टीव्ही मालिकांचे टी. आर.पी. मोजणारी संस्था म्हणजे बी.ए.आर.सी.. या संस्थेच्या साप्ताहिक अहवालानुसार स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिका या अतिशय लोकप्रिय होत आहेत, हे गेल्या काही आठवड्यांपासून सातत्याने दिसून येत आहे. यात फुलाला सुगंध मातीचा या मालिकेचा मोलाचा वाटा आहे. या मालिकेतील नायक, नायिका यांच्याविषयी मराठी गप्पावर लेख लिहिले गेले होतेच. पण या मालिकेतील अजून एका अभिनेत्रीचा अभिनय प्रेक्षकांना आवडतो आहे. आजच्या लेखातून आपण त्या अभिनेत्रीची ओळख करून घेणार आहोत. या अभिनेत्रीचं नाव, ऐश्वर्या शेटे असं आहे. तिने फुलाला सुगंध मातीचा या मालिकेत सोनाली ही काहीशी खल भूमिका साकार केली आहे. चुकीच्या वागण्यामुळे मालिकेतील जिजिअक्का यांची बोलणी खाणारी ही व्यक्तिरेखा.
मालिकेतील विक्रम या व्यक्तिरेखेसोबत काही कुभांड रचणारी ही भूमिका. ऐश्वर्या हिने ही भूमिका उत्तमरीतीने वठवली आहे. मालिकेत तिची भूमिका नायिकेच्या विरुद्ध असली तरीही खऱ्या जीवनात त्या उत्तम मैत्रिणी आहेत. मध्यंतरी त्या दोघींचा एक डान्स ही वायरल झाला होता. फुलाला सुगंध मातीचा या मालिकेअगोदर ऐश्वर्या हिने ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण आणि घाडगे अँड सून या मालिकांतून अभिनय केलेला आहे. तसेच शेखर फडके यांच्या ‘जे आहे, ते आहे’ या नाटकातही अभिनय केलेला आहे. ऐश्वर्या हि मुळची ठाणेकर असून, तिने ठाण्यातून शालेय शिक्षण पूर्ण केलेलं आहे. तसेच पोद्दार महाविद्यालयातुन उच्च शिक्षण घेतलेले आहे. अभिनयाव्यतिरिक्त तिला भटकंती करायला आवडते असं तिच्या सोशल मीडिया पोस्ट्स वरून दिसतं. सध्या ऐश्वर्या हिची कलाकारकिर्द सुरू होते आहे. नाटक, मालिका यांच्यातून ती कलाकार म्हणून स्वतःचा जम बसवते आहे आणि त्यात यशस्वी होतानाही दिसते आहे. कारण तिच्या अभिनयात दिवसेंदिवस येत जाणार प्रगल्भपणा तसेच सातत्याने मिळणारं काम हे याचं द्योतक.
येत्या काळातही, तिच्या अभिनयातील सातत्य आणि प्रयोगशीलता टिकून राहील हे नक्की. ऐश्वर्याच्या पुढील यशस्वी प्रवासासाठी मराठी गप्पाच्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा ! वर उल्लेख केला प्रमाणे मराठी गप्पाच्या टीमने फुलाला सुगंध मातीचा या मालिकेतील कलाकारांविषयी लेख लिहिले आहेत. ते लेख वाचण्यासाठी वर उपलब्ध असलेल्या सर्च ऑप्शनचा वापर करा. त्यात जाऊन, फुलाला सुगंध मातीचा असं लिहून सर्च केल्यास आपल्याला ते लेख उपलब्ध होतील. आपल्या वेळेसाठी धन्यवाद !
(Author : Vighnesh Khale)