Breaking News
Home / मराठी तडका / फुलाला सुगंध मातीचा मालिकेतील जिजिअक्का खऱ्या आयुष्यात कश्या आहेत, हिंदीमध्ये केले आहे काम

फुलाला सुगंध मातीचा मालिकेतील जिजिअक्का खऱ्या आयुष्यात कश्या आहेत, हिंदीमध्ये केले आहे काम

मराठी मनोरंजन क्षेत्राला नाट्यसृष्टीची खूप मोठी परंपरा आहे. नाट्यसृष्टीत काम केलेले अनेक कलाकार आज आघाडीच्या कलाकारांमध्ये गणले जातात. अनेक कलाकारांची जडणघडण या नाट्यसृष्टीच्या माध्यमांतून होत असते. अगदी बॉलिवूड मध्येही नाटकांतून काम करणाऱ्यांना एक मानाचं असं स्थान असतं. मराठी गप्पातर्फे आम्ही आघाडीच्या कलाकारांसोबतच दिग्गज कलाकारांच्या खऱ्या आयुष्याविषयी नेहमीच ओळख करून देत आलेलो आहोत. या दिग्गज कलाकारांच्या मंदियाळीतील एका अभिनेत्रीविषयी आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. चला तर फुलाला सुगंध मातीचा मालिकेतील जिजिअक्का ह्यांच्या विषयी आज जाणून घेऊया.

जिजिअक्का ह्यांचे खरं नाव आहे अदिती देशपांडे. दुर्गा झाली गौरी, हीच तर प्रेमाची गंमत आहे, फुलवा, लगीनघाई यांसारख्या गाजलेल्या नाट्यकृतींचा त्या भाग होत्या. किंबहुना त्यांच्या कलाप्रवासाची सुरवातही या नाट्यसृष्टीतुन झाली होती. अगदी तरुण वयात त्यांनी दुर्गा झाली गौरी ह्या नाटकांतून अभिनय करायला सुरुवात केली. पुढेही त्यांच्या प्रवासात अनेक उत्तमोत्तम नाटकांमध्ये त्यांचा सहभाग असे. या काळात पंडित सत्यदेव दुबे, सुलभा देशपांडे, चेतन दातार यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत त्यांनी नाट्यसृष्टीत काम केलं. उत्तम अभिनेत्री म्हणून त्यांना ओळख मिळत होती, कलाप्रवास चालू होता. पण प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात एखादी अशी भूमिका येते ज्यामुळे तो कलाकार कायमस्वरूपी ओळखला जाऊ लागतो. अदितीजींच्या बाबतीत ही किमया केली ती एका चित्रपटातील भूमिकेने. या चित्रपटाची निर्मिती त्यांनी स्वतः केली होती. निर्माती म्हणून पहिला चित्रपट असल्याने त्यांना हा चित्रपट तळागाळातल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागले.

काही वर्षांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी नमूद केलं होतं की या चित्रपटाची निर्माती म्हणून त्यांनी अगदी या चित्रपटाचे रीळ घेऊन स्वतः प्रवास केलेला आहे. त्यात पैसे तसे त्यामानाने कमी, त्यामुळे प्रसिध्दीत जास्त पैसे खर्च करण्यावर बंधन येत. पण या सगळ्या कष्टातून जे निष्पन्न झालं ते अविस्मरणीय ठरलं. कारण एका ज्वलंत विषयावरील कथा, योग्य रीतीने झालेली तिची मांडणी आणि कलाकारांचा अभिनय यामुळे ही कलाकृती थेट राष्ट्रीय पुरस्कारासाठीच्या चित्रपटांत सामील झाली. ‘नॉट ओन्ली मिर्सेस राऊत’ हे या चित्रपटाचं नाव. या चित्रपटाची आठवण सांगताना एके ठिकाणी अदितीजी असं म्हणाल्या होत्या, की आजही त्यांना अनेक जणं, मिर्सेस राऊत म्हणून हाक मारतात. यावरून या चित्रपटाची परिणामकारकता लक्षात येते. तसेच अनेक दिग्गज कलाकारांनीही त्यांचं कौतुक केल्याच्या आठवणी त्यांच्या विविध मुलाखतींतून प्रेक्षकांनी ऐकल्या असतीलच. या त्यांच्या लोकप्रिय चित्रपटानंतर त्यांनी मायबाप हा अजून एक चित्रपट केला. पुढे इतर निर्मात्यांच्या चित्रपटांतूनही त्यांनी उत्तम काम केलं. पक पक पकाक, दशक्रिया, जोगवा, वजनदार हे त्यांचे लोकप्रिय चित्रपट.

नाटक आणि चित्रपट यांतून काम करत असताना त्यांनी मालिकांमधून ही अभिनय केलेला आहे. मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांतील मालिकांमध्ये त्यांनी स्वतःचा ठसा उमटवला आहे. सध्या ‘फुलाला सुगंध मातीचा’ ही मालिका सुरू आहे. त्यात त्यांनी जिजिअक्का ही व्यक्तिरेखा साकारली आहे. या मालिकेचा स्वतःचा असा एक प्रेक्षकवर्ग तयार झाला आहे. त्यात जिजिअक्का ह्या व्यक्तिरेखेचं ही मोलाचं योगदान आहे. यासोबत त्यांची अजून एक मालिका गाजली ती म्हणजे , ‘नकुशी’. या मालिकेच्या माध्यमातून एका सामाजिक रूढी परंपरेबाबत भाष्य करण्यात आलं होतं. या मालिकेतील अदितीजींच्या व्यक्तिरेखेचं खूप कौतुक झालं होतं. मराठी सोबतच त्यांनी हिंदीतही भरीव कामगिरी केली आहे. रिशता लिखेंगे हम नया, मैं मायके चले जाऊंगी या त्यांच्या गाजलेल्या मालिका.

एकंदर अदितीजींचा कलाप्रवास पाहता, त्यांनी ज्या ज्या कालाकृतींतून काम केलं, त्या कलाकृती प्रेक्षकांच्या सदैव स्मरणात राहिल्या आहेत. त्यांनी अभिनय आणि निर्मिती केलेल्या कलाकृतींनी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या यादीत मराठी चित्रपटाचं नाव सदैव मानाने फडकवत ठेवलं आहे. यापुढेही त्यांच्या कलाकृती आणि व्यक्तिरेखा, ही घोडदौड अशीच चालू ठेवतील हे नक्की. त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा !

(Author : Vighnesh Khale)

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *