका. आणि मराठी गप्पाला देत असलेल्या पाठिंब्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार.
बघा व्हिडीओ: