मराठी मालिकाविश्वात जसजशा नवनवीन मालिका दाखल होऊ पाहताहेत किंवा अनलॉकच्या काळात दाखल झाल्या आहेत, त्यांची चर्चा घराघरातून होते आहे. अशीच एक मालिका म्हणजे ‘फुलाला गंध मातीचा’. यात प्रेक्षकांच्या आवडीचे अनेक कलाकार आहेत. मुख्य भूमिकेत हर्षद अटकारी आणि समृद्धी केळकर हे लोकप्रिय कलाकार आहेत. या मालिकेने २ सप्टेंबर म्हणजे अगदी सव्वा महिन्यापूर्वी पदार्पण केलंय. एवढ्या कमी काळातही त्यांना मिळणारा प्रतिसादही उत्तम आहे. या निमित्ताने या मालिकेतील मुख्य भूमिका साकारणाऱ्या ‘समृद्धी केळकर’ हिच्या कलाप्रवासाचा घेतलेला धांडोळा.
समृद्धी मुळची ठाण्याची. तिचं बालपण आणि शालेय शिक्षण झालं ठाण्यात. पुढे मुलुंडच्या वझे-केळकर कॉलेजमध्ये तिने वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला. लहानपणापासून नृत्याची जीवापाड आवड. त्यामुळे वाणिज्य शाखेत ताळेबंद म्हणजे बॅलन्स शीटचे धडे घेता घेता, अभ्यासाबरोबर कथ्थक चे धडे गिरवणं, स्पर्धांमध्ये भाग घेणं याचा बॅलन्स साधण्याची कसरत चालू होती. पण तिच्या या परिश्रमाची फळसुद्धा तिला पुरस्कार आणि पारितोषिकांच्या रूपाने मिळतच होती. अनेक नृत्यस्पर्धांमध्ये मेडल्स मिळण्याचा सिलसिला चालू होता. कॉलेज संपल्यावरही, विविध कार्यक्रमांतून ती आपली नृत्यकला सादर करत राहिली आहे ती आजतागायत. मुलुंड महोत्सव, जल्लोष २०१८, नृत्यांगण २०१९ यांसारख्या गाजलेल्या महोत्सवात तिने नृत्य केलं आहे. तसेच नवी उमेद नवी भरारी, एकदम कडSSSक या टेलीविजन कार्यक्रमातहि तिने नृत्यांगना म्हणून भाग घेतला होता.
नवी उमेद नवी भरारी हा तर लॉकडाऊन संपून अनलॉक सुरु होण्याच्या पार्श्वभूमीवर केला गेला होता. ज्यात सूत्रसंचालन लोकप्रिय गायक, संगीतकार, दिग्दर्शक अवधूत गुप्ते यांनी केलं होतं. आणि बाकीचे कलाकार आपापल्या घरून त्यांच्या कला सादर करत होते. या कार्यक्रमांप्रमाणेच तिने एका नृत्याला वाहिलेल्या रियालिटी शो मध्येही भाग घेतला होता आणि त्याच्या थेट महाअंतिम सोहळ्यापर्यंत धडक मारली होती. हा शो म्हणजे ढोलकीच्या तालावर – पर्व तिसरे. नृत्याचा हा प्रवास अखंडपणे चालू असताना मनात अभिनयाविषयी आवड रुजत होती. मग ऑडिशन्स देणं सुरु झालं. अशा प्रकारे तिला एक मालिका मिळाली, जी पुढे खूप लोकप्रिय झाली. ती मालिका म्हणजे ‘पुढचं पाउल’. या मालिकेत तिने ‘ओवी’ हि व्यक्तिरेखा साकारली होती. तसेच त्यानंतर आलेल्या, ‘लक्ष्मी सदैव मंगलम’, यात तिने लक्ष्मीची मध्यवर्ती भूमिका साकार केली होती. अनाथ असलेली, मामा मामींकडे राहणारी, आणि जिचा पायगुण चांगला आहे असं समजलं जातं अशी हि व्यक्तिरेखा.
नृत्याप्रमाणेच अभिनयातही तिने उत्तम कामगिरी बजावली, म्हणूनच प्रेक्षकांचं प्रेम तिला तेव्हापासून लाभत आलंय ते आजतागायत. तिची नवीन मालिका म्हणजे सध्या नव्याने सुरु झालेली, ‘फुलाला गंध मातीचा’. येत्या काळात, हि मालिकाही लोकप्रियतेचा कळस गाठेल, हे नक्की. मालिका हे माध्यम अभिनयासाठी निवडल्यानंतर, तिने मोर्चा वळवला तो दोन नवीन माध्यमांकडे. तिने शॉर्ट फिल्म आणि म्युझिक विडीयो, या दोन्हीमध्येही तिने सर्वोत्तम काम केलंय. ‘दोन कटिंग’ हि तिची नुकतीच प्रसिद्ध झालेली आणि गाजलेली शॉर्ट फिल्म. हा लेख लिहित असताना, जवळपास सात लाख व्ह्यूज या शॉर्ट फिल्म ने मिळवले आहेत. यात एका तरुण चित्रकार आणि तरुण लेखिका यांच्यातला लग्न जुळताना होणारा संवाद दाखवला गेला आहे. एकदा नक्की पहावी अशी हो शॉर्ट फिल्म आहे. सोबतच, ‘नाखवा’ हा म्युझिक विडीयोसुद्धा प्रसिद्ध झाला आहे. युट्युबवर या विडीयोला आठ लाखांहून अधिक लोकांनी पाहिलं आहे.
सध्या समृद्धी हि, मालिकेच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. पण लॉकडाऊनच्या काळातही ती प्रेक्षकांचं मनोरंजन करत होती आणि माध्यम होतं तिचं जीवापाड प्रेम असणारं नृत्य. अभिनय आणि नृत्य यांच्याप्रमाणे अजून एक कला समृद्धीला अवगत आहे. ती उत्तम चित्रकार आहे. वेळोवेळी तिने काढलेली चित्र ती चाह्त्यांसोबत शेअर करत असते. अशी हि हरहुन्नरी आणि अष्टपैलू कलाकार येत्या काळात आपल्याला तिच्या नवनवीन कार्यक्रम, मालिका, शॉर्ट फिल्म्स, म्युझिक विडीयोज मधून नक्कीच भेटत राहील. समृद्धीच्या या प्रवासात, तिला मिळणाऱ्या प्रेक्षकांच्या प्रतिसादात सतत वृद्धी होत राहू दे. तसेच तिच्या नृत्य, अभिनयाने प्रेक्षकांना समृद्ध झाल्याचा अनुभव मिळू दे याच टीम मराठी गप्पाच्या तिला सदिच्छा. तिच्या पुढील वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा !
(Author : Vighnesh Khale)