नागराज मंजुळे यांचा झुंड हा सिनेमा १८ जून २०२१ रोजी आपल्या भेटीस येईल. साधारण वर्षभराच्या प्रतिक्षेनंतर हा सिनेमा भेटीस येत असल्याने आणि त्यातही महानायक अमिताभ बच्चन यांची यात मध्यवर्ती भूमिका असल्याने चाहत्यांसाठी ही एक पर्वणी ठरणार आहे. तसेच सैराट मधील काही कलाकार यांत असतील त्यामुळे सिनेमात रंगत अजून वाढेल हे नक्की. नागराज यांनी आजतागायत अनेक नवोदित आणि खासकरून गावातून आलेल्या गुणी कलाकारांना आपल्या समोर आणलं आहे. रिंकू राजगुरू, आकाश ठोसर, राजेश्वरी खरात, सोमनाथ अवघडे, तानाजी गळगुंडे, अरबाज शेख ही त्यातली काही प्रातिनिधिक उदाहरणं. आज ह्यातीलच एक अश्या लोकप्रिय कालकराबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत आणि त्या लोकप्रिय कलाकाराचे नाव आहे सोमनाथ अवघडे. सोमनाथ अवघडे ह्यानेच फॅन्ड्री ह्या लोकप्रिय चित्रपटात जब्याची भूमिका साकारलेली होती.
या उदयोन्मुख कलाकारांतील काही कलाकार पुन्हा एकदा आपल्याला एका सिनेमात एकत्र दिसणार आहेत. ‘फ्री हिट दणका’ असं या सिनेमाचं नाव. यात सोमनाथ अवघडे, तानाजी गळगुंडे, अरबाज शेख हे कलाकार आपल्याला दिसतील. तानाजी आणि अरबाज यांचा एकत्र असा हा दुसरा सिनेमा असेल तर सोमनाथ या जोडगोळीसोबत पहिल्यांदा सिनेमात झळकेल. मुख्य नायक म्हणून सोमनाथ याचा हा दुसरा सिनेमा. या सिनेमाचं पोस्टर रिलीज झाल्यानंतर यातील कलाकारांचे लूक चाहत्यांना पाहता आले. सोमनाथ याचा बदललेला लूक पाहून तर अनेकांनी आनंद व्यक्त केलाच सोबतच अनेक प्रथितयश वृत्तसंस्थांनी आपल्या मनोरंजन विश्वाच्या बातम्यांतुन त्याचं कौतुक केलं. फँड्रीच्या वेळी असणारा सोमनाथ चा लूक अत्यंत साधा होता. त्यावेळी त्याने साकार केलेल्या जब्यासाठी हा लूक योग्यच होता. पण या सिनेमात मात्र त्याचा मॉडर्न लूक असणं महत्वाचं असावं.
कारण सिनेमाच्या पोस्टर वरून ही एक प्रेमकथा असणार हे नक्की. तसेच सोमनाथ याची व्यक्तिरेखा ही कॉलेज मध्ये जाणाऱ्या युवकाची आहे असं दिसून येतं. त्यामुळे जब्याचे चाहते त्याच्या या नवीन लूक आणि व्यक्तिरेखेसाठी उत्सुक असणार हे नक्की. फँड्रीच्या वेळी सोमनाथ हा या मनोरंजन क्षेत्रास अगदीच नवीन होता. नागराज यांच्या मुलाखतींतून आलेल्या अनेक किश्शयांनी याची जाणीव होते. पण आता मात्र सोमनाथ प्रगल्भ झाल्यासारखा वाटतो. त्यामुळे फँड्रीतल्या मुख्य भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या या उदयोन्मुख कलाकाराकडून अपेक्षा वाढल्या आहेत. या अपेक्षा तो लिलया पूर्ण करेल हे नक्की. त्याच्या या पुढील सिनेमासाठी मराठी गप्पाच्या टिमकडून मनःपूर्वक शुभेच्छा !