Breaking News
Home / मराठी तडका / फुलाला सुगंध मातीचा मालिकेतील शुभम खऱ्या आयुष्यात कसा आहे, बघा शुभमचे खरे आयुष्य

फुलाला सुगंध मातीचा मालिकेतील शुभम खऱ्या आयुष्यात कसा आहे, बघा शुभमचे खरे आयुष्य

टीम मराठी गप्पाने आपल्या वाचनासाठी मनोरंजन विश्वातील विविध बातम्या आणि लेख सातत्याने आपल्या समोर आणले आहेत. या लेखांमधून अनेक आघाडीच्या कलाकारांचा कलाविश्वातील प्रवासाचा आढावा आपण घेतला आहे. आज आपण याच मंदियाळीतील हर्षद अतकरी याच्या कलाप्रवासाचा आढावा घेऊ. हर्षद मुळचा मुंबईचा. मुंबईतील प्रभादेवी येथे त्याचं बालपण गेलं. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण झालं. या काळात त्याला क्रिकेटची प्रचंड आवड होती. सोबत कधी कधी वक्तृत्व स्पर्धांमधूनही तो सहभागी होत असे. सिनेमे, नाटक यांची आवड होती, पण या क्षेत्राविषयी आकर्षण असं नव्हतं. पण हळू हळू ते निर्माण झालं. तोपर्यंत एकांकिका वगैरे केल्या नव्हत्या. पण अभिनेता म्हणून घडायचं असेल तर रंगमंचावर काम करायला हवं हे त्याला माहिती होतं. त्याकाळात त्याने एकांकिका केल्या. नाटके केली. त्याच्या मुलाखतींतून असं जाणवतं की, आजही नाटकांतून काम करणं हे त्याचं पहिलं प्रेम आहे. नजीकच्या काळातलं त्याचं प्रसिद्ध झालेलं नाटक म्हणजे फायनल डिसीजन हे होय.

एकांकिका आणि नाटक त्यांच्यातून हर्षद रमत असला तरीही अभिनेता म्हणून त्याला सर्वात प्रथम प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळवून दिली ती टेलिव्हिजनच्या पडद्याने. प्रेक्षकांची लाडकी ठरलेल्या, ‘दुर्वा’ या मालिकेतून त्याने या माध्यमात प्रवेश केला. भूमिका ही तशी धीरगंभीर, कमी वाक्य असूनही जरब निर्माण करणारी अशी होती. हर्षदने या मालिकेत संपूर्णपणे झोकून देऊन व्यक्तिरेखा साकारली. किंबहुना त्याच्या पुढील प्रत्येक मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखेचे विविध पैलू तितक्याच तन्मयतेने साकारले. आजही फुलाला सुगंध मातीचा या मालिकेतील शुभम ही व्यक्तिरेखा ही त्यास अपवाद नाही. त्याने या दोन्ही मालिकांच्या मध्ये थोड्याच पण उत्तम मालिका केल्या. त्यात अंजली आणि सारे तुझ्याचसाठी या मालिकांचा समावेश होतो. यापैकी अंजली मध्ये एका ग्रे शेड असणाऱ्या डॉक्टरची भूमिका त्याने साकारली होती. तर सारे तुझ्याचसाठी मध्ये त्याने कार्तिक या शास्त्रीय गायकाची भूमिका साकारली होती. एकूणच काय, संख्येनं कमी पण उत्तम भूमिका करण्याकडे त्याचा कल दिसतो.

नाटक, मालिका, शॉर्ट फिल्म्स यांच्यातून आपल्या भेटीस आलेला हर्षद हा येत्या काळात, फॅशन फिल्म मधून आपल्या समोर येईल. अभिनयाव्यतिरिक्त त्याला क्रिकेट आणि व्यायामाची आवड आहे. शूटिंग च्या मोकळ्या वेळात तो सहकलाकार आणि इतर टीम मेंबर्स सोबत क्रिकेट खेळताना दिसतो. तसेच या लॉक डाऊन काळातही त्याने स्वतःची व्यायामाची आवड जपली. तसेच हा काळ अभिनेता म्हणून स्वतःच्या कौशल्यांवर त्याने काम केलं. एका युट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्याने सांगितलं की या काळात त्याने संस्कृत आणि अन्य भाषांचा अभ्यासही केला. असा हा प्रगतिशील अभिनेता आजतागायत आपल्याला ज्या ज्या भूमिकेतून भेटला त्या त्या भूमिकांनी आपल्याला आनंद दिला. येत्या काळातही प्रेक्षकांचं तो असंच सातत्याने आणि अखंडपणे मनोरंजन करेल यात शंका नाही. फुलाला सुगंध मातीचा आणि त्याच्या पूढील कलाकृतींसाठी मराठी गप्पाच्या टीमकडून त्याला खूप खूप शुभेच्छा !

(Author : Vighnesh Khale)

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *