प्रिया बापट हे नाव मराठीतल्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये घेतले जाते. ती लोकप्रिय मराठी अभिनेत्रींपैकी एक आहे. प्रियाने अनेक सुपरहिट मराठी चित्रपट दिले आहेत. ढीगभर चित्रपट न करता मोजके चित्रपट करून त्या चित्रपटांत स्वतःला पूर्णपणे झोकून देणे म्हणजे प्रियाची खासियत. सामान्यतः ती एकावेळी एकच चित्रपट करत असते. ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘काकस्पर्श’, ‘टाइमप्लिझ’, ‘टाईमपास २’, ‘वजनदार’, ‘हॅपी जर्नी’, ‘आम्ही दोघी’, ‘पिंपळ’ ह्यासारख्या चित्रपटांतून प्रियाने आपल्या अभिनयाची कमाल दाखवलेली आहे. मराठी चित्रपटांबरोबरच करियरच्या सुरुवातीच्या काळात तिने हिंदी चित्रपटांत सुद्धा काम केलेले आहे. राजकुमार हिरानीच्या ‘मुन्ना भाई एम बीबीएस’ आणि ‘लगे राहो मुन्नाभाई’ ह्या सुपरहिट चित्रपटांत तिने अभिनय केला होता. ह्या चित्रपटांत तिने छोट्याशाच भूमिका केल्या होत्या. ‘मुन्नाभाई’ चित्रपटांतील सोज्वळ प्रकारच्या तरुणीची भूमिका तिने उत्तमरित्या निभावल्या होती. त्या चित्रपटातील तिचा अभिनय पाहून तिला अनेक हिंदी चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या.
प्रियाला शाहरुख खानच्या ‘चक दे इंडिया’ चित्रपटाची सुद्धा ऑफर आली होती. परंतु हि ऑफर तिने नाकारली होती. ह्यामागे काय कारण होते हे प्रियाने स्पष्ट केले होते. प्रियाने ह्यावर्षीच्या मराठी फिल्मफेअर पुरस्कार दरम्यान एका मुलाखतीत ह्याबाबत खुलासा केला कि, “मुन्नाभाई चित्रपटानंतर मला बऱ्याच हिंदी चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या होत्या. त्यात ‘चक दे इंडिया’ ह्या चित्रपटाचा देखील समावेश होता. ह्या चित्रपटांत हॉकी खेळाडूची भूमिका मला देण्यात आली होती. परंतु ग्रॅज्युएशनचे वर्ष असल्यामुळे मला चित्रपटाला नकार द्यावा लागला होता. मला माझे ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण करायचे होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतरच मी अभिनयाचे क्षेत्र करिअर म्हणून निवडले होते. ‘चक दे इंडिया’ ला बराच वेळ द्यावा लागणार होता.” ह्या मुलाखतीत तिने हे सुद्धा मेन्शन केले कि ह्या कारणामुळे तिला शाहरुख सोबत काम करण्याची मिळालेली संधी सुद्धा हुकली. तिला तिच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचे होते आणि चित्रपटासाठी तिला जवळजवळ सहा महिन्यांचा वेळ द्यावा लागणार होता. चित्रपटातील हॉकी खेळाडूच्या भूमिकेसाठी तिला ३ महिन्याची ट्रेनिंग आणि शूटिंग साठी ३ महिने, म्हणजेच दोन्ही मिळून ६ महिन्यांचा कालावधी लागणार होता.
ग्रॅज्युएशनचे शेवटचे वर्ष असल्या कारणाने तिला ह्या चित्रपटासाठी इतका वेळ देणे खूपच कठीण होते. जेव्हा प्रियाला चित्रपटाची संधी हुकल्याची खंत वाटते का विचारल्यावर तिने सांगितले कि, “मला ‘चक दे इंडिया’ ह्या चित्रपटाला नकार दिल्याबद्दल कोणतीच खंत वाटत नाही आहे. कारण जेव्हा हा चित्रपट मला ऑफर झाला होता तेव्हा मी शिक्षण घेत होते आणि त्यावेळी माझे शिक्षण माझी पहिली प्रायोरिटी होती. मी त्यावेळी चित्रपटांत अभिनय केवळ हौस म्हणून करत होते.” महिला हॉकी संघाच्या प्रवासापासून ते अगदी विश्वचषकापर्यंत त्यांचे नाव कोरले जाण्यापर्यंतचा हा सुरेख प्रवास ‘चक दे इंडिया’ चित्रपटांत दाखवला आहे. ह्या चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला आणि बॉक्स ऑफिसवर सुद्धा ह्या चित्रपटाने चांगली कमाई केली होती. आजच्या घडीला प्रिया बापट मराठी चित्रपटातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा सोशिअल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे. त्याचप्रमाणे तिला तिच्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर अनेक अवॉर्ड्ससुद्धा मिळाले आहेत. ह्याच वर्षी आलेल्या ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ ह्या हिंदी वेब सिरीज मध्ये तिने काम केले होते. हि वेब सिरीज सुद्धा खूप लोकप्रिय झाली, त्यातील प्रियाच्या कामाचे खूप कौतुक झाले. अश्या ह्या गुणी अभिनेत्रीला करियरच्या पुढील वाटचालीबद्दल मराठी गप्पा कडून हार्दिक शुभेच्छा.