विनोद निर्माण करणं, तसेच तो सादर करणं आणि त्यात सातत्य राखणं हे फारच कठीण काम असतं. एखाद्या कलाकाराचा या प्रसंगी कस लागत असतो. म्हणूनच म्हंटलं जातं की, एक वेळ प्रेक्षकांना रडवणं सोप्पं असतं, पण हसवणं तेवढंच कठीण. पण काही कलाकारांना पाहून असं वाटतं, की यांना किती सहजगतीने यांना जमतंय हे आणि मग असे कलाकार केवळ प्रसिद्ध न होता, लोकप्रिय ठरतात. असाच एक कलाकार सध्या लोकप्रियतेची एकेक शिखरे पार करतो आहे. युट्युबर म्हणून तो कार्यरत आहे आणि त्याचा प्रत्येक नवीन व्हिडिओ हा एक ते दोन दशलक्ष प्रेक्षकसंख्या लाभलेला असतोच. याला कारणीभूत आहे तो त्याचा कोणताही अविर्भाव न करता केलेला अभिनय, दैनंदिन जीवनातील अनुभव आणि निरीक्षणांचा संहितेत केलेला वापर, उत्तम लेखन, खुसखुशीत संवाद आणि सोबत लाभलेली त्याच्या टीमची उत्तम जोड.
तुम्हाला थोडा अंदाज आला असेलंच आज आपण कोणत्या कलाकाराच्या अभिनयप्रवासाचा आढावा घेणार आहोत. होय, तो आहे विनायक माळी म्हणजे आपल्या सगळ्यांचा लाडका दादूस. ‘दादूस’, ‘शेठ’, ‘त्रस्त नवरा’ अशा त्याच्या व्यक्तिरेखांनी सध्या युट्युबवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. त्याच्या व्हिडियोजचे काही छोटे तुकडे व्हॉट्सअप स्टेटस म्हणून सोशल मिडियावरती सध्या प्रचंड वायरल झाले आहेत. प्रेक्षकांची नस ओळखणाऱ्या विनायक ने त्यांच्या मनात अल्पावधीत स्वतःचं असं एक स्थान निर्माण करण्यात यश मिळवलं आहे. कायद्याचा अभ्यास (एल.एल.बी.) करणारा विनायक, हा तीन वर्षांपूर्वी युट्युबर म्हणून कार्यरत झाला. त्यावेळी तो हिंदी भाषेत व्हिडियोज करत असे. तसेच त्या व्हिडियोज मध्ये तो एकटा काम करत असे. तेव्हा त्याला प्रसिद्धी मिळत असे. पण पुढे त्याने स्वतःची ही पद्धत बदलली आणि ही प्रसिद्धी कैक पटीने वाढली. त्याने मातृभाषेत म्हणजेच आगरी कोळी भाषेत व्हिडिओ बनवणं सुरू केलं. तसेच एकट्याने त्या व्हिडियोज मध्ये असण्यापेक्षा, स्वतःच्या कुटुंबातील सदस्य, मित्रपरिवार यांच्या सोबत व्हिडियोज करणं सुरू केलं.
तसेच विविध ठिकाणी आणि समारंभांचा त्याने या व्हिडियोज मध्ये चपखल वापर करून घेतला. त्यामुळे त्या प्रसंगांमध्ये एक प्रकारचा नैसर्गिकपणा आला आणि हे व्हिडियोज अजून खुलले. आम्ही आगरी कोळी पोरं हा त्याचा दहा लाख व्युजच्या पलीकडे गेलेला पहिला व्हिडीओ. मग माझी बायको, दादूस या सिरीज त्याने त्याच्या प्रेक्षकांच्या भेटीस आणल्या. त्या तुफान चालल्या आहेत. आज या सिरीज मधले अनेक छोटे छोटे भाग व्हॉट्सअप स्टेटस आणि इतर सोशल मिडियावरती फिरत असतात. यावरून त्याच्या या सिरीजच्या लोकप्रियतेची कल्पना यावी. या लोकप्रियतेची चुणूक अजून एकदा दिसून आली. या वर्षीच्या सुरवातीला ‘मन फकिरा’ या सिनेमातील कलाकारांनी त्यांच्या या नवीन सिनेमाचे प्रमोशन विनायकच्या युट्युब चॅनेल वरही करण्यात आले. अपेक्षेप्रमाणे त्या व्हिडियोलाही काही दशलक्ष व्युज मिळाले आहेत. तसेच नुकतंच त्याने रितिका श्रोत्री या नवतारकेसोबत एक कोलॅब व्हिडीओ केला. यानिमित्ताने त्यांनी तिच्या आगामी ‘डार्लिंग’ सिनेमाविषयी चर्चा केली. तसेच अनेक प्रथितयश वृत्तपत्रांनी त्याच्या या यशाची दखल घेतलेली आहे. यात इंग्रजी दैनिकांचाही समावेश आहे. एकूणच काय, तर दादूस सध्या सिनेक्षेत्रात आणि माध्यमांतून गाजतो आहे.
त्याच्या या अभूतपूर्व यशाचं श्रेय वर उल्लेखलेल्या गोष्टींना आहेच. सोबतच त्याच्या साध्या वागण्यालाही आहे. दैनंदिन आयुष्यातल्या प्रसंगातून विनोद शोधून काढताना जी प्रसिद्धी मिळाली त्यामुळे तो हुरळून गेलेला नाही. विनायक माळी ह्याचा जन्म २२ सप्टेंबर १९९५ रोजी रायगड जिल्ह्यातील पनवेलमध्ये आगरी कुटुंबात झाला. एका मध्यमवर्गीय कुटुंबात तो जन्मला. वडील सरकारी कर्मचारी असल्यामुळे नोकरीनिमित्त त्यांचे कुटुंब ठाण्यात वास्तव्यास गेले. ठाणे येथे लहानाचा मोठा झाला. त्याचे शालेय शिक्षण ठाण्यातच झाले. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण, पुढे विप्रोसारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये काम केल्यानंतर त्याने युट्युब वरचा त्याचा प्रवास सुरु केला. आज हा प्रवास यशस्वी होत असताना, हे यश टिकवून ठेवणं हे त्याच्या पुढचं आव्हान असणार आहे. पण आपला दादूस हे आव्हान अगदी सहजतेने पूर्ण करेलच. किंबहुना आताही तो ते सहजतेने पेलतो आहे आहे यात शंका नाही. त्याच्या पूढील यशस्वी वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टीमकडून त्याला खूप खूप शुभेच्छा !
(Author : Vighnesh Khale)